'झिरो' अजय झाला 'हिरो'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

'वंटास' सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यानिमित्तच चित्रपटाचा हिरो अजय वर्पे याने 'सकाळ'शी संवाद साधला...

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थिती दर्शविणारे अनेक चित्रपट अलिकडे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'वंटास' हा चित्रपट. यात केवळ ग्रामीण भागच दाखविण्यात आलेला नाही तर यातील कलाकारही ग्रामीण भागातीलच आहे. 'वंटास' सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यानिमित्तच चित्रपटाचा हिरो अजय वर्पे याने 'सकाळ'शी संवाद साधला...

मध्यम वर्गामध्ये जन्म झाला त्यामुळे एकदम साधासुधा होतो. आई, वडील, भाऊ, बहिण एकदम सुखी कुटुंबं होतं. वडील पैलवान आणि शेतकरी असल्याने घरात सगळं मस्त होतं. वडीलांची काळजी, आईचे प्रेम, बहिणीचे रागावणे, भावाची आपुलकी सगळे एकदम भारी होते आणि मीही शाळेत जाऊन मस्ती, थोडासा अभ्यास चालू होता.

एका चांगल्या घराला दृष्ट लागवी तसाच प्रकार झाला. सगळं काही ठिक चालू होतं. पण मी दहा-अकरा वर्षाचा असताना वडिलांचं अल्पशा आजाराने निधन झालं. तिथून सगळच बदललं. दु:खाचा डोंगरच कोसळला आणि एवढ्या लहान वयात मला काही कळतही नव्हतं. आठवणी सुद्धा खुप कमी होत्या. माझ्याकडे वडिलांच्या जाण्यानंतर मामाने आम्हाला त्यांच्यासोबत  गावी घेऊन गेले. भाऊ, बहिण आणि मी तीकडेच शाळेमध्ये जाऊ लागलो. याच दिवसांमध्ये आई खूप आजारी असायची. जेवतही नव्हती. तिला आमची खूप काळजी वाटायची. आमच्यासाठी तिचा जीव सारखा खालीवर व्हायचा. नंतर काही दिवसात खुपच आजारी पडली आणि वडिलांच्या वर्षा नंतर 10 दिवसांनी आईही आम्हाला सोडून गेली.

मामाच्या घरी सगळा आक्रोश झाला. बहिण थोडी मोठी असल्याने तिला खुप काही समजत होतं. तिलाही सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. तेव्हा मी जेमतेम १० किंवा १२ वर्षाचा होतो. आईच्या आठवणी सोबत होत्या. कारण एवढ्या लहान वयात हा विचार कधी आलाच नाही की आपण पोरके किंवा अनाथ होऊ. डोळ्यात पाणी आणि त्यावेळेस एकच वाटायचे की आता काही पाहीजे असेल तर कुणा्ला बोलायचे, आई आई कुणाला हाक मारायची, आईसारखे कुशीत कोण घेणार... विचारांची सगळी घुसमट मनात चालू झाली. एवढ्या कमी वयात एवढं सगळं पहायला मिळत होतं.

आई वडिल गेल्यानंतर मी पुण्यात मावशीकडे आलो. लहाणपणी अभ्यासात हुशार नव्हताे पण पुण्यात आल्यावर बऱ्याच गोष्टी समजल्या. आता अभ्यास केला तरच दिवस बदलतील असं वाटायला लागलं. चांगला अभ्यास करायला लागलो. ९ वी ते १२ वी सलग ४ वर्ष मला ७५% गुण मिळाले हा योगायोग. पण हे सगळं चालू असताना आई वडिलांची कमी क्षणाक्षणाला भासत होती. रात्री रडणं रोजच चालू होतं. आठवणी तर फार कमी होत्या पण सगळ्याच काळजाला भिडण्याऱ्या. कुणाला काहीही सांगूही शकत नव्हतो आणि बोलूही. पण मित्र भारी भेटले. सगळे खुप काळजी करणारे. मावशीनेही खूप चांगलं सांभाळलं. आई मरावी अन् मावशी ऊरावी याचा प्रत्ययही आला.

याच वेळी मामाही माझ्या भावा बहिणीला खुप जिव लावायचे. त्यांचेही शिक्षण गावी चालू होतं. माझा छोटा भाऊही बहिणीला आई समजत होता आणि खरं ती त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी आईच होती. नंतर ११ वी १२ वी कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये महाविद्यालयात प्रथम आलो. बहिणीच्या लग्नाची काळजी मला जाणवत होती. त्यामुळे मी सरळ कॉमर्समध्ये गेलो. इजिनिअरिंग किंवा डिप्लोमाही करू शकत होतो. पण पैसे खूप जातील. खुप विचार मनात यायचे पण मनाने ठरवलं होतं, आपलं काहीही झालं तरी चालेल पण बहिण भावाचे चांगलं झालं पाहीजे. तेवढा मी समजुतदार झालो होतो. आपल्या लोकांसाठी स्वत:च्या स्वप्नांची किंमत मला खूप किरकोळ वाटत होती. नंतर काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले. तिचं सगळं छान मार्गी लागलं. मग जरा मी स्वत:ला समाधानी समजत होतो. पण मला आणि भावाला कायम तिच्या सोबत असल्याने आम्हाला या गोष्टीची कमतरताही जाणवत होती. 

चांगला अभ्यास असल्याने मी एम् कॉम ला असताना माझी टिसीएस या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. घरचे पण खुप खुश होते. कारण चांगली कंपनी होती. 5-6महिने झाले काम चालू होते. पण हे करत असताना मला अभिनयाची आवड होती. मी काही मित्रांसोबत बाहेर असताना एका एस. के. दादा नावाच्या व्यक्तीला भेटलो. कदाचित ती व्यक्ती त्या क्षेत्रातील असावी. त्यांनी मला सांगितले की तुझा लुक चांगला आहे. अकलुजला एका चित्रपटासाठी ऑडिशन आहे. तर तु तिकडे जा. मग मी आणि माझा मित्र रविराज आम्ही दोघे ऑडिशनसाठी गेलो. तिथं माझं ऑडिशन झालं. खरंतर त्यांचे अगोदर खुप साऱ्या महाविद्यालयात ऑडिशन झाले होते. तेव्हा 20 हजार मुलांचे ऑडिशन झाले होते. असं मला समजलं. मग मी ठरवलं, एवढ्या स्पर्धेत काही करायचे असेल तर ती मी खूप तयारीनीशी ऑडिशन दिली. नंतर त्यांनी मला सांगितले की तुला कळवतो काय आहे ते. पुण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी मला कॉल आला आणि जी गोष्ट वाटत नव्हती की होईल, तीच झाली. माझं 'वंटास' या चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेता म्हणून निवड झाली. हा असा एक क्षण होता की आनंद की दु:ख काही समजतच नव्हतं. कारण मी अभिनेता होतोय. यावर माझाच विश्वास बसत नव्हता.

ajay varpe

माझ्या जवळच्या मित्रांना मी ही गोष्ट सांगितली. सगळ्यांना आनंदाश्रू आले. घरी याबद्दल कोणाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही मित्रांनी ठरवलं, की शुटिंग होईपर्यंत कुणालाच काही सांगायचे नाही. मी घरी असे सांगितले की मी कंपनीच्या कामासाठी बंगलोरला जात आहे आणि शूटिंगसाठी गेलो असता खूप चांगला अनुभव होता. आमची सगळी टिम अनुभवी होती. मी, स्नेहल, अक्षय, रमेश आम्ही नवीन होतो. सर्वांनी खुप चांगले  सहकार्य केले. ज्या मुलाला मावशी, मामा आणि मित्र सोडून कुणीच ओळखत नव्हतं. आता त्या मुलाला बॉडीगार्ड होते. शूटिंग पाहण्यासाठी खूप गर्दी होती. फोटो काढण्यासाठी खुप लोक, ऑटोग्राफ घेण्यासाठी लहान मुले, मुली... सगळं काही बदललं होतं. स्वत:वरच मला विश्वास बसत नव्हता. सगळं स्वप्न वाटत होतं. पण याचवेळी आणखी एक गोष्ट त्रास देत होती की हे सगळं पाहण्यासाठी आई-वडिल पाहिजे होते. ते नसले तरी त्यांचा आशीर्वाद, प्रेम कदाचित त्यांचीच ही देण होती. शूटिंग संपल. नंतर मी पुण्यात आल्यावर सर्वांना सांगितल्यावर सगळ्यांना खुप आनंद झाला. या सगळ्या गोष्टींमुळे मला कमी वयातच समजलं की वाईट काळात कुणी सोबत नसतो. परंतु चांगल्या काळात सगळे बरोबर येतात. चित्रपटाचे संगीत महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे.

ajay varpe


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ventas marathi movies hero ajay varpes interview