वरूण धवनपेक्षा आपण ‘स्मार्ट’ असल्याचे आलिया भटने सिध्द केले!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

अलीकडेच ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन?’ या आगामी गेम शोमध्ये  वरुण धवन आणि आलिया भट एकत्र आले होते.

बॉलीवूडमधील सध्याची सर्वात यशस्वी आणि लाडकी जोडी असलेले वरूण धवन आणि आलिया भट हे आता चौथ्या चित्रपटात एकत्र येत आहेत. हे दोघे आता अभिषेक वर्मनच्या 'कलंक' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रपटात भूमिका साकारीत आहेत. हे दोघे स्टार अलीकडेच ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन?’ या आगामी गेम शोमध्येही एकत्र आले होते.

रवी दुबे सूत्रसंचालन करीत असलेल्या या कार्यक्रमात हे दोघे एकमेकांविरुध्दच्या टीममध्ये होते आणि कार्यक्रमातील एक एक स्पर्धक व त्याचे कुटुंबीय त्यांच्या जोडीला होते. या कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या नऊपैकी सहा प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन आलिया भट व तिच्या टीमने वरूणवर मात केली आणि आपण अधिक स्मार्ट असल्याचे दाखवून दिले. नंतर वरूणनेही जाहीरपणे कबुली देताना सांगितले, “या कार्यक्रमातून आलियाने हे सिध्द केलं आहे की ती अधिक स्मार्ट आहे आणि केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नसतो.” काही काळापूर्वी सोशल मीडियावर आलिया भटच्या नावाने काही विनोद प्रसृत होत होते, ज्यात आलिया फारच मठ्ठ असल्याचे भासविले जात होते.

varun and alia

कार्यक्रमातील स्पर्धेआधी वरूण व आलियाने आपल्या जीवनातील काही किस्से सांगितले. आपल्या पहिल्या कमाईबद्दल आलियाने सांगितले की ती लहान असताना तिने आपल्या घराच्या मागच्या बाजूला लेमोनेड विकून चक्क 500 रुपयांची कमाई केली होती. “केवळ 19 वर्षांची असताना मी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे आयुष्यात कधीच नोकरी केलेली नाही,” असे आलिया म्हणाली. वरुणने सांगितले की चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपण काही काळ नोकरी केली होती. “मी करण जोहरकडे ‘माय नेम इज खान’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं आणि मी काही लघुपटांची निर्मिती आणि त्यात अभिनयही केला होता,” असे वरूण म्हणाला.
“प्रत्येकाला असं वाटत असतं, की तो जन्मजातच तल्लख (स्मार्ट) आहे. पण आपला हा दावा तपासून बघण्याचं हा कार्यक्रम म्हणजे सुयोग्य व्यासपीठ आहे,” असे शेवटी वरूण धवनने सांगितले.

sabse smart kaun

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varun Dhawan and Alia Bhatt On the set of Sabse smart kaun