
TDM Movie Review: 'टिडीएम'नं मैदान मारलं! जिंदगीला फुल्ल टू भिडणाऱ्या गावा-गावातल्या हिरोंची दमदार गोष्ट..
TDM Movie Review: मराठी मनोरंजन विश्वामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' नावाच्या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. या चित्रपटाची सारेच जण वाट पाहत होते. अखेर आज २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा पाहूया ग्रामीण ढंगाचा 'टिडिएम' नेमका कसा आहे..
बाब्या नावाचा अत्यंत साधारण घरातला हिरो अजूनही इथल्या घरा-घरात आहे. मुंबईतल्या चाळी पासून पार खेड्यापाड्यातल्या गल्ली बोळा पर्यँत. TDM च्या हिरो कडे काय असेल तर परिस्थितीशी दोन हात करण्याचा जिगरा.
म्हणूनच कदाचित तो घोळक्याने शिट्ट्या मारत टगेगिरी करत नाही. तो जबाबदारीने खांदे वाकलेल्या तरी खमक्या असणाऱ्या घरातल्या मुलांसारखा,' मी आहे ना' असं आई- बाप- बहीण यांना म्हणतो आणि कामाला लागतो.
हे सगळं करताना तो कुठलाच आव आणत नाही आणि मुळात या सगळ्या प्रवासात तो कसा भारी हे देखील सिनेमा कुठेच हायलाईट करत नाही. हिरो आणि हिरोईनला उगाच सुपर पॉवर देऊन गुडी गुडी किंवा अगदीच टोकाची भूमिका देत नाही म्हणून भाऊरावांचा TDM उजवा ठरतो. आणि भाऊराव म्हणजे मातीतला सिनेमा हे इक्वेशन ख्वाडा, बबन नंतर TDM मुळे पुन्हा एकदा समोर येतंय.
(TDM marathi Movie Review bhaurao karhade)
१९९५ च्या आसपास घडणारी TDM मधली गोष्ट एका गावातली आहे. ऐतिहासिक सिनेमातला काळ उभा करण्या पेक्षा ही जरा जास्त अवघड. कारण ती अगदी ताजीच तरी जरा अलीकडे घडलेली आहे. ही गोष्ट सांगताना खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्यात. सिनेमाच्या नायकावर असणारा तत्कालीन नट- नट्या, सिनेमाच्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाणी या सगळ्याचा प्रभाव.
रेडिओ, स्वतःच्या मालकीचं ट्रॅक्टर असावं म्हणजे आपल्याला जास्त पैसे कमावता येतील एवढं साधंसं स्वप्नं. आणि दूरवरून कधी उगा मजनू गिरी करत आपल्या प्रेयसीच्या मागे पुढे फिरणं हा काय तो जीव रमवण्याचा चाळा. आणि ती पण अगदी साधीशी, तरी काहीशा तोऱ्यात असणारी. या दोघांचं पात्र निभावणारे पृथ्वीराज आणि कालिंदी इतक्या सहजपणे फिल्म मध्ये वावरतात की आपण लहान असताना आपल्या डोळ्यांसमोर प्रेमाच्या गुलाबी रंगात न्हाईलेले ताई - दादा, मामा - मावश्या हेच जणू असं चटकन वाटून जातं.
तरीही सिनेमाची ही मुख्य पात्र जितकी महत्वाची तितकीच बाब्याची बहीण असलेली शितलही. सोसायटी मेंबर हे पात्र सिनेमात खुद्द भाऊराव साकारतायत आणि तो या फिल्मचा सगळ्यात भारी सरप्राईज एलिमेंट आहे. जरा वेगळ्या नजरेने पाहिलं की कळत अरे हा या फिल्मचा सूत्रधार आहे. जो एक - एक घटना दुसऱ्या घटने सोबत बेमालूमपणे जोडतोय.
एका सिनमध्ये याच पात्राचा एक डायलॉग आहे 'न्हाई न्हाई मी तर फक्त वाजंत्री आहे' आणि हसल्या शिवाय राहवत नाही. खऱ्या अर्थाने भाऊराव जिथे जिथे आहेत तो तो सिन त्यांनी वाजवून आणि गाजवून सोडलाय. फार थोडे डायलॉग्ज, अजिबात नसलेला धांगडधिंगा या सगळ्यामुळे सिनेमातला मिनीमलिझम भाव खाऊन जातो.
दोन तीन ठिकाणी असं वाटतं की स्क्रीन प्ले अजून टाईट होऊ शकला असता पण बकुळा गाणं, जिथे - जिथे पाणी आहे तिथे त्याचा सुंदर वापर, सायकलच्या पंपने बाब्याचं नीलमवर वर फुलं अलगद उधळण, जिवाच्या आकांताने बाब्याच्या बापाने त्याच्या बहिणीला सायकल वरून सासरी सोडायला जाताना पायडल मारण, या सगळ्या बोलक्या फ्रेम्स मुळे थोडं आडबाजूलाच पडतं.
तरी शेवटाकडे स्क्रिनप्ले मधलं जोडकाम थोडं ठळकपणे दिसून येतच हे नाकारता येत नाही. असं असूनही TDM ची गाणी टॉप गियर टाकल्या वाचून राहत नाही हे मात्र तितकंच खरं आहे.
सिनेमातली तीनही गाणी सिनेमा पुढे नेतात आणि ती फिल्म मधून काढून टाकली तर फिल्मचा आत्माच काढून टाकल्या सारखं होईल. एक फुल वाहतो सखी, मन झालं मल्हारी दोन्ही गाणी इतकी भारी झाली आहेत की भाई ये भाऊराव सर की फिल्म हैं असं म्हटल्या वाचून राहवत नाही.
कारण गाणी कुठं असावीत, कशी असावीत याचं परफेक्ट गणित त्यांना कळतं. विनायक पवार, कुणाल गायकवाड, वैभव शिरोळे यांनी फार सोप्या शब्दात वेड लावतील अशी गाणी लिहिली आहेत. कंपोज केली आहेत. बकुळा गाण्याला नंदेश उमपचा पहाडी आवाज आणि त्या आवाजातलं एक वेगळंच गाण्याला साजेसं गदगदलेपण याने आपण खरंच भारावून जातो. लग्नाच्या सिजनमध्ये ही गाणी आवर्जून वाजतील, गाजतील आणि भाव खाऊन जातील अशी आहेत.
TDM ही लव्हस्टोरी नाही समाजाचा मायक्रो ऍनालिसिस आहे. रोजगार निर्मिती, राजकारण, कौटूंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यातून तयार होणारी ऐन उमेदीच्या वयातली हतबलता या सगळ्या सोबत फुलणारं तरी आक्रसताळ आणि उतावीळ नसलेलं प्रेम म्हणजे TDM. भाऊराव हे करताना कुठेच स्टंटबाजी करत नाही. साधी गोष्ट तितक्याच सहज आणि सोपे पणाने सांगतात आणि हे सांगता येण खूप अवघड आहे.
"आयुष्याची लढाई पळून न्हाई जिंकता येत" हे सोपं तरी गहीरं असं तत्वज्ञान बाब्या एका बाका प्रसंगात प्रेयसीला सांगतो. आणि हिरो असला म्हणून काय झालं प्रत्येकदा पेटून उठायचंच असतं असं नाही न हे आपसूक आपल्याला कळतं. प्रेम आहे म्हणून जिद्दीला न पेटता, सतत बंड न पुकारता कधी कधी परिस्थितीला स्वतःच्या पद्धतीने मॅनेज करणारा हा बाब्या घराघरात टिकून राहिला पाहिजे.
आता TDM म्हणजे काय ते मात्र जाणून घ्यायचं असेल तर सहकुटूंब, सह परिवार किंवा एकट किंवा जोडीने कीवा जसं हवं तसं पण आवर्जून TDM पहा, ज्यांना मलर, 96 सारखे सिनेमे आवडले आहेत, ज्यांनी तोंडभर या सिनेमांचं कौतुक केलं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना साई पल्लवी चा साधेपणा भावतो त्यांनी कालिंदीसाठी TDM नक्की थिएटर्समध्ये जाऊन पाहा. कारण या सिनेमातली प्रत्येक फ्रेम इमानी आहे.
- विशाखा विश्वनाथ