वैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

भारतीय चित्रपटासृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येत आहे. मराठी चित्रपट या विभागासाठी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता 2018 हा पुरस्कार वैभवला मिळाला आहे.

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेटबॉय असलेला अभिनेता वैभव तत्ववादी याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या या चौफेर अभिनेत्याला आता आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला मिळाला असून लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
भारतीय चित्रपटासृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येत आहे. मराठी चित्रपट या विभागासाठी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता 2018 हा पुरस्कार वैभवला मिळाला असून 21 एप्रिल ला वांद्रे येथील अ‍ॅड्य्रूज ऑडिटेरिअममध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

vaibhav tatwawadi

फक्त लढ म्हणा, सुराज्य, हंटर, कॉफी आणि बरंच काही, शॉर्टकट, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, चिटर, कान्हा, भेटली तू पुन्हा, व्हॉट्सअ‍ॅप लग्न आदी मराठी चित्रपट तर, बाजीराव मस्तानी, लिपस्टिक अंडर माय बुरखा अशा हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा वैभव आता मणकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी या चित्रपटातही झळकणार आहे. तसेच प्रकाश कुंटे दिग्दर्शित एका नव्या कोऱ्या चित्रपटातही तो दिसणार आहे. रोमँटिक, ऐतिहासिक अशा विविध भूमिका साकारणारा वैभव नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवतो. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असलेला वैभव नेहमीच हाती आलेली प्रत्येक भूमिका तितक्याच सचोटीने निभवत असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कामाचं प्रेक्षकांसोबतच इतर मान्यवर मंडळीही कौतुक करत असतात. त्याच्या याच प्रामाणिक कामाचं कौतुक करण्यासाठी त्याला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता 2018 हा पुरस्कार मिळाला आहे. 

vaibhav tatwawadi

‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलावंताची इच्छा असते. माझ्या करिअरची आताच सुरुवात झाली आहे, त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच मला मानाचा पुरस्कार मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढेही मी चांगले आणि दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न करेन’, अशी कृतज्ञता अभिनेता वैभव तत्ववादी याने व्यक्त केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhav Tatwawaadi got dadasaheb falake award