'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' स्पर्धेत ६४ पुरस्कार प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vanava Short Film
खेडच्या पश्चिम पट्यातील आदिवासी तरुणाची गरुड झेप

Vanava Short Film : 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' स्पर्धेत ६४ पुरस्कार प्राप्त

चास - खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्यातील नायफड गावातील दत्तात्रेय हैबती तिटकारे याने दिग्दर्शित केलेल्या ‘वणवा’ या लघुपटाला २३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव स्पर्धेत देश, विदेशातून आलेल्या चित्रपटात तब्बल ६४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

खेड तालुक्याच्या भीमाशंकर जवळ असलेल्या नायफड या छोट्याशा आदिवासी भागातील तरुण तिटकारे हे चौदा वर्षांपासून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असून, त्यांनी आत्तापर्यंत पंधरा मराठी चित्रपट, एकवीस सीरियल, सहा वेब सीरिज, अकरा लघुचित्रपट तयार केले आहेत. आपणही लघुपट काढून निर्मिती क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवावा, या भावनेतून त्यांनी स्वतः लेखन, दिग्दर्शन, अभिनय करत एका उध्वस्त कुटुंबाची कहाणी सादर करीत ‘वणवा’ची निर्मिती केली.

या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण केडगाव (ता. दौंड) या ठिकाणी केलेले आहे. याचे निर्माता हैबती तिटकारे, सुषमा तिटकारे, सह निर्माता निसर्ग तिटकारे, संकल्प निसरड, सह दिग्दर्शक प्रतीक तिटकारे, वैनतेय भोसले, छायाचित्रण व संपादन अनिल लांघे यांनी केले असून, प्रमुख कलाकार दत्तात्रेय तिटकारे, शरांन्या ठोंबरे, रविशा तेलधूने, भूषण घोलप, बाल कलाकार ओवी देठे, मुकेशी नट, सहकलाकार प्रतीक तिटकारे, संजय तिटकारे, राजू भनभने, श्रीकांत काटे या कलाकारांनी अभिनय केला आहे.

या वेळी तिटकारे म्हणाले की, लवकरच क्रांतिवीर सतू मराडे यांच्या जीवनावर बंडकरी चित्रपटाची निर्मिती करणार असून, याचे संपूर्ण चित्रीकरण भीमाशंकरजवळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Entertainmentmovieaward