टेलिव्हिजन माझ्यासाठी लकी... 

तेजल गावडे 
शनिवार, 21 जानेवारी 2017

"जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मेघना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आता नव्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येतेय. झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली "नकटीच्या लग्नाला यायचं हं...' या मालिकेत ती नुपूर ही मध्यवर्ती भूमिका साकारतेय. त्या निमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत... 

"जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मेघना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आता नव्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येतेय. झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली "नकटीच्या लग्नाला यायचं हं...' या मालिकेत ती नुपूर ही मध्यवर्ती भूमिका साकारतेय. त्या निमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत... 

"जुळून येती रेशीमगाठी'नंतर तू पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे. त्याबद्दल काय सांगशील? 
खरंतर माझ्या डोक्‍यात मालिका न करण्याचा विचार सुरू होता. फक्त नाटक व चित्रपटाकडे लक्ष केंद्रित करायचं मी ठरवलं होतं; पण या मालिकेचा विषय इतका छान आहे की, मला ही संधी अजिबात सोडायची नव्हती. ही मालिका साधारण चार-पाच महिने म्हणजे जवळपास 100 ते 125 एपिसोडची असणार आहे. त्यामुळे हा प्रोजेक्‍ट थोडक्‍यात संपणार आहे. त्यात ही मालिका झी मराठीवर आहे. "झी'चा प्रेक्षकवर्ग खूप चांगला आहे. यापूर्वी झी मराठीवर केलेल्या "जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील मेघना या पात्राच्या अगदी अपोझिट भूमिका साकारायला मिळतेय. या मालिकेत माझी मध्यवर्ती भूमिका आहे. इंडस्ट्रीतल्या ज्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करण्याची मला इच्छा होती. ते सगळे कलाकार या मालिकेत वर म्हणून मला पाहायला येणार आहेत. यानिमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे. तसंच या प्रोजेक्‍टमुळे अभिनयाची माझी सगळी हौसमौज पूर्ण होतेय. त्यामुळे या मालिकेसाठी लगेचच होकार कळवला. 

"नकटीच्या लग्नाला यायचं हं...' या मालिकेबद्दल सांग? 
या मालिकेची कन्सेप्ट खूप भन्नाट आहे. या मालिकेत देशपांडे नावाचं कुटुंब दाखविण्यात आलंय. यातील मी नुपूर ही मध्यवर्ती भूमिका साकारलीय. ती अतिशय अल्लड व लग्नवेडी आहे. लग्न हेच तिचे स्वप्न असते. त्यामुळे या व्यतिरिक्त तिला दुसरं काहीच सुचत नाही. कुठलाही प्रश्‍न विचारला तरी ती गोल गोल फिरत लग्नापाशीच येते. तिने 40-42 अपेक्षांची यादी बनवून घरंच्यांकडे दिलीय. जवळपास तिला 25-26 स्थळं बघायला येणार आहेत. या मालिकेत दर आठवड्याला सेलिब्रेटी मंडळींची हजेरी लागणार आहे. या सर्वांच्या व्यक्तिरेखाही धमाल पद्धतीने लिहिलेल्या आहेत. 

या मालिकेतील इतर पात्रांबद्दल सांग? 
नुपूरला दोन आज्या आहेत, म्हणजे आजोबांची एक लग्नाची बायको आणि एक प्रेमाची बायको. काका-काकी, आईवडील, चुलत भाऊ, आत्याचा नवरा जो घरजावई आहे आणि त्यांचा एक मुलगा अशी त्यांची जॉईंट फॅमिली आहे. प्रत्येकाच्या काहींना काही तऱ्हा आहेत. मालिकेतील माझी आई खूप पॉझिटिव्ह आहे. माझे बाबा खूप भावनिक आहेत. काकू स्पष्टोक्ती आहे, ती मनात येईल ते पटकन बोलून मोकळी होते. तर माझे काका अतिशय कंजूस आहेत. माझा चुलत भाऊ अतिशय माठ असल्यामुळे त्याचं प्रत्येक आठवड्याला ब्रेकअप होतं. त्यामुळे तो त्रासलेला आहे. माझा आतेभाऊ फॉरेन रिटर्न आहे. तो या सगळ्यांना मूर्ख समजतो. खरेतर घरात तो एकटाच शहाणा व्यक्ती आहे. माझी आत्या ही देवभोळी आहे. ती सतत मंत्र, जप जाप आणि मौनव्रत धारण करत असते. आत्याचा नवरा 24 तासांपैकी 20 तास फुल टू टाइट असतात. अशी ही फॅमिली आहे. 

मालिकेत तुला "नकटू' असं लाडाने का संबोधलं जातं? 
या मालिकेचं शीर्षक "नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' या म्हणीवरून ठेवण्यात आलंय. पण तसंच न घेता सकारात्मक शीर्षक म्हणून "नकटीच्या लग्नाला यायचं हं...' असं देण्यात आलंय. यात नकटी शब्द असल्यामुळे घरातले सगळे प्रेमाने "नकटू' अशी हाक मारतात. 

आतापर्यंतचा अनुभव कसा होता? 
खूपच छान अनुभव होता. कारण पूर्णिमा तळवलकर, शंकुतला नरे, संजय कुलकर्णी, अभिनय सावंत व अभिजित आमकर अशी छान मंडळी या मालिकेत माझ्यासोबत आहेत. आम्ही ऑनस्क्रीन जेवढी धमाल करतो, त्याहून जास्त धम्माल ऑफस्क्रीन वेळी करतो. खरं तर सीन हातात आल्यावर आम्ही सगळे 10-15 मिनिटे त्याच्यावर खळखळून हसतो आणि मग आम्ही शूट करतो. अन्यथा, आम्ही चित्रीकरण करू शकलो नसतो. इतक्‍या छान छान गोष्टी लिहून येतात. प्रत्येक आठवड्याला आमच्याकडे नवीन पाहुणा येतो. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन उत्सुकता लागून राहिलेली असते. विनोदी मालिका कधी केली नव्हती. त्यामुळे अशापद्धतीचं काम करायला मिळालं, याबद्दल झी मराठी वाहिनी व राईट क्‍लिक मीडिया सोल्युशनचे अतुल केतकर यांची मी आभारी आहे. 

नाटक, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमांपैकी तू कशाला जास्त प्राधान्य देशील? 
मला चित्रपट करायला जास्त आवडेल; मात्र मला सर्वांत जास्त लोकप्रियता ही टेलिव्हिजनने मिळवून दिलीय. माझं आयुष्य जे काही बदललं आहे, ते छोट्या पडद्यामुळेच. मला अभिनय क्षेत्रात काम करण्याची पहिली संधीही मालिकेतूनच मिळाली. टेलिव्हिजन माझ्यासाठी लकी आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही; पण मला रोजच मालिकेसाठी चित्रीकरण करण्यापेक्षा खूप क्रिएटिव्ह आणि मोजकं काम करायला जास्त आवडेल. त्यामुळे चित्रपट हे माध्यम मला जास्त आवडेल. 

आगामी प्रोजेक्‍ट्‌सबद्दल सांग? 
दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या चित्रपटात मी काम करतेय. त्याचं संपूर्ण चित्रीकरण हंपीमध्ये पार पडलं. या चित्रपटाची कथा तीन पात्रांभोवती फिरते. मी, ज्युनियर सोनाली कुलकर्णी व ललित प्रभाकर आमच्या यात मुख्य भूमिका आहेत. आम्ही दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत. सुट्टी एंजॉय करण्यासाठी हंपीला गेलो आहोत. तिथे आमची एका मुलाशी भेट होते आणि मग तिथून आमचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. सचिन दरेकर यांचा चित्रपटही मी केलाय. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय आणि हाही चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. सुव्रत जोशी माझ्यासोबत या चित्रपटात आहे. 

Web Title: Television lucky for me : prajkta mali