
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली आहे. त्या माध्यमातून नाट्यगृह सुरू करणे हा पहिला अजेंडा आहे.
Prashant Damle : 18 ते 35 वयातील तरुण पिढी नाटकाकडं यायला पाहिजे, पण तसं होत नाही; दामलेंनी व्यक्त केली खंत
कऱ्हाड : राज्यातील ४९ नाट्यगृहांपैकी फक्त दोन नाट्यगृहे (Theaters) सोडली तर उर्वरित नाट्यगृहे चांगल्या परिस्थितीत नाहीत. ती चांगली करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक सचिव यांनी त्याला सकारात्मक पाठिंबा दिल्याची माहिती अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी दिली.
दै. ‘सकाळ’च्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या नाट्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘कॉफी विथ कलाकार’ यामध्ये अभिनेते दामले बोलत होते. सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, सकाळचे उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, चितळे डेअरीचे मार्केटिंग प्रमुख निवास गुरव, शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप सोसायटीचे संदीप डाकवे, यशवंत बँकेचे शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, सकाळचा नाट्यमहोत्सव असला की तो यशस्वी होतोच. पश्चिम महाराष्ट्रात कऱ्हाडला पहिलाच ‘सकाळ’तर्फे नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे नाटक आहे. नाटकाला घेऊन हा महोत्सव होत आहे, ही खूप समाधानाची बाब आहे. वेगवेगळ्या पद्धतीतून लोकांपर्यंत पोहोचण्याचे हे माध्यम आहे. पेपर वाचताना जेवढी मजा येते, तेवढीच मजा नाटक सादर करताना येते.'
'नाटक तयार होण्यापूर्वी खूप मेहनत करावी लागते. रंगमंचावर सादरीकरण करणे ही खूप समाधानाची बाब आहे. कॉमेडी नाटक प्रेक्षकावर अवलंबून असते. सिरियस नाटक मात्र कलाकारांवर अवलंबून असते. मराठी नाट्यरसिकांची संख्या कमी नाही. मात्र, तरुण पिढी नाटक बघायला येत नाही. मराठी नाट्यरसिक पूर्वापार चालत आलेत ते तसेच आहेत. चांगल्या नाटकासाठी रसिक येतातच. त्यांना फक्त नवीन नाटकांची गरज असते.'
१८ ते ३५ वयातील तरुण पिढी जेवढ्या प्रमाणात नाटकाकडे यायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात येत नाही. नाटक चालले तरच खर्चाचा ताळमेळ बसतो. नाटकाच्या प्रेक्षकाचा आयक्यू पहिल्यापासून तसाच आहे. त्यामुळे त्यात फारसा फरक पडलेला नाही. मराठी नाटक मराठी चित्रपटापासून प्रेक्षकांना मोठी अपेक्षा असते. प्रेक्षक आता सजग झाले आहेत. त्यांच्यापुढे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. नाटकाची सादरीकरणाची ताकद चांगली असेल तर नाटके ही चालतातच.
दामले म्हणाले, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली आहे. त्या माध्यमातून नाट्यगृह सुरू करणे हा पहिला अजेंडा आहे. १४ जूनला त्याचा प्रारंभ करत आहोत. महाराष्ट्रातील नाट्यकर्मी मुंबईत आल्यानंतर त्यांच्या राहण्याची सोय करण्याचाही मानस आहे. नाट्यपरिषदेच्या असणाऱ्या राज्यातील शाखा अॅक्टिव्ह करण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या शाखा अॅक्टिव्ह नाही त्या बंद करण्यात येतील.
नाट्य परिषदेची जी कामे आहेत ती रसिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. नवीन कलाकारांना संधी देणे त्यांना पाठिंबा देणे हे महत्त्वाचे आहे. मराठी नाटकांच्या पाठीमागे शासन कायम उभे राहिले आहे. ४९ नाट्यगृहांपैकी फक्त दोन नाट्यगृहे सोडली तर उर्वरित नाट्यगृह चांगल्या परिस्थितीत नाहीत. ती चांगली करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक सचिव यांनी त्याला सकारात्मक पाठिंबा दिला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे.
आत्ताच्या सरकारचे चित्र आशादायक आहे. राज्यातील मोठ्या उद्योगसमूहाने नाट्यगृह उत्तम स्थितीत आणण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. सर्व नाट्यगृह सुस्थितीत येऊन सुरू झाल्यास नाटकांनाही चांगले दिवस येतील. नाटकाकडे वळणाऱ्या तरुणांनी आपल्या आई-वडिलांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेतले पाहिजे. मराठी नाटकात काम करताना मराठी भाषेवर प्रभुत्व असणे खूप महत्त्वाचे आहे.
कलाकार होताना खालून वर जाणे महत्त्वाचे आहे. मराठी नाटकांचा प्रतिसाद हा त्या त्या भागावर व नाटकाच्या विषयावर अवलंबून राहात आहे. खूप क्लिस्ट विषय विनोदी अंगाने मांडल्यास त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. गंभीर विषयावरीलही हलकी फुलकी नाटके चांगली चालतात. नाटकातील शब्दांचा वापर कोणत्या पद्धतीने केला आहे, हेही महत्त्वाचे असते.
‘सकाळ’ने दिले नाट्य चळवळीला बळ
‘सकाळ’चा नाट्यमहोत्सव असला की तो यशस्वी होतोच, असे सांगून श्री. दामले म्हणाले, दै. सकाळने नाट्य महोत्सव आयोजित करून नाट्य चळवळीला बळ दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कऱ्हाडला पहिलाच ‘सकाळ’तर्फे नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे नाटक आहे. नाटकाला घेऊन हा महोत्सव होत आहे, हे खूप समाधानाची बाब आहे. वेगवेगळ्या पद्धतीतून लोकांपर्यंत पोचण्याचे हे माध्यम आहे.
प्रेक्षकांसाठी आज व उद्या पर्वणी
दै. ‘सकाळ’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवात आज (बुधवार) संकर्षण कऱ्हाडे यांचे ‘नियम व अटी लागू’ तर गुरुवारी अभिनेते भरत जाधव यांचे ‘तू तू मी मी’ हे नाटक नाट्यरसिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सायंकाळी साडेनऊ वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.