'मोगरा फुलला'मधून पुन्हा एकदा शंकर महादेवन प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

“हलके अन् हळुवारसा.. हो मुका अन अलवारसा... अधिऱ्या अधिऱ्या या अंगणी, अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी... मोगरा फुलला, मोगरा फुलला...” या बोलाचे हे शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी गायले आहे. 

‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“हलके अन् हळुवारसा.. हो मुका अन अलवारसा... अधिऱ्या अधिऱ्या या अंगणी, अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी... मोगरा फुलला, मोगरा फुलला...” या बोलाचे हे शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी गायले आहे. 

स्वप्नील जोशी, त्याची आई नीना कुलकर्णी, सई देवधर आणि इतर कलाकारांवर चित्रीत झालेले हे गाणे जणू चित्रपटाच्या कथेचे सार सांगून जाते. मनाच्या विविध स्थिती अधोरेखित करताना, चित्रपटाचा नायक आणि यातील इतर पात्रांची नेमकी स्थिती या गाण्यातून समोर येते. विविध मानवी भावभावनांचा हिंदोळा या कथेतून हळुवार हाताळला गेला आहे, याची एक पुसटशी कल्पना या गीतातून येते.

पद्मश्री विजेते शंकर महादेवन हे नाव मराठी संगीत आणि चित्रपटसृष्टीला नवीन नाही. ‘कट्यार काळजात घुसली’मधील अभिनयातून तर ते मराठी घराघरात पोहोचले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठीमध्ये अनेक गाणीही गायली आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’मधील गाण्यांबरोबरच त्यांचे माझ्या मना... (लग्न पाहावे करून), मन उधाण वाऱ्याचे... (अगं बाई अरेच्चा) ही गाणी मराठी रसिकांच्या ओठावर रेंगाळत असतात.

“मराठी चित्रपटसृष्टी प्रत्येकबाबतीत प्रगल्भ आहे. मराठीमध्ये गायला मला नेहमीच आवडते. ‘मोगरा फुलला’मधील अनुभवही अगदी वेगळा होता कारण गाण्याचे बोल आणि त्यांना दिलेली चाल अगदी मधुर अशीच आहे,” महादेवन म्हणतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: title song of Marathi movie Mogara Fulala by Shankar Mahadevan