मोहित मलिकच्या रॉकस्टार भूमिकेची स्वप्नपूर्ती

अरुण सुर्वे
शुक्रवार, 4 मे 2018

'कुल्फीकुमार बाजेवाला' या मालिकेतील सिकंदरसिंग गिल हीच माझी आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका म्हटली पाहिजे. कारण, एखाद्या रॉकस्टारची भूमिका साकारणं हे माझं स्वप्न होतं. ती यानिमित्ताने पूर्ण झाली. सांगतोय अभिनेता मोहित मलिक...

मी मूळचा दिल्लीचा. माझा जन्म तेथेच झाला अन्‌ बालपणही तेथेच गेलं. दिल्लीतील हवाई दलाच्या बालभारती शाळेत शिकलो. त्यानंतर भगतसिंग कॉलेजमधून पदवीधर झालो आणि नंतर एमईटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

शाळेत मी विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचो. पण, तेव्हा अभिनयापेक्षा मला क्रीडा क्षेत्राची अधिक आवड होती. शाळेच्या क्रिकेट संघातही मी होतो आणि त्यासाठी मी बराच काळ सराव करीत असे. कॉलेजात मी नाटकांतून भूमिका रंगविल्या असल्या, तरी त्या तशा महत्त्वाच्या नव्हत्या. पण, मी तेव्हापासूनच विविध मालिकांसाठी 
ऑडिशन देत असे. त्याच सुमारास नीलांजनाने मला पाहिलं आणि मला ऑडिशनसाठी बोलावलं. त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही, पण नीलांजनाशी तेव्हापासून चांगले संबंध राहिले. 

mohit malik

शाळा-कॉलेजात असताना चित्रकला, संगीत, रेखाचित्र काढणं वगैरे कलांमध्ये मी रुची दाखविली होती. दरम्यान, अभिनय क्षेत्रात मी 2004 मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मायानगरी अर्थात मुंबईत 2005 मध्ये आलो. 'मिली' ही माझी पहिली मालिका. त्यानंतर 'जब लव्ह हुआ', 'गोदभराई', 'प्रतिग्या', 'डोली अरमानों की' आदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. त्याशिवाय, 'नच बलिये' आणि 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये 'कुल्फीकुमार बाजेवाला' या मालिकेतील सिकंदर हीच माझी आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका म्हटली पाहिजे. कारण, एखाद्या रॉकस्टारची भूमिका साकारणं हे माझं स्वप्न होतं. ती यानिमित्ताने पूर्ण झाली. या मालिकेत एका सात वर्षांच्या कुल्फी नावाच्या मुलीची संगीतमय कहाणी आहे. ती पठाणकोटजवळील चिरौली गावात राहते. अतिशय सुरेल आणि मधुर आवाज ही तिला मिळालेली देणगी असते. तसंच कोणत्याही आवाजातून ती एक गाणं तयार करीत असे. विशेष म्हणजे कुल्फीने गाण्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नसतं. ती तिच्या आईसोबत तसंच काका आणि काकूबरोबर राहात असते. पण, तिच्या या उत्साही आणि निरागस जीवनात तिच्या वडिलांचं एक गूढ कायम असतं. सिकंदर सिंग गिल हा लोकांचा आवडता संगीतकार. रॉकस्टार असला तरी त्याच्या जीवनात बरीच दु:खे असतात. तरुणपणी त्याने नातेसंबंधांपेक्षा आपल्या कारकिर्दीला महत्त्व देण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याला संगीत क्षेत्रात मोठा स्टार होण्याचं स्वप्न असतं आणि त्याची पहिली पायरी म्हणूनच तो एका बड्या संगीतकाराच्या मुलीशी लग्न करतो. आज मात्र, त्याला आपल्या पूर्वीच्या निर्णयांचा पश्‍चात्ताप होत असतो आणि त्याला आपलं उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबीयांसमवेत व्यतीत करायचं असतं, अशी कथा या मालिकेत आहे. 

दरम्यान, माझ्या पूर्वीच्या मालिकेसाठी चित्रीकरण करीत होतो, तेव्हा मला समजलं की गोविंदा शेजारच्याच स्टुडिओत चित्रीकरण करीत आहे. मी त्याचा चाहता असल्याने मी त्याला भेटायला गेलो; पण तेव्हा गोविंदाने मला माझ्या कामामुळे ओळखलं आणि तो म्हणाला, "मी तुझं काम बघितलं असून, मला तू आवडतोस.'' ते ऐकून मी भारावून गेलो. त्याने मला सध्या काय करतोस, म्हणून विचारलं. तेव्हा मी त्याला 'कुल्फीकुमार बाजेवाला' मालिकेची माहिती दिली. आपण ही मालिका आणि तुझी
 भूमिका नक्कीच पाहू, असं गोविंदाने मला सांगितलं. हीच माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्याचबरोबर 'डोली अरमानों की' या मालिकेतील भूमिकेमुळे माझ्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या भूमिकेमुळे माझ्या जीवनात अनेक गोष्टी बदलल्या. लोक मला एक अभिनेता म्हणून ओळखू लागले. एक अभिनेता म्हणून
 सतत कार्यरत राहणं आणि पत्नीबरोबर जगभर फिरणं या माझ्या भावी योजना आहेत.

mohit malik

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TV Actor Mohit Malik Interview for My Journey