नवा चित्रपट : धर्मवीर : बेधडक राजकारण्याची ‘अनोखी’ गोष्ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dharmveer marathi movie

‘धर्मवीर’ची कथा ‘प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट’ अशी वेगळ्याच धाटणीची आहे. आपण नजीकच्या काळात ‘बालगंधर्व’पासून ‘ठाकरें’पर्यंतचे अनेक बायोपिक अनुभवले आहेत.

नवा चित्रपट : धर्मवीर : बेधडक राजकारण्याची ‘अनोखी’ गोष्ट!

आनंद दिघे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं कुंड. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आणि ठाण्यात आपल्या कार्यकर्तृत्वानं अजरामर झालेले धर्मवीर. प्रवीण तरडे दिग्दर्शित व प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा दिघे यांच्या धडाकेबाज, अनेक वादांनी भरलेल्या, ‘लोकनायक’ होण्याच्या त्यांच्या प्रवासातील सर्व टप्पे विस्तारानं मांडणारा चित्रपट एका राजकारण्याची जगावेगळी गोष्ट, चांगली पटकथा व नेटक्या अभिनयामुळं गुंतवून ठेवतो. तत्कालीन राजकारण्यांची मानसिकता, त्यात दिघे यांचं उठून दिसणारं वेगळेपण, आपल्या लोकांसाठी मरण्या-मारण्यास तयार असलेल्या या राजकारण्यावरचं लोकाचं प्रेम या सर्वच गोष्टी नेमकेपणानं टिपण्यात दिग्दर्शकाला आलेलं यश आणि आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकनं भरलेले अनेक रंग यांमुळं चित्रपट अविस्मरणीयही झाला आहे.

‘धर्मवीर’ची कथा ‘प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट’ अशी वेगळ्याच धाटणीची आहे. आपण नजीकच्या काळात ‘बालगंधर्व’पासून ‘ठाकरें’पर्यंतचे अनेक बायोपिक अनुभवले आहेत. मात्र, अगदी ‘केजीएफ’सारख्या केवळ कल्पना असलेल्या चित्रपटांमध्ये दिसणारा ‘रॉबिनहूड’ नायक प्रत्यक्षात होऊन गेला, यावर आपला विश्‍वास बसत नाही. लोकांच्या घरांतील देव्हाऱ्यात स्थान मिळवलेला राजकारणी तसा विरळाच! आनंद दिघेंना हे भाग्य लाभलं. तरडे यांनी दिघेंचा जीवनपट रेखाटताना अनेक जणांशी बोलून कथा लिहिली व त्यांच्या आयुष्यातील घटना समजावून घेतल्या आहेत. (गुगलवर त्यांच्याबद्दल अगदीच दोन ओळी आहेत आणि त्या त्यांना केवळ खलनायक म्हणून चितारतात.) ते सर्व प्रसंग अत्यंत जिव्हाळ्यानं, त्यांना धमाकेदार संवादांची जोड देत मांडण्यात त्यांना यश आलं आहे. दिघेंचा कोणताही आगापीछा न दाखवता थेट शिवसेनेचा ‘फायरब्रॅण्ड’ नेता म्हणून ते आपल्याला दिसू लागतात. हिंदूंवर अन्याय होताना दिसताच पेटून उठलेलेही दिसतात. बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिष्य असलेल्या दिघेंची या मागची मानसिकता त्याचं बालपण किंवा तारुण्य कसं होतं हे दाखवून पटवून देता आलं असतं, मात्र चित्रपटातून ते समोर येत नाही. एकामागून एक येणाऱ्या प्रसंगातून त्यांची प्रतिमा अधिकाधिक उंच, ‘लार्जर दॅन लाइफ होत जाते व (ठाणेकरांसाठी) त्यांनी केलेल्या कामाचं वेगळेपण प्रेक्षकांच्या मनावर ठसवलं जातं. यामध्ये अनेक वादग्रस्त प्रसंगांना कात्री लावल्याचं स्पष्ट दिसतं आणि त्यामुळं दिघेंची प्रतिमा अधिक मोठी होत जाते.

चित्रपटाची गोष्ट आपल्याला एक पत्रकार (श्रुती मराठे) व रिक्षावाला समीर (गश्‍मीर महाजनी) यांच्या संवादांतून अधिक उलगडते. क्षितिज दाते (एकनाथ शिंदे) यांच्या आयुष्यावर दिघेंचा मोठा प्रभाव होता आणि ही समांतर गोष्ट आपल्याला मध्यंतरानंतर सांगितली जाते. त्यातील अनेक प्रसंग आजपर्यंत कोणाला ज्ञात नव्हते. हा सर्व भाग अत्यंत हळवा झाला आहे. यामध्ये दिघेंना साथ करणाऱ्या राजन विचारे व मो. दा. जोशी आदी तत्कालीन राजकारण्यांबद्दलही आपल्याला समजते, मात्र ते खूप वरवरचे आहे. मो. दा. जोशींना विधानसभेचे तिकीट मिळवून देताना दिघेंनी केलेलं ‘राजकारण’ हा भाग मस्त जमला आहे. बाळासाहेब ठाकरे (भूमिका मकरंद पाध्ये) दिघेंचं दैवत होते आणि या नात्यातील हळवे कोपरे गुरूपौर्णिमेच्या प्रसंगातून छान चितारण्यात आले आहे. दिघेंचा मृत्यू हे आजपर्यंत न उलगडलेलं कोडं कोडंच ठेवत चित्रपटाचा शेवट करण्यात आला आहे.

चित्रपटात सर्वाधिक उठून दिसते ती प्रसाद ओकनं साकारलेली आनंद दिघेंची भूमिका. हसताना, चिडल्यावर, मुलांशी बोलताना अशा प्रत्येक प्रसंगामध्ये डोळ्यातील वेगळे भाव दाखवण्यासाठी त्यानं घेतलेली मेहनत जबरदस्त. करंगळी आणि मरंगळीमध्ये सिगारेट धरून चुटकी मारत ती पिण्याची लकब आणि चिडल्यावर तोतरं बोलणं यासाठी ‘हॅट्स ऑफ’. क्षितिज दातेनं एकनाथ शिंदे उभे करण्यासाठी घेतलेली मेहनतही तोलामोलाची. बिर्जे बाईंच्या भूमिकेत स्नेहल तरडे यांनी जीव ओतून काम केलं आहे. श्रुती मराठे आणि गश्‍मीर महाजनी यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी त्यांचा चांगला प्रभाव पडतो. इतर सर्वच कलाकारांनी त्यांना खूपच चांगली साथ दिली आहे. उच्च निर्मितीमूल्यं हेही चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य. संगीत आणि ‘असा ही धर्मवीर’ हे गाणं लक्षात राहतं.

एकंदरीतच, एका बेधडक, भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाबकानं फोडणाऱ्या राजकारण्याची ही गोष्ट ‘अनोखी’ म्हणावी अशीच...

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63189 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top