आजोबा आणि नातीचं गोड नातं 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

"बालपण देगा देवा' या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्याकडे वळत आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा - 

"बालपण देगा देवा' या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्याकडे वळत आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा - 

नऊ वर्षांच्या "पॉज'नंतर पुन्हा छोट्या पडद्यावर येताय... 
- हो, नऊ वर्षांनंतर... मध्यंतरीच्या काळात मला ज्या भूमिका ऑफर झाल्या त्या माझ्या मनाला पटल्या नाहीत. मी एवढी वर्षं टीव्हीपासून लांब असण्याचं कारणच ते आहे. मध्यंतरी मी "सिंहासन' म्हणून एक टॉक शो करत होतो; पण फार काही केलं नाही. "बालपण देगा देवा' या मालिकेच्या निमित्ताने मला एक चांगली भूमिका मिळाली. त्यामुळे लगेचच ती स्वीकारली. शशांक सोळंकी या मालिकेची निर्मिती करतोय. 

"बालपण देगा देवा' ही मालिका बालपणाविषयीच आहे? 
- हो. प्रत्येकाला आपलं बालपण खूप प्रिय असतं. ते जर पुन्हा अनुभवायला मिळणार असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. काही लोकांचं बालपण वाईट परिस्थितीत गेलेलं असतं; तर काही जणांचं चांगलं. पण कितीही झालं तरी बालपण हे बालपण असतं. कारण प्रौढ झाल्यानंतर आपल्या वाट्याला जी दु:खं येतात, त्या पार्श्‍वभूमीवर बालपणीची दु:खं ही फार किरकोळ वाटू लागतात. त्यामुळे बालपण हे सुखदच असतं. या सगळ्याचा प्रत्यय प्रेक्षकांना परत एकदा येणार आहे. सध्याच्या मुलांना चांगले संस्कार देणं फार महत्त्वाचं आहे. कारण आताची पिढी इतकी जलद गतीने धावण्याचा प्रयत्न करत्येय, की त्यात ती स्वत:लाही विसरून गेलीय मग संस्काराचं काय... त्यामुळे लहान मुलांवर जेवढे चांगले संस्कार करता येतील तेवढे करणं महत्त्वाचं आहे आणि या मालिकेतून ते प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

तुमच्याबरोबर मैथिली काम करतेय. तुमचं आणि तिचं आजोबा-नातीचं नातं जुळलंय म्हणे? 
- मैथिली अतिशय गोड, हुशार आणि चुणचुणीत मुलगी आहे. माझं आणि तिचं ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन ट्युनिंग अतिशय उत्तम जुळलं आहे. ती चित्रीकरणाला आल्यावर पहिल्यांदा मला पापा देते आणि मग शूटिंगला सुरुवात करते. जातानाही मला भेटून निरोप घेतल्याशिवाय जात नाही. ती अवघी सात वर्षांची मुलगी आहे; पण फार हुशार आहे. तिने याआधी "तू माझा सांगाती' या मालिकेत काम केलं असल्यामुळे तिला कॅमेऱ्यासमोर कसा अभिनय करायचा हे फार चांगलं कळतं. ती दिग्दर्शकाच्या सूचना बरोबर पाळते. सेटवर ती कायम चौकशा करत फिरत असते. फार गोड आहे ती. माझी लाडकी आहेच. मी ऑफ स्क्रीनसुद्धा तिचा आजोबा झालो आहे. 

मालिकेतले आजोबा आणि नातं कसे आहेत? 
- ती लहान सात वर्षांची आणि मी सत्तर वर्षांचा आजोबा. पण मी तिच्याशी बोबडं वगैरे बोलत नाही हां. मी म्हणजे तिचे आजोबा तिच्या पालकांप्रमाणे तिचा सांभाळ करतात. मी या मालिकेत आयुर्वेदाचार्याची भूमिका साकारतोय. माझ्याकडे पाहून ती लहान मुलगीही शिकतेय. ती एवढी हुशार आहे की ती स्वत: कधी कधी सांगते की या रोग्याला आपण हे औषध देऊया किंवा का नाही दिलं, असे प्रश्‍न ती विचारत असते. तिने मोठेपणी डॉक्‍टर व्हावं अशी त्या आजोबांची इच्छा आहे. आजोबा आणि नातीमधलं नातं हे गोड असतंच. त्यामुळे आमच्यामधलं नातंही अगदी तसंच दाखवलंय. 

मालिकेतल्या आजोबांचं वेगळेपण काय? 
- माझे आई-वडील हे खूप कडक शिस्तीचे होते. त्यांनी लहानपणापासून मला संस्कारांचं बाळकडू देऊन लहानाचं मोठं केलं. या मालिकेत फक्त शिकवण एके शिकवण देत न बसता नातीला मायाळूपणाने आणि छान पद्धतीने समजावून सांगणारा हा आजोबा आहे. ज्या संस्कारांमध्ये ते वाढले आहेत ते सगळे संस्कार त्यांना नातीला द्यायचे आहेत. त्यामुळे ही मलिका करताना मला माझ्याही लहानपणीचे दिवस आठवले आणि निसर्गाविषयी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे पाणी वाया घालवू नये, प्रदूषण करू नये या गोष्टींकडे पुन्हा एका नव्या दृष्टीने पाहता आलं. 

Web Title: vikram gokhale interview