एका नाट्यपर्वाची अखेर!

जयंत सावरकर
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नाट्यकलावंत, निर्माते म्हणून रंगभूमीला परिचित असलेले माजी आमदार राजाराम शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते. त्यांच्याविषयी सांगताहेत नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर.

राजाराम शिंदेंच्या निधनाची वार्ता आली तेव्हा मन अनेक वर्ष मागे गेलं. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ओपन थिएटरमध्ये हाफ पॅन्ट, शर्टमध्ये खुर्च्या लावणारा पोऱ्या ते एक यशस्वी नाट्यनिर्माता आणि आमदार म्हणून मजल मारणारी एक यशस्वी व्यक्ती. अतिशय साधारण परिस्थितीतून मार्ग काढत उन्नतीकडे वाटचाल करणाऱ्या शिंदे यांचे जीवनचरित्र अभ्यासावे असेच आहे.

अधिक उत्तम, अधिक उन्नत गोष्टींकडे जाण्याचा वसा त्यांनी घेतला होता, म्हणूनच त्या प्रवासात त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिलंच नाही. मोठमोठे लेखक, मोठमोठे दिग्दर्शक आणि कलाकारही त्यांच्याकडे कामासाठी जात होते. माझ्या उमेदीची अनेक वर्षे मी त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने कामं केली. नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी आवर्जून मला फोन केला. अभिनंदन केलं. त्या वेळी काही आठवणी जागल्या; मात्र माझी ही संमेलनाध्यक्षपदाची कारकीर्द पाहायला ते नाहीत, याची सल आज अधिक आहे.

राजाराम शिंदेंना मी पहिल्यांदा पहिलं ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ओपन एअर थिएटरमध्ये खुर्च्या लावताना. एक हाफ चड्डीतील, हाफ बुशशर्ट घातलेला बॅकस्टेजचा एक मुलगा म्हणून; पण त्यांना सतत पुढे जाण्याची आस होती. म्हणूनच मग त्यांनी रंगमंचावरही पाऊल टाकले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचेच नाटक होते. मंदारमाला. विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं हे नाटक सुधा करमरकर यांनी दिग्दर्शित केलं होतं, आणि राम मराठे, ज्योत्स्ना मोहिले, शंकर घाणेकर, प्रसाद सावकार अशी दिग्गज मंडळी होती त्यात. त्यात त्यांनी सरदाराचं काम केलं होतं. त्या वेळी मानधन असेल पंधरा ते वीस रुपये. मंदारमाला व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट चालत होतं; पण संग्रहालय काही व्यावसायिक निर्मितीतील संस्था नव्हती. त्यामुळे त्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. राजाराम शिंदे यांनी ते नाटक हास-भासही नसताना चालवायला घेतलं. ते एक मोठंच पाऊल होतं. यशस्वी ठरलं. मंदारमाला नाटकं यशस्वीपणे चाललं. एक निर्माता म्हणून त्यांना खूप यश, पैसा मिळाला. त्यानंतर त्यांनी नाट्यमंदार नावाच्या संस्थेची स्थापना केली. त्यांनी काढलेल्या "नाथ हा माझा' या नाटकात मी काम केलं. त्याच्या अगोदर "सौजन्याची ऐशी तैशी'ही केलं होतं. राजा गोसावी त्यात प्रमुख भूमिकेत होते. "वरचा मजला रिकामा', "जय जगदीश हरे' अशी अनेक नाटकं त्यांनी आणली. त्यात मी होतो. त्यातलं एक तर त्यांनीच दिग्दर्शित केलं होतं. या नाटकांनी त्यांना पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळवून दिलं.

नाट्यनिर्मितीचं शिवधनुष्य त्यांनी कसं पेललं याचं काही जणांना आश्‍चर्य वाटे; पण त्याचं काम अत्यंत व्यवस्थित असे. व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलंय का त्यांनी? असं कोडं पडावं इतकं त्यांचं कार्यालयीन कामकाज व्यवस्थित होतं. महाराष्ट्रातील कोणत्याही गावी प्रयोग करताना कोणत्या परवानग्या काढायला हव्यात, त्या कशा काढाव्या? कोणाला जाऊन भेटावं? याची इत्थंभुत माहिती त्यांना होती.
त्यांच्या कार्यालयात तालमीचा हॉल होता. सकाळी साडेनऊ ते दीड, मग पुन्हा संध्याकाळी पाचपर्यंत तालीम चालत असे. दुपारी तिथेच जेवण होई. त्या वेळी त्यांना काही सिनेअभिनेत्रींनी आम्हाला मांसाहारी जेवण हवंय, ते बाहेरून मागवलं तर चालेल का? असं विचारलं होतं, तेव्हा शिस्तीचे पक्के असलेल्या शिंदे यांनी, "मी मालक असूनही तुमच्यातलंच जेवतो, त्यामुळे कोणीही बाहेरचं आणायचं नाही. हे सिनेमा कंपनी नव्हे तर नाटक कंपनी आहे', असं कुणाचीही भिडभाड न ठेवता सांगितलं होतं. तो त्यांच्या स्वभावाचाच भाग होता. मैत्रीच्या वेळी मैत्री, व्यवहाराच्या वेळी व्यवहार; मात्र त्यांच्या या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे अनेक जण त्यांच्यापासून दुरावले; पण त्यांनी बाबूराव पेंढारकर यांच्यासोबत काम केले होते. त्यामुळे त्यांची शिस्त कळत नकळत त्यांच्यात भिनली असणार. ते अत्यंत व्यवहारीही होते. आम्ही मुंबई-पुणे असे अनेकदा प्रयोग करत असू, त्या प्रवासात आम्ही लोणावळ्याला जिथे चहा घेत असू तिथे कलाकारांना कधीच पैसे द्यावे लागत नसत. ते त्या चहावाल्यालाही आधीच किती माणसं येत आहेत ते कळवत असत आणि बरोबर तेवढेच पैसे देत असत.

त्यांच्या या शिस्तीचा अनेकांनी चांगला अनुभवही घेतला. नंतरच्या काळात कंपनी तोट्यात गेली असतानाही त्यांनी अनेकांचे पैसे त्यांच्या घरी जाऊन दिले होते; पण तेही वर्षभरात जेवढे पासेस घेतले तेवढे पैसे वजा करूनच! शिस्त आणि व्यवहार अत्यंत काटेकोर पद्धतीने पाहणारा माणूस होता. नाटकाची तालीम त्यांच्या कार्यालयातच होत असली तरी ते तालमीत कधी येत नसत. अचानकपणे कंपनीचं चाललेलं नाटक पाहायचं आणि नटाला त्याचे दोष तोंडावर सांगायचे अशी त्यांची पद्धत असे. त्यात ते मागे-पुढे पाहत नसत. आपल्याच चालणाऱ्या नाटकातील दोष दाखवणारा निर्माता मी एकमेव बघितला. शिस्तीने वागणाऱ्या माणसांना त्यांचा त्रास झाला नाही हेही तितकेच खरे.
हा नाट्यकलावंत, नाट्यनिर्माता आमदार झाला. त्यांचं नाट्यनिर्मितीतलं लक्ष कमी झालं. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे आमचं काम करणं कमी झालं, त्यांची संस्थेची निर्मिती बंद झाली होती; मात्र नंतर त्यांनी मुलाच्या हातात संस्था सोपवली आणि काही नाटकांची निर्मिती केली. उत्तम कलाकारांनी त्यांच्याकडे आनंदाने काम केले. त्यात काशीनाथ घाणेकर, मधुकर तोरडमल, नयनतारा, विजया मेहता आदी अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

एक निर्माता म्हणून ते अत्यंत कल्पक होते. "सौजन्याची ऐशी तैशी' या नाटकाच्या निमित्ताने अनेक चांगल्या जाहिराती त्यांनी वर्तमानपत्रांतून दिल्या होत्या. त्या जाहिरातींनी सर्वसामान्यांच्या मनावर गारूड केले होते. अत्यंत उत्तम जाहिरात तंत्राचे उदाहरण म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. त्याचा फायदा निश्‍चितच नाटकाला झाला. नाटक धोधो चालले. "ही श्रींची इच्छा' या नाटकाच्या निमित्तानेही त्यांनी जाहिरात तंत्रावरची आपली हुकूमत दाखवली. अनेक अचाट कल्पना त्यांनी जाहिरातीसाठी वापरल्या आणि त्यांचा नाटकांना निश्‍चितच फायदा झाला. मोठ्या योजना आखायच्या आणि शिस्तीच्या जोरावर त्या लीलया पार पाडायच्या, हे त्यांचं कसब वाखाणण्याजोगं होतं.

सर्वसामान्यांतील असमान्यत्व त्यांनी जगाला दाखवून दिलं. अत्यंत थक्क करायला लावणारी त्यांची कारकीर्द होती. एकेकाळी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषवलेली ही व्यक्ती, माझ्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदाची कारकीर्द पाहायला हवी होती. आज ती नाही याची बोच खूप आहे.
(शब्दांकन : श्रद्धा पेडणेकर)

Web Title: tribute to artist, play producer rajaram shinde