नवा चित्रपट : व्हेंटिलेटर 

महेश बर्दापूरकर 
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

श्रेणी : 4 
 

निर्माती : प्रियांका चोप्रा 
दिग्दर्शक : राजेश मापुसकर 
भूमिका : आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सतीश आळेकर, प्रियांका चोप्रा, बोमन इराणी आदी. 

अव्यक्त नात्याचा मोकळा श्‍वास 

'व्हेंटिलेटर' हा राजेश मापुसकर दिग्दर्शित चित्रपट नात्यांतील, विशेषत: मुलगा व वडिलांच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवे कोपरे उलगडून दाखवतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या (एका) वडिलांची गोष्ट सांगताना बाप आणि मुलाच्या नात्यातील गुंत्यांची कारणं आणि तो सोडवण्याचा सोपा उपाय चित्रपट सांगतो. या गंभीर विषयावर भाष्य करताना अतिशय हलकी फुलकी कथा, प्रवाही पटकथा, मातब्बर कलाकारांची मोठी फौज, उच्च निर्मितीमूल्यं आणि श्रवणीय संगीताच्या जोरावर चित्रपट खिळवून ठेवतो. नात्यातील गमती-जमती दाखवता हसवतो व त्याचवेळी गुंते सोडवून दाखवताना डोळ्याच्या कडा ओलावतो. आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, सुकन्या कुलकर्णी, सतीश आळेकर, छोट्या भूमिकेत प्रियांका चोप्रा अशा कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर ही कथा काळजाला भिडते आणि कायमची स्मरणात राहते. 

'व्हेंटिलेटर'ची कथा सुरू होते मुंबईमध्ये. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला आहे आणि राजकारणात जम बसवू पाहणाऱ्या प्रसन्न कामेरकरचे (जितेंद्र जोशी) वडील गजाकाका यांना रुग्णालयात दाखल केलं जातं, व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. प्रसन्नचा चुलत भाऊ राजा (आशुतोष गोवारीकर) हा बॉलिवूडमधील मोठा दिग्दर्शक आहे आणि त्याला ही बातमी समजताच तो रुग्णालयात दाखल होतो, मात्र त्याच्या वडिलांनी (सतीश आळेकर) तिथं येऊ नये असं त्याला वाटत असतं. प्रसन्न आणि राजा या दोघांचंही आपापल्या वडिलांशी बिलकूल पटत नसतं. गजाकाकांच्या आजारपणाची बातमी त्यांच्या कोकण व कोल्हापुरात राहणाऱ्या भावा-बहिणींपर्यंत जाऊन पोचते आणि सर्वांची धावपळ सुरू होते. गजाकाका गेल्यास गणपती उत्सवात सुतक लागणार या कल्पनेनंच (कोकणातले) सर्वजण हादरतात आणि मुंबईत दाखल होतात. त्यांच्या मरणावर अनेकांचे प्लॅन ठरणार असल्यानं प्रत्येक जण व्हेंटिलेटर कधी काढायचा, याबद्दलचं आपलं मत व्यक्त करू लागतो. प्रसन्नची बहीण सारिका (सुकन्या कुलकर्णी-मोने), डॉक्‍टर (बोमन इराणी) यांची याबद्दल आणखी वेगळी मतं असतात. शेवटी निर्णय प्रसन्नला घ्यायचा असतो आणि या निर्णयात राजाचे विचारही महत्त्वाचे असतात. वडील व मुलानं त्यांच्यातील नात्याला 'व्हेंटिलेटर'वर न ठेवता त्याला मोकळा श्‍वास घेण्याची संधी दिल्यास सूर नक्कीच जुळतात, असा संदेश देत चित्रपटाचा शेवट होतो. 

चित्रपटाचं कथानक गंभीर असलं, तरी त्याची मांडणी हलकी-फुलकी आहे. नात्यांतील ओढाताण, स्वार्थ, संधिसाधूपणा यांचा उपयोग करीत दर्जेदार विनोदाची निर्मिती करण्यात आली आहे. वडिलांचा त्याग आणि त्यांची मानसिकता दाखवणारे प्रसंग मात्र डोळ्याच्या कडा ओल्या करतात. प्रसन्नला करावा लागणारा पक्षीय राजकारणाचा सामना, कोकणातील नातेवाइकांची वाटण्यांसाठी चाललेली धडपड, सेलिब्रेटी असलेल्या राजाची नातेवाइकांमुळं होणारी कोंडी अशा अनेक प्रसंगांतून कथा पुढं सरकते आणि खिळवून ठेवते. दिग्दर्शक कथा आणि पटकथेवरील पकड शेवटपर्यंत घट्ट ठेवतो आणि अपेक्षित संदेश योग्यवेळी देऊन छान परिणाम साधतो. मुंबई आणि कोकणातील चित्रण, 'बाबा' आणि 'या रे या' ही गाणी, उच्च निर्मितीमूल्यं या चित्रपटाच्या आणखी जमेच्या बाजू. 

बड्या कलाकारांचा भलामोठा संच हे चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य. आशुतोष गोवारीकर यांनी मोठ्या कालावधीनंतर मराठी चित्रपटात भूमिका केली आहे. प्रख्यात दिग्दर्शकाची देहबोली, त्याचा वडिलांवरचा राग, नातेवाइकांबरोबर जुळवून घेणं हे सर्व त्यांनी छान टिपलं आहे. जितेंद्र जोशीनं वडिलांचा टोकाचा राग करणारा मुलगा, राजकारणात जम बसवू पाहणारा तरुण आणि शेवटी कोलमडून पडणं उत्तम साकारलं आहे. सतीश आळेकर नेहमीप्रमाणेच परफेक्‍ट. बोमन इराणी छोट्या भूमिकेत धमाल करतात. प्रियांका चोप्राची भूमिकाही लक्षात राहणारी. इतर सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. 

एकंदरीतच, वडील व मुलातील अव्यक्त नात्यानं 'मोकळा श्‍वास' घेण्यासाठी काय गरजेचं आहे, हे सांगणारा हा हळवा पट सहकुटुंब पाहावा असाच... 

Web Title: Ventilator Marathi Movie Review by Mahesh Bardapurkar