जे केले, ते स्वतःच्या हिमतीवर...

चिन्मयी खरे
शनिवार, 2 जून 2018

रांझणा, तनू वेड्‌स मनू, निल बट्टे सन्नाटा, अनारकली ऑफ आराह यांसारख्या चित्रपटांतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्वरा भास्करचा ‘वीरे दि वेडिंग’ काल प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने...

रांझणा, तनू वेड्‌स मनू, निल बट्टे सन्नाटा, अनारकली ऑफ आराह यांसारख्या चित्रपटांतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्वरा भास्करचा ‘वीरे दि वेडिंग’ काल प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने...

दिल्लीतील नाट्यकलाकार ते वीरे दि वेडिंगपर्यंतचा प्रवास कसा होता? आणखी बरेच काही करायचे आहे असे वाटतेय का?
- नक्कीच मला नेहमी असेच वाटते, आणखी बरेच काही करायचे बाकी आहे आणि मला तशा संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. आठ वर्षांचा प्रवास हा माझ्यासाठी खूप मोठा होता. मी जेव्हा आले तेव्हा इथे माझा कोणीच गॉडफादर नव्हता. जे काही केले ते स्वतःच्या हिमतीवर केले. संधी ओळखून मी एक एक पाऊल पुढे टाकत गेले. मी मला नेहमीच नशीबवान समजते. मला असे वाटते, की मी विविध प्रकारचे काम केलेय आणि चांगल्या निर्माता-दिग्दर्शकांबरोबर चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. चित्रपटात माझ्यासोबत मोठे स्टार्स होते, पण माझ्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. ‘प्रेम रतन धन पायो’, ‘रांझणा’, ‘तनू वेडस्‌ मनू’, ‘निल बट्टे सन्नाटा’ आणि ‘अनारकली ऑफ आराह’; तर माझ्या करियरमधले सगळ्यात बेस्ट चित्रपट होते. त्यामुळे मी संतुष्ट झाले आहे.

 veere di wedding

 बॉलीवूडमध्ये काम करताना कोणती गोष्ट खटकली आहे का?
- हो नक्कीच. कारण ही इंडस्ट्रीच अशी आहे, जिथे तुम्हाला अनेक वेळा नकार सहन करावा लागतो. माझ्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मी फारच दुःखी झाले होते आणि मला असे वाटत होते, की सगळे सोडून परत आई-वडिलांकडे दिल्लीला जावे. मी चांगली शिकलेली होते, इतर काहीही व्यवसाय करू शकले असते, पण नेहमीच मला अशा प्रसंगांतून जाताना त्याच क्षणी मला असे काही तरी काम मिळत गेले, की त्या दुःखातून मी बाहेर येत असे. माझ्या मनात जेव्हा असा विचार येतो, तेव्हा मी असा विचार करते, की माझ्याकडे आता जे आहे ते या शहरात रोज येणाऱ्या हजारो मुलींना मिळाले नाहीय. मला कमीत कमी हे तरी मिळाले आहे आणि ज्या गोष्टींवर माझा ताबा नसतो, त्या गोष्टींचा मी जास्त विचार करत बसत नाही.

 ‘वीरे दि वेडिंग’ बद्दल काय सांगशील?
- वीरे दि वेडिंग ही एक मैत्रीची गोष्ट आहे. चार मुली ज्या आपापल्या आयुष्यातील समस्यांवर दोन हात करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रत्येकीची ही गोष्ट आहे. माझ्या मते या चारही मुली बाकी सर्वसामान्य मुलींसारख्याच आहेत. प्रेक्षकांना असे वाटतेय, स्त्रियांची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही तरी सामाजिक मुद्दा असणार. चित्रपटात मुली आहेत आणि त्या ठराविक टॉपिकवरच बोलणार असे काही नाहीय. या चार मुलींना काढून चार मुले जरी घेतली असती, तरी कथा तीच राहिली असती. ज्याप्रमाणे मुलांना आपल्या आयुष्यात काय चाललेय हे कळू शकत नाही, जसे त्यांना प्रॉब्लेम्स असतात, तशाच चार मुली ज्या खूप चांगल्या घरातून आलेल्या आहेत, त्यांच्या आयुष्यात त्या वयात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या एकमेकींना त्या परिस्थितीत सोबत करतायत. माझी भूमिका तर बड्या बापाची वाया गेलेली मुलगी अशीच आहे.

लग्नाबद्दल तुझे काय मत आहे? तुझ्या लग्नाचा काही प्लॅन आहे का?
- मला लग्न खूप आवडते. खास करून पंजाबी लग्न. माझ्या भावाचे नुकतेच लग्न झाले. त्याच्या लग्नाचे सगळे प्लॅनिंग मीच केले होते. ढोल-ताशे, फटाके, मेहंदी हा सगळा माहोल मला खूप आवडतो, पण सध्या माझा लग्नाचा कोणताच प्लॅन नाही. हिंमाशू शर्मा सध्या ‘झीरो’ चित्रपटात बिझी आहे आणि त्यानंतरही आमचे बरेच करियर प्लॅन्स आहेत. त्यामुळे सध्या तरी लग्नाबद्दल आम्ही विचार केलेला नाही.

कास्टिंग काऊचबद्दल तुझे काय मत आहे?
- कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण झाले तर मला असे वाटते, की अभिनेत्रींनी न घाबरता आवाज उठवला पाहिजे. अमेरिकेत जशी ‘मी टू’ मोहीम सुरू केली गेली, तशी भारतातही सुरू केली पाहिजे, पण हा समाज पीडितेची बाजू ऐकून घ्यायला तयार आहे का? तेवढा सक्षम आहे का... मी कसे एखाद्याला सांगू की मी टू मोहिमेत बोला आणि काय खात्री की मी त्यानंतर सुरक्षित असेन? अमेरिकेत लोक मी टू बद्दल बोलत आहेत. कारण तेथील समाज पीडितेची बाजू ऐकण्यास, त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार आहेत. हार्वे आइनस्टाईन खूप मोठा निर्माता होता. त्याला त्याच्याच स्टुडिओमधून तिकडल्या लोकांनी बाहेर काढले. इथे स्टुडिओज एखाद्या अभिनेत्रीची बाजू ऐकून घेतील का? त्यामुळे हा समाज कोणत्या हक्काने आम्हाला कास्टिंग काऊचवर बोलायला सांगतो.

Web Title: swara bhaskar interview for vire di wedding