अभिनयाचा कॅनव्हास विस्तारायचाय!

महेश बर्दापूरकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

आपला पहिलाच मराठी चित्रपट ‘धग’साठी ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळवलेल्या उषाच्या शिरपेचात यामुळे मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...

उषा जाधव या मराठमोळ्या अभिनेत्रीला ‘माई घाट’ या चित्रपटासाठी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील ७२ भाषांतील दोनशे चित्रपटांतून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आपला पहिलाच मराठी चित्रपट ‘धग’साठी ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळवलेल्या उषाच्या शिरपेचात यामुळे मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

प्रश्‍न - तुमचं बालपण कसं होतं आणि अभिनयाची बीजं कुठं पेरली गेली?
उषा जाधव - माझा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका खेड्यातला. वडील सैन्यदलात होते आणि आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असल्यानं संघर्ष मोठा होता. सातवीत असताना मी स्नेहसंमेलनात एका नाटकात काम केलं आणि मला पहिलं बक्षीसही मिळालं. त्याचवेळी मी अभिनयात करिअर करण्याची स्वप्नं पाहू लागले. कोल्हापुरात बारावी झाल्यावर पुण्यात नोकरीसाठी आले आणि तीन वर्षे नोकरी केल्यानंतर अभिनयाच्या संधी शोधण्यासाठी मुंबईत आले. मधुर भांडारकरांच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्ये मला छोटी भूमिका मिळाली व चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला. मराठीतील पहिलाच चित्रपट ‘धग’ माझ्यासाठी मोठं यश घेऊन आला.

‘धग’ ते ‘माई घाट’ हा प्रवास कसा होता?
- शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘धग’ चित्रपटासाठी २०१२ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव झाली. पुरस्कारानंतरचा स्ट्रगल अशाप्रकारे वेगळाच असतो. ‘माई घाट’ या अनंत महादेवनदिग्दर्शित चित्रपटातील माईंची भूमिका आव्हानात्मक होती. मी चांगल्या व मला आवडणाऱ्या पटकथा निवडते आणि दिग्दर्शकावर सर्वकाही सोपवून त्याच्या सूचनेनुसार भूमिकेची तयारी करते. त्यामुळं हा प्रवास खूपच छान झाला आणि स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधानही मिळालं.

Image may contain: 3 people, people smiling, people standing

‘धग’नंतर काही काळ हिंदी चित्रपटसृष्टीत रमलात...
- मला तेच ते काम करण्यात रस नव्हता. ‘धग’नंतरच्या काळात मी अनेक जाहिराती केल्या. त्यात अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या काही जाहिराती होत्या. नितेश तिवारी यांनी ‘भूतनाथ रिटर्न्स’चं स्क्रिप्ट पाठवलं आणि ‘तू माझ्या चित्रपटात काम करते आहेस,’ असा निरोपही पाठवला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अमिताभ सर आता माझे खूप चांगले मित्र आहेत. असाच एके दिवशी रामगोपाल वर्मांचा फोन आला व त्यांनी ‘वीरप्पन’ चित्रपटात वीरप्पनच्या पत्नीची भूमिका ऑफर केली. हा अनुभव खूपच समृद्ध करणारा ठरला. त्यानंतर २०१८ मध्ये मी अरुणा राजे यांच्या ‘फायरब्रॅंड’ या मराठी चित्रपटात काम केलं. अरुणा राजेंसारख्या अनुभवी दिग्दर्शकाकडं काम केल्याचं समाधान मिळालं आणि समीक्षकांनीही माझ्या भूमिकेचं कौतुक केलं.

आंतरराष्ट्रीय चित्रपटांत कामाचा निर्णय का घेतला?
- आंतरराष्ट्रीय चित्रपटांत काम करण्याचं माझं स्वप्न होतंच. वय माझ्या बाजूनं आहे आणि आपल्याला अनेक प्रयोग करायची संधी असल्याची जाणीवही होती. मी भाषेच्या जोखडात अडकून पडत नाही आणि त्याचबरोबर माझ्या अभिनयाचा कॅनव्हासही मला विस्तारायचा होता. त्यामुळे मी अलेखाद्रो कॅन्टोस या स्पॅनिश दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम केलं असून, त्यात तीन गाणीही म्हटली आहेत. आपल्यातील अभिनेत्याला समृद्ध करण्यासाठी अशी आव्हानं गरजेची असतात व मी ती स्वीकारली.

‘माई घाट’मधील भूमिकेची तयारी कशी केली?
- दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ही कथा ऐकवली, मात्र तयारीसाठी आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही. त्यांनी मला माईंबद्दलचे वर्तमानपत्रांतील काही लेख, मुलाखती, फोटो व व्हिडिओ पाठवले. त्यांच्या फोटोवरून मी माईंची बॉडीलॅंग्वेज घेतली. मात्र माईंचा मानसिक संघर्ष दाखवणं खूप आव्हानात्मक होतं. माई जास्त बोलत नाही, मुलाच्या कोठडीतील मृत्यूनंतरही ती रडत नाही. ती मुलाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार करते आणि तो पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे झुरत राहते. हे झुरणं समजावून घेणं व ते पडद्यावर साकारण्याचं अवघड काम मी साकारलं. स्क्रिप्ट वाचतानाच दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे, हे मी विचारून घेते. त्यासंदर्भातील मुद्दे लिहून ठेवते. भूमिका साकारण्याआधी ती आरशासमोर करून पाहण्यावर माझा विश्‍वास नाही. चित्रिकरणाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला सूर गवसणं आणि दिग्दर्शकाबरोबर ट्युनिंग जमणं गरजेचं असतं.

या भूमिकेतील सर्वांत आव्हानात्मक भाग कोणता होता?
- ही पूर्ण भूमिकाच आव्हानात्मक होती, कारण माईंच्या वयाच्या साधारण ४५ ते ६०वर्षांपर्यंतचा प्रवास मला उभा करायचा होता. वृद्धापकाळातील माई दाखविण्यासाठी मला रोज तीन तास मेकअप करावा लागायचा. त्यामुळं चेहऱ्यावरील स्नायू हलविणंही कठीण व्हायचं. या मर्यादा असूनही माई साकारण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली.

‘इफ्फी’मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतरची भावना...
- आपल्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंती मिळाली याचा खूप आनंद झाला. ‘इफ्फी’च्या ज्युरी मंडळाचे अध्यक्ष जॉन बेली यांनी, ‘तुला पुरस्कार देण्यासाठी आम्हाला चर्चा करण्याची गरजच पडली नाही,’ असं सांगितलं. लिन रॅमसे या दुसऱ्या ज्युरी मेंबरनं म्हटलं, की माईंचं झुरणं तुझ्या देहबोलीवरून प्रेक्षकांपर्यंत छान पोचलं. चित्रपटांच्या जाणकारांकडून मिळालेली ही पावती माझ्यासाठी खूप मोठी आहे. हा पुरस्कार स्वीकारताना माझे आई-बाबा उपस्थित होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता.

भविष्यातील योजना कोणत्या?
 - माई घाट’ चित्रपट महाराष्ट्र व देशाबरोबरच परदेशातील प्रेक्षकांनी पाहावा अशी अपेक्षा आहे. अनंत महादेवन यांच्याबरोबरच मी आणखी एका चित्रपटात काम करते आहे. दोन हिंदी चित्रपटांच्या स्क्रिप्टवर विचार सुरू आहे आणि आणखी एक स्पॅनिश फिल्म करते आहे.

हेही वाचा :  'पानिपत' की  'तानाजी', कोणती लढाई घडविणार इतिहास?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: usha jadhav interveiw