अभिनेते विनोद खन्ना यांनी घेतला अखेरचा श्वास

टीम ई सकाळ
गुरुवार, 27 एप्रिल 2017

विनोद खन्ना यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) मध्ये 6 ऑक्‍टोबर 1946 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी कविता खन्ना, पूत्र राहुल, अक्षय आणि दोन मुली असा परिवार आहे. 'मनके मित' या सुनिल दत्त यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा रिमिक होता. 

मुंबई : आपल्या कसदार अभिनयासोबतच अत्यंत देखण्या, उत्साही व उमद्या व्यक्तिमत्त्वाने बॉलिवूडसह आपल्या समकालीन रसिक प्रेक्षकांना मोहवून टाकणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व भाजपचे माजी खासदार विनोद खन्ना यांचे आज (गुरुवार) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

ते 70 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचा मुलगा राहुल आणि रुग्णालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले होते. मात्र, नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू होती. त्यांच्याबाबत सोशल मीडियावरून अफवा पसरल्या होत्या. 

त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) मध्ये 6 ऑक्‍टोबर 1946 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी कविता खन्ना, पूत्र राहुल, अक्षय आणि दोन मुली असा परिवार आहे. 'मनके मित' या सुनिल दत्त यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. 

विनोद खन्ना यांनी नकारात्मक भूमिका साकारत व्हिलन म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. नंतर अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर ते लाडके हीरो बनले. त्यांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला. बॉलिवूडमधील सर्वांत देखण्या नायकांमध्ये विनोद खन्ना यांची अग्रक्रमाने गणना केली जात असे. 

त्यांनी मेरा गाव मेरा देश, ऐलान, इन्कार, अमर अकबर अँथनी, लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, जुर्म आदीसह शंभराहून अधिक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी 1982 मध्ये अचानक बॉलिवूडला रामराम करून आचार्य आशो रजनीश यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा चित्रपट क्षेत्राकडे वळले. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाबाबत चित्रपटक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Web Title: veteran actor vinod khanna passes away