esakal | अभिनयासाठीच जीव येडापिसा...!
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनयासाठीच जीव येडापिसा...!

अभिनयासाठीच जीव येडापिसा...!

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष.

ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत असल्यानं दहावीच्या परीक्षेशीच ‘क्रॉम्प्रमाईज’ केलं. शूिटंगच्या शेड्यूलमुळं सगळे पेपर देता आले नाहीत. पण, जुलैमध्ये राहिलेले पेपर देणार आहे. शेवटी अभिनयासाठीच जीव येडापिसा झाला होता आणि आयुष्यात याच क्षेत्रात करियर करायचं ठरलयं...विदुला चौगुले संवाद साधत होती.

छोट्या पडद्यावरून गेल्या महिन्याभरात ती घराघरांत पोचली आहे. जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं आणि एकदा मनाशी पक्का निर्धार केला की झपाटून कामाला लागायचं, हाच संस्कार कलापूरनं रुजवला आणि आयुष्यातील पहिल्याच ऑडिशनमध्ये सिलेक्‍ट होऊन लीड रोल करण्याची संधी मिळाल्याचेही ती आवर्जून सांगते. 

विदुलाची शाळा चाटे स्कूल. शालेय शिक्षण घेतानाच अभिनयाबरोबरच ती जलतरण आणि नृत्यातही पारंगत व्हायचा प्रयत्न करत होती. पण, अभिनय हा तिच्यासाठीचा प्राधान्यक्रम राहिला. शाहूपुरीतील शिंदे ॲकॅडमीत अभिनयाचं प्रशिक्षण घेतानाच तिचं बालरंगभूमीवर पदार्पण झालं आणि तिचा पुढचा प्रवास सुरू झाला. ‘आदिंबाच्या बेटावर’, ‘गणपती बाप्पा हाजीर हो’, ‘झाडवाली झुंबी’, ‘राखेतून उडाला मोर’, ‘सारं कसं शांत शांत’, ‘माता द्रोपदी’ आदी नाटकातून तिनं विविध भूमिका साकारल्या. या नाटकांना राज्यभरातील विविध स्पर्धांत अनेक बक्षिसं मिळाली.

‘डाग’ या लघुपटातही तिची भूमिका होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या राज्य बालनाट्य स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं. सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग- ‘सीसीआरटी’ ही राष्ट्रीय पातळीवरची शिष्यवृत्तीही तिला मिळाली. दरम्यान, वयाच्या सोळाव्या वर्षीच अभिनेत्री म्हणून तिचं दिमाखदार पदार्पण झालं आहे.

काय करायचं हे अगोदरच ठरवलं होतं. त्यामुळे अभिनयाच्या ज्या संधी मिळाल्या, त्या प्रत्येक संधीचं सोनं करत गेले. माझा निर्णय ठाम असला तरी शिंदे ॲकॅडमीचे सुनील शिंदे यांच्यासह सर्व मार्गदर्शक आणि आई-वडिलांचा सल्ला घेऊनच दहावीची परीक्षा नंतर देण्याचा अंतिम निर्णय घेतला.
- विदुला चौगुले

loading image