रफ-टफ तापसी! 

taapsee pannu
taapsee pannu

पिंकमधली अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी मिनल ते नाम शबानामधली रफ ऍण्ड टफ गुप्तहेर शबाना या एकूणच प्रवासाबद्दल आणि तिच्या नाम शाबाना या आगामी चित्रपटाबद्दल तापसी पन्नूशी मारलेल्या गप्पा 

दिल्ली ते मुंबई 
चित्रपटसृष्टीत येण्याचा अजिबात विचार नव्हता. लहान असताना मी फारसे चित्रपटही पाहत नव्हते. अभ्यासात मी हुशार होते आणि तितकीच विविध खेळांमध्ये. लहानपणापासूनच मी बिनधास्त स्वभावाची. ऍथलेटिक्‍सबरोबरच अन्य खेळांची मला खूप आवड. मस्ती तर मी खूप करायचे. इतकी, की अनेकदा त्याबद्दल शिक्षाही मिळाली आहे. खेळाची मला खूप आवड होती, पण घरच्या मंडळींनी कधी ओरड केली नाही म्हणजे अभ्यासच कर... जास्त खेळू नकोस... असं काही बजावलं नाही. कारण त्यांना माहीत होतं, की ही खेळाकडे जास्त लक्ष देत असली, तरी अभ्यासही तेवढाच करणार आहे. शाळेत असताना स्कूलची हेड गर्ल, स्टुडंट ऑफ द ईयर मी राहिलेले आहे. 
जेव्हा मी मॉडेलिंगला सुरुवात केली, तेव्हा माझ्या वडिलांना असं वाटलं, की आता ही शिक्षण अर्धवट सोडणार, परंतु तसं काही मी केलं नाही. मी मॉडेलिंग सुरू केलं तेव्हा एकूणच माझा स्वभाव पाहून कित्येकांनी चित्रपटसृष्टीत प्रयत्न कर, असा मला सल्ला दिला, पण मला एमबीए करायचं होतं. मॉडेलिंग करीत असताना चित्रपटसृष्टीत कशी आले आणि आज या इंडस्ट्रीचा कधी एक भाग झाले कळलंच नाही. 

ऍक्‍टिंग आणि डान्स 
मी वयाच्या सहाव्या वर्षापासून डान्स करतेय. आठ वर्षे कथ्थक शिकले आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्या इन्स्टिट्यूटमधून डान्सही शिकलेले आहे; मात्र मला ऍक्‍टिंग काही येत नव्हती. ऍक्‍टिंग मी निरीक्षणाने शिकले. साऊथमध्ये काम करीत असताना बरंच काही शिकायला मिळालं. माझ्या सहकलाकारांकडून मी बरेच काही शिकले. 

गॉडफादरची आवश्‍यकता 
गॉडफादर असला काय आणि नसला काय... काहीही फरक पडत नाही. तुमच्यामध्ये टॅलेंट असणं आवश्‍यक आहे. मी या इंडस्ट्रीत कुणाच्या ओळखीने किंवा वशिल्याने आलेले नाही. माझ्या टॅलेंटवर मला कामं मिळत गेली. तरीही समजा गॉडफादर असला, तर काही गोष्टी सहज उपलब्ध होतात. मी कधीच कोणत्याही चित्रपटासाठी ऑडिशन्स दिली नाही. कारण मी ऑडिशन्स दिली, की हमखास त्यामध्ये नापास झालीच म्हणून समजा. "पिंक'साठीही माझी ऑडिशन्स झाली नाही. ऑडिशन्स झाली असती, तर कदाचित माझी निवड झालीच नसती. 

करिअरमधील टर्निंग पॉइंट 
"पिंक' हा चित्रपट माझ्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा आहे. आता लोक मला चांगल्या अभिनेत्रीचा मान देतात. खरं तर तत्पूर्वी मी काही साऊथमध्ये चित्रपट केले खरे, परंतु तिथे कुणी त्याची खास दखल घेतली नाही. "पिंक' केला आणि सगळ्याच गोष्टींचा कायापालट झाला, परंतु एक सांगू इच्छिते, की मी आहे तश्‍शीच आहे. माझ्या स्वभावात किंवा वागण्यात काही फरक पडलेला नाही. चित्रपट स्वीकारताना मी माझ्याच अटी व शर्तीनुसार स्वीकारते. एखादी स्क्रीप्ट नाही आवडली तर बेधडक नकार देते. कारण मला टिपिकल काम करायचं नाही. चांगल्या भूमिका आणि त्या करताना मला आव्हानात्मक वाटतील अशाच भूमिका करायच्यात. 

कसा होता स्ट्रगल 
स्ट्रगल मला सुरुवातीला तरी करावा लागला नाही. कारण चित्रपट मिळो अथवा न मिळो... मला काही त्याची चिंता नव्हती. आताही नाही; मात्र पहिला चित्रपट यशस्वी झाला आणि माझा स्ट्रगल सुरू झाला. कारण जबाबदारी खूप वाढली. प्रेक्षकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या. त्यामुळे माझा स्ट्रगल आता सुरू झाला आहे असंच मी म्हणेन. 

हॅट्ट्रिक 
"द गाझी अटॅक', "रनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटापाठोपाठ आता माझा "नाम शबाना' हा चित्रपट येतोय. या चित्रपटांवर मी गेली तीनेक वर्षे मेहेनत घेतेय. काही कारणास्तव हे चित्रपट प्रदर्शित व्हायला उशीर झाला. कारण चित्रपट कधी आणि केव्हा प्रदर्शित करायचा हे सर्वस्वी निर्मात्यांवर अवलंबून असतं. ते योग्य अशी तारीख ठरवितात आणि चित्रपट प्रदर्शित करतात. माझा असा काही प्लॅन वगैरे नसतो, परंतु एका गोष्टीचा आनंद आहे, की प्रत्येक महिन्यात माझा एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. लोक मला पसंती देतायत. तसं पाहायला गेलं तर "द गाझी अटॅक' चित्रपटामध्ये माझी भूमिका तशी छोटीशी होती, परंतु ती महत्त्वपूर्ण होती. आता "नाम शबाना'मध्ये माझीच शीर्षक भूमिका आहे. 

प्रिक्वेलमध्ये पहिल्यांदाच 
2015 मध्ये "बेबी' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माझ्या भूमिकेचं कौतुक झालं. खरं तर त्यामध्ये माझी भूमिका छोटीशी होती, पण लोकांना ती पसंत पडली. त्यामुळे तेव्हाच या कॅरेक्‍टरला घेऊन चित्रपट बनवायचं निश्‍चित झालं. त्या कॅरेक्‍टरची बॅकस्टोरी यामध्ये आहे. ती रफटफ आहे. तिची लव्हस्टोरीही आहे. आपल्याकडे सिक्वेल अनेक आले, परंतु प्रिक्वेल पहिल्यांदाच बनतोय. हॉलीवूडमध्ये असा प्रकार सर्रास चालतो. आपल्याकडे हा प्रयत्न पहिल्यांदाच करण्यात आलाय. 

"नाम शबाना'ची तयारी 
माझ्यासाठी तर ही भूमिका खूप चॅलेंजिंग होती. कारण अशा प्रकारच्या मुलीला मी कधी भेटलेले नव्हते. शिवाय माझी पर्सनॅलिटी काही या भूमिकेशी रिलेट करणारी नव्हती. त्यामुळे शॉट देताना अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागत होता. अगोदर कशा प्रकारचा शॉट दिला आहे... आता कशा प्रकारचा द्यायचा आहे वगैरे गोष्टींचं भान ठेवावं लागत होतं. ही मुलगी बोलते कमी आणि जे काही बोलते ते परफेक्‍ट बोलते... डॅशिंग भूमिका आहे ही. यामध्ये मी बंदूक चालवली आहे. तो शॉट देताना मला खूप त्रास झाला. कारण मी कधीच बंदूक पाहिलेलीही नव्हती. बंदूक हातात घेतली की माझा हात दुखायचा. त्याची तयारी केली. काही महिला गुप्तहेरांना भेटले. त्यांच्याकडूनही काही माहिती घेतली. 

साऊथमध्ये काम 
साऊथमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तेथे माझा एक चाहता वर्ग आहे. आता हिंदीत काम करीत असले तरी साऊथ इंडस्ट्रीला काही राम राम ठोकलेला नाही. वर्षाला एक तरी साऊथची फिल्म करायची आहे हे नक्की. 

नवीन प्रोजेक्‍ट 
"जुडवा'च्या सिक्वेलमध्ये काम करतेय. वरुण धवन या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारतोय. "नाम शबाना' चित्रपट प्रदर्शित झाला की लंडनला या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com