
Tejaswini Pandit:'आणि तेजस्विनीनं त्या दिवसानंतर वडापाव खाणं बंद केलं..',अभिनेत्रीनं भावूक होत केला खुलासा
Tejaswini Pandit: 'मला वडापाव आवडत नाही' किंवा 'मी वडापाव खात नाही' असा किमान महाराष्ट्रात तरी आपल्याला खूप शोधून एखादा माणूस सापडेल. कारण ज्या वडापावानं जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलंय त्याचा महाराष्ट्रातला फॅन फॉलॉइंग तसा मोठाच म्हणावा लागेल. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीही नाकातून पाणी आणि कानातून जाळ आला तरी वडापावचा आनंद मोठ्या खुशीत घेताना दिसतात.
पण असं असताना सध्या 'रानबाजार' फेम अभिनेत्री तेजस्विनी पंडीतच्या वडापाव विषयीच्या एका विधानानं मात्र चाहतावर्ग हळहळला आहे. कारण 'मी वडापाव खाणं तेव्हापासून सोडलं..' हे वाक्य बोलताना 'पटलं तर घ्या' शो मध्ये तेजस्विनी भावूक झालेली दिसली अन् चाहत्यांना त्यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागली. चला याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
'पटलं तर घ्या' हा सेलिब्रिटी चॅट शो सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. हा कार्यक्रम सध्या आपण विनाशुल्क पाहू शकत आहोत. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिग्दर्शक अभिजित पानसे आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आले होते. दोघांनीही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी खुलासे या चॅट शो मध्ये केले आहेत.
या शो मध्ये तेजस्विनीला एका राऊंड अंतर्गत एक वाक्य दिलं आणि ते वेगवेगळ्या स्टाईलनं बोलायला सांगितलं. ज्यात मादकपणे,चिडून आणि भावूक होऊन ते बोलायचं होतं. 'मला भूक लागलीय आणि मला वडापाव खायचा आहे'. असं ते वाक्य होतं.
आणि इथेच मादकपणे,रागावून ते वाक्य बोलताना खळखळून हसणारी तेजस्विनी भावूक होऊन ते वाक्य बोलताना मात्र गतकाळाच्या आठवणीनं तुटल्यासाऱखी वाटली...काय झालं असं नेमकं?
'मला भूक लागलीय आणि मला वडापाव खायचा आहे' हे वाक्य आपण भावूक होऊन बोलू शकत नाही हे बोलत तिनं यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.
जेव्हा 'पटलं तर घ्या' या शो ची होस्ट जयंती वाघधरेनं तेजस्विनीला 'मला भूक लागलीय आणि मला वडापाव खायचा आहे' हे भावूक होऊन म्हण असं सांगितलं तेव्हा तेजस्विनी म्हणाली,''मी खरं सांगू का,तर मी वडापाव खाणं फार वर्षापूर्वी सोडून दिलं आहे. माझा एक मित्र आहे जो आता या जगात नाही. पण त्याच्यासाठी मी खरंच वडापाव खाणं सोडून दिलं आहे. मला भूक लागलीय,पण मला वडापाव खायचा नाही ..'',असं यावेळी तेजस्विनी भावूक होत म्हणाली.
सध्या तेजस्विनी पंडीत केवळ अभिनेत्री राहिलेली नाही तर आता निर्मातीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसत आहे. तिनं 'पॉंडिचेरी','चंद्रमुखी','अथांग' या कलाकृतींनंतर आता 'बांबू' हा सिनेमा प्रोड्युस केला आहे,जो प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
सध्या सगळीकडेच बांबूची चर्चा रंगली आहे. तेजस्विनीच्या 'अथांग' या वेबसिरीजनं देखील निर्माती म्हणून तिचा एक दर्जा क्लास ठरवून टाकला आहे. आता केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणूनही तेजस्विनीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.