शक्तिशाली महिला साकारायला आवडतं 

vidya balan
vidya balan

विद्या बालन "परिणिता'पासून "कहानी 2'पर्यंतच्या चित्रपटांत तिनं केलेल्या नायिकाप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. महिलांना सक्षम दाखविणारे, त्यांच्या संसारापासून समाजातील संघर्षापर्यंतचे अनेक पैलू मांडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. "बेगम जान' या तिच्या आगामी आणि पुन्हा एकदा नायिकाप्रधान चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती पुण्यात आली होती. यावेळी तिच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पा. 

प्रश्‍न : तू कायमच वेगळ्या आणि महिलांना स्वयंभू, शक्तिशाली दाखविणाऱ्या भूमिका करत आली आहेस. "बेगम जान'मध्ये तुला नक्की कोणती गोष्ट आवडल्यानं तू ही भूमिका स्वीकारलीस? 
विद्या : "बेगम जान' ही शक्तिशाली महिलेचीच गोष्ट आहे. अशी महिला मी पडद्यावर किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही पाहिलेली नाही. या भूमिकेला अनेक पैलू आहेत. महिलांची ओळख "कायम काही तरी देणारी, त्याग करणारी,' अशीच राहिली आहे. बेगमही तशीच आहे, मात्र त्याचबरोबर ती वेळ प्रसंगी पेटून उठणारीही आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्‍वभूमीवर एका वेश्‍येच्या आयुष्यात घडणारी ही कथा आहे आणि आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी बेगम करीत असलेला संघर्ष चित्रपटात मांडण्यात आला आहे. मला क्‍लासिक सिनेमांचे रीमेक व्हावेत, असं वाटतं. त्यामुळंच मूळ बंगालीत आलेल्या या सिनेमात मी काम करण्याचं ठरवलं. मला "शोले'मधील गब्बर सिंगची भूमिका करायला आवडलं असतं आणि "बेगम जान'मुळं मला गब्बर इतकंच प्रभावशाली पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. 

प्रश्‍न : या भूमिकेसाठी तू काय तयारी केलीस? 
विद्या : खरंतर "कहानी 2'चं चित्रण संपल्यानंतर 15 दिवसांतच या चित्रपटाचं चित्रण सुरू झाल्यानं मला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, दिग्दर्शक श्रीजित मुखर्जीनं पटकथेवर खूप संशोधन केलं असल्यानं माझं काम सोपं झालं. या भूमिकेसंदर्भात मला पडलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर या पटकथेत होतं. बेगमची कथा पंजाबमध्ये घडत असली, तरी ती मूळची लखनौची राहणारी आहे. त्यामुळं तिच्या बोलण्यात उर्दूचा लहेजा आहे. त्याचा अभ्यास मी केला. फाळणी संदर्भात मी याआधी भरपूर वाचन केलं आहे. "तमस'सारख्या मालिकेमुळं मला त्या काळाची अधिक माहिती मिळाली आहे. वेश्‍यांच्या आयुष्याबद्दलही मी वाचन केलं. समाजशास्त्राची विद्यार्थिनी असल्यानं मी विद्यार्थिदशेत वेश्‍यांच्या समस्येवर प्रकल्पही केला होता. या सर्वांचा उपयोग मला ही भूमिका समजावून घेताना, ती साकारताना झाला. 

प्रश्‍न : "बेगम जान'मध्ये नायिकेच्या तोंडी अनेक शिव्या आहेत. याचा तुझ्या इमेजवर परिणाम होईल असं वाटलं नाही का? 
विद्या ः मला सुरवातीला शिव्या देताना संकोचल्यासारखं नक्कीच वाटलं, मग तो कथेचाच एक भाग असल्यानं मी सरावले. यातून माझ्या इमेजला काही धोका पोचेल हा प्रश्‍नच मला पडला नाही, कारण मी स्वतःला इमेजमध्ये बांधून घेतच नाही. या कारणामुळं मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. 

प्रश्‍न : नायिकाप्रधान चित्रपट स्वीकारण्याचा तुझा निर्णय एका टप्प्यावर फसला आणि अनेक चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरले. तेव्हा तू हा विचार बदलण्याचा विचार केलास का? 
विद्या : अजिबात नाही. हे खरंय की माझे काही चित्रपट पडले, मात्र मी चांगल्या लोकांबरोबर काम करीत होते. माझं काम मी खूप प्रामाणिकपणे करीत होते. मी सुरवातीला चित्रपट पडल्यानंतर खूप वेळ विचार करायचे. मात्र, चित्रपट हीट किंवा फ्लॉप ठरणं आपल्या हातात नसतंच, हे माझ्या लक्षात आलं. चित्रपट फ्लॉप झाला, तरी त्यामुळं मी फेल झालेले नाही असाच विचार मी करते. 

प्रश्‍न : तू कायमच नायिकाप्रधान चित्रपट करताना तुला कधी आमीर, शाहरुख, सलमान या खानमंडळींबरोबर काम करण्याची इच्छा झाली नाही का? 
विद्या : मला तशी गरज कधी वाटली नाही. हे सर्वजण खूप टॅलेंटेड अभिनेते आहेत, मात्र त्यांच्या चित्रपटांमध्ये मला करण्यासाठी भूमिका नसते आणि माझ्या चित्रपटांत त्यांना करण्यासारखी! 

प्रश्‍न : अनेकांना तू जन्मानं बंगाली असावीस असंच वाटतं. हे कसं? 
विद्या : मला अनेक चित्रपटांत बंगाली महिलेची भूमिका साकारावी लागली व माझा चेहराही बंगाली महिलांप्रमाणंच दिसतो. अनेक बंगाली लोक येऊन माझ्याशी थेट बंगालीतच बोलायला सुरवात करतात. मीही त्यांच्याशी बंगालीत बोलते, पण मी तमीळ असल्याचं कळाल्यावर त्यांना खूप आश्‍चर्य वाटतं. मी अनेक बंगाली दिग्दर्शकांकडं काम केल्यानं त्यांनी मला बंगाली लुक दिला आहे. "परिणिता'च्या आधीही मी एका बंगाली सिनेमात काम केलं होतं आणि पाहिल्याच चित्रपटात मिळालेल्या बंगाली लुकमुळं अनेकांचा तसाच समज झाला आहे. माझ्या आई म्हणते, की तुझं बंगालीशी पूर्वजन्मीचं काही नातं असावं. 

प्रश्‍न : नसिरुद्दीन शाह यांच्याबरोबर तू तीन चित्रपटांत काम केलंस. तो अनुभव कसा होता? 
विद्या : त्यांच्यासारख्या वरिष्ठ अभिनेत्याबरोबर काम करण्याचं मला सुरवातीला टेन्शनच आलं होतं. मी सेटवर गेल्यावर खुर्ची घेऊन एका बाजूला बसून राहायचे. मला खूप हसायला लागतं आणि ते खूप गंभीर असल्यानं चित्रण सुरू असताना मी खूप दबावाखाली असायचे. मात्र, त्यांनी एकदा मला अर्शद वारसीबरोबर दंगा करताना पाहिलं आणि नंतर तेही आमच्याबरोबर त्यात सहभागी होऊ लागले. माझ्यामुळंच ते एकदा शॉट देताना हसले आणि मी त्यांना खूप चिडवलं. त्यांच्यासारख्या अनुभवी कलाकाराबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळतं. 

प्रश्‍न :अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेल्या भूमिकांबद्दल काय सांगशील? 
विद्या : "पा'चा अनुभव खूप समृद्ध करणारा होता. खरंतर मला आर. बाल्की यांनी तुला अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारायची आहे, असं सांगितल्यावर हसूच आलं. मात्र, त्यानी पूर्ण भूमिका समजावून सांगितल्यावर मी ती स्वीकारली. त्यांच्याबरोबर "तीन'मध्ये साकारलेली भूमिका छोटी होती, मात्र अशा दिग्गज अभिनेत्यांचा सहवास तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातो. 

प्रश्‍न :अभिनेत्रींमध्ये "झिरो फिगर' ही संकल्पना सध्या जोरात आहे. त्याबद्दल तुला काय वाटतं? 
विद्या :झिरो फिगर या संकल्पनेवरच माझा विश्‍वास नाही. आपल्या देशात सांस्कृतिक व भौगोलिक विविधता आहे. त्यातूनच प्रत्येक प्रांतातील लोकांचं दिसणंही वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं शरीर विशिष्ट प्रकारचं असतं आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. मीही माझ्या शरीरात बदल करण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र आता मला मी आहे तशीच आवडते. प्रेक्षकांनीही मला तसंच स्वीकारलं आहे. 

प्रश्‍न :तू पुन्हा छोट्या पडद्यावर काम करणार का? 
विद्या :टीव्हीचं विश्‍व आता पूर्ण बदललं आहे. इथं लोक रात्रं-दिवस काम करतात. आता मला तेथील बिझी शेड्यूल जमंल, असं वाटत नाही. शाहरुख खानचं यश पाहूनच मी सिनेमात येण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही अनेक गोष्टींत मी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवते. चांगला प्रोजेक्‍ट मिळाल्यास मी पुन्हा टीव्हीवर येण्याचा विचार नक्कीच करेल. 

प्रश्‍न :"एक अलबेला'नंतर पुन्हा मराठीत काम करण्याचा विचार आहे? 
विद्या :मी "एक अलबेला' केला, पण मला त्यात फार मराठी बोलण्याची संधी मिळाली नाही. मी लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ यांचे अनेक चित्रपट आईबरोबर पाहिले आहेत. मराठीतही आता बिग बजेट चित्रपट बनत आहेत. भविष्यात चांगली कथा मिळाल्यास मराठीत नक्कीच काम करेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com