
Urfi Javed: 'माझ्याकडे बोट दाखवणारी आता..', शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात उर्फीनं चित्रा वाघ यांना डिवचलं
सोशल मीडियावर सध्या शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर येताच अनेक चर्चांना उधाण आलं.
हा व्हिडिओ मॉर्फ केला असून या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं. आता या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक देखील केली आहे.
आता या प्रकरणावर भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनीही व्हिडिओ शेअर करत शितल म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं की, 'शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा'. अनेक राजकिय नेत्यांनी या व्हिडिओवर तीव्र शब्दात निषेध करत या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
राज्यात या प्रकरणावरुन अनेक वाद विवाद सध्या सुरु आहेत. अशातच आता या प्रकरणात उर्फी जावेद हिनं देखील उडी घेतली आहे. उर्फी जावेद अन् चित्रा वाघ यांच्यातील वाद हा तर सर्वश्रूत आहे.
आता उर्फीनं चित्रा वाघ यांचा व्हिडिओ रिट्विट करत लिहिलय की, 'ती वेळ विसरली जेव्हा माझ्या कपड्यामुळं माझ्या चारित्र्यावर बोट उचलत होती. मला जेलमध्ये पाठवण्यात यावं याची मागणी करात होती. सर्वासमोर माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह वाह वाह. नैतिकतेचीही काहीतरी सीमा असते हे कोणी तरी या बाईला सांगा'
आता उर्फी या प्रकरणावर बोलली म्हणजे चर्चा तर होणारच आणि तसचं काहीसं झालं आहे. तिचं हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून याची चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणाला आणखी काही राजनितिक वळण येते का आणि चित्रा वाघ या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतील का हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.