तनुश्री विरुद्ध नाना वादात 'या' प्रतिक्रियांची चर्चा! ; रेणुका शहाणे यांचे खुले पत्र

These reactions are popular in Tanushree versus Nana dispute
These reactions are popular in Tanushree versus Nana dispute

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री तनुश्री दत्ता विरुद्ध नाना पाटेकर असा वाद रंगला आहे. 'माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले आहे,' असा आरोप तनुश्रीने केला आहे. या प्रकणावर आलेल्या काही सेलेब्रिटीजच्या प्रतिक्रियांचेही काही सकारात्मक काही नकारात्मक असे पडसाद उमटत आहेत.

राखीनेही प्रकरणात खाल्ले फुटेज :
राखी म्हणाली, 'ज्या गाण्याचं शुटींग तनुश्री करणार होती ते गाणं ऐनवेळी मी शूट केलं. कारण मला एकदिवस गणेश आचार्य यांचा फोन आला. त्यांनी मला लगेच 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर येण्यास सांगितले. मी त्यांना बाकी तपशील विचारला असता त्यांनी मला आपण एक गाणे बसवतोय तर तू ये इतकंच सांगितलं. त्यांच्या शब्दाचा मान राखून मी सेटवर गेले. मात्र तिथे गेल्यानंतर मला दिसलं की सेटजवळ उभी असलेल्या मेकअप व्हॅनच्या काचा फुटल्या होत्या. मी याविषयी आचार्य यांना विचारले तर त्यांनी सांगितलं की, तनुश्री या गाण्यात नाचणार होती. पण ती सेटवरुन परतली आणि चार-पाच तासापासून ती व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडायला तयार नाही. त्यावेळी तनुश्रीने ड्रग्ज घेतल्याचे एका मेकअप आर्टिस्टने सांगितले. त्यामुळे तनुश्री बेशुध्द पडली होती.'
 



नाना पाटेकर यांनी प्रकरणावर सोडले मौन :
67 वर्षीय नाना यांनी या प्रकरणावर म्हटले आहे की, 'ती असं का करत आहे. यावर मी काय बोलू शकतो? सेटवर माझ्यासोबत 50 ते 100 लोक होते. एवढ्या लोक आजूबाजूला असताना मी तिच्याशी गैरवर्तन कसं करु शकतो? मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. ज्यांना जे बोलायचं आहे ते बोलू देत, मी माझं काम करत राहील.' 

बिग बींच्या भूमिकेवर तनुश्री नाराज :
तनुश्री विरुद्ध नाना या वादावर अमिताभ बच्चन यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 'मी तनुश्री किंवा नाना पाटेकर नाही.' असं म्हणत बिग बी यांनी प्रकरणाबाबत बोलणं टाळलं. या त्यांच्या भूमिकेवर तनुश्रीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मी खूप दुखावले आहे. बिग बी हे नेहमी सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविला जाईल असे सिनेमे लोकांपर्यंत जातील यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीसोबत चूकीचे घडत असेल तर त्या व्यक्तीच्या सोबत उभे राहण्याऐवजी अशा प्रकारची भूमिका घेणं हे फार अयोग्य आहे.'

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केलं मत :
'महिलांच्या व्यक्तीमत्त्वात बदल होत आहे. मी देखील आधी चार भिंतींमध्येच राहत होते. मात्र मी स्वत:त बदल केले. मी टीव्ही, रेडिओ जास्त पाहत किंवा ऐकत नाही, त्यामुळे तनुश्री - नाना वादात नेमकं काय झालं हे मला माहित नाही. पण एक महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी जाहीरपणे बोलू लागली आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे. महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. जर महिलांनी मौन बाळगलं तर अन्याय करणाऱ्याला सूट मिळत राहिल.' 

रेणुका शहाणे यांनी लिहीलं खुलं पत्र :
'मी नाना पाटेकर किंवा तनुश्री दत्तासोबत काम केलेलं नाही. मी ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमातही नव्हते. पण तनुश्रीच्या प्रकरणात अनेक असे मुद्दे आहेत, जे मी स्वत:शी जोडू शकते. नाना पाटेकर यांचा रागीट स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. पण ते शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दलही ओळखले जातात. गाण्याच्या शूटींग दरम्यान कदाचित तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा नानांचा उद्देश नसेलही. पण जर ती स्टेप तनुश्रीला खटकत होती, नानांचा स्पर्श तिला खटकत होता, तर त्यात बदल करणं ही नानांसह दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर यांची जबाबदारी नव्हती का? ती स्टेप बदलली असती तर सिनेमात फार मोठा असा काही फरक पडणार होता का? फक्त एका स्टेपमध्ये बदल केल्याने सिनेमा फ्लॉप झाला असता का? त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी एखाद्याची मुलगी तनुश्री असती तर तिच्यासोबतही असंच घडलं असतं का? शेवटी स्वत:ची मुलगी असणे आणि मुलीसारखी असणे यात हाच फरक असावा.

आता या घटनेच्या परिणामांकडे वळुयात. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याच पुरुषाचं नंतर काहीच बिघडलं नाही. त्यांनी त्यांचा अहंकार जिंकला. पण त्या घटनेचा सर्वाधिक परिणाम कोणावर झाला असेल तर ती व्यक्ती म्हणजे तनुश्री. तिचं करिअर उध्वस्त झालं. एखाद्या व्यक्तीला धमकावणं कधीच योग्य नसतं. माझ्या मते तनुश्री खूप धाडसी आहे.'





संबंधित बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com