
सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे योग्य ते पालन करून मुंबईतील पहिल्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईत चित्रीकरण होणारी 'स्वराज्यजननी जिजामाता' ही पहिली मालिका आहे.
मुंबई- कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु होतं. मात्र आता हळूहळू अनेक गोष्टी पूर्वपदावर करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातंच आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणंही पुन्हा सशर्त सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांचं चित्रीकरण पुन्हा सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सोनी मराठी वाहिनीने सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे योग्य ते पालन करून मुंबईतील पहिल्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईत चित्रीकरण होणारी 'स्वराज्यजननी जिजामाता' ही पहिली मालिका आहे.
'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. एका मुलखावेगळ्या आईची गाथा, जिनं स्वराज्याचा सिंह घडवला अशा जिजामातांच्या आयुष्यावर ही मालिका आहे. या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी इथं सुरू झालं आहे. सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पाळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे.
काही लोक सेटवरंच राहून काम करणार असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ही निर्मात्या संस्थांची जबाबदारी आहे. मुंबईत चित्रीकरण सुरू होणारी ही पहिलीच मालिका आहे. ही मालिका डॉ. अमोल कोल्हे यांची असल्यानं आणि ते स्वतः डॉक्टर असल्यानं चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः सेटवर उपस्थित राहून सर्वांना नियम समजावून सांगितले व सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतरांना प्रोत्साहन दिले.तीन महिन्यांनंतर कामावर रुजू झाल्यामुळे सर्वच मंडळींमध्ये उत्साह होता.
'स्वराज्यजननी जिजामाता' ही ऐतिहासिक मालिका असल्यानं मिळालेल्या वेळेत कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेसाठी कसून तयार केली आहे. आता नियमांच्या चौकटीत राहून आपलं काम व्यवस्थित करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.
swarajyajanani jeejamata is the first serial to resume shooting in mumbai filmcity