विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळय़े प्रथमच एकत्र

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

आज केवळ महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर परदेशातही गणेशात्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणामध्ये चित्रपटसृष्टीही हिरीरीने सहभागी होत नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असते. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं नवं चित्रपटगीत गजाननाचं स्वागत करणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. कोणत्याही शुभकार्यात आद्य पूजनीय असलेल्या गणेशाची महती वर्णन करणारं ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटातील भक्तीरसाने भारलेलं गणेशगीत यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सज्ज झालं आहे. ऑडबॉल मोशन पिक्चर्स तर्फे नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मुंबई : आज केवळ महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर परदेशातही गणेशात्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणामध्ये चित्रपटसृष्टीही हिरीरीने सहभागी होत नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असते. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं नवं चित्रपटगीत गजाननाचं स्वागत करणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. कोणत्याही शुभकार्यात आद्य पूजनीय असलेल्या गणेशाची महती वर्णन करणारं ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटातील भक्तीरसाने भारलेलं गणेशगीत यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सज्ज झालं आहे. ऑडबॉल मोशन पिक्चर्स तर्फे नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
गणेशाचं स्वागत करणाऱ्या देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटातील ‘आला आला आला आला...’ हे गीत लवकरच रसिक दरबारी सादर होणार आहे. अर्थपूर्ण शब्दरचना आणि सुमधूर संगीताच्या जोडीला नेत्रसुखद छायाचित्रण ही या गणेशगीताची खास वैशिष्ट्ये आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांच्यासह देव देव्हाऱ्यात नाही  या चित्रपटातील इतर कलावंतांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये हे चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आले आहेत.
 
गीतकार बाबा चव्हाण यांनी लिहिलेल्या तसंच संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध् केलेल्या देव देव्हाऱ्यात नाही मधील या गणेशगीतात प्रेक्षकांना मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचं दर्शन घडणार आहे. सहजसुंदर शब्दांना साजेसं संगीत आणि त्याला अनुसरून करण्यात आलेलं चित्रीकरण हा या गीताचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. यामुळेच या गाण्यात परफॉर्म करताना गणेशभक्तीत न्हाऊन निघाल्याची भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केली. सुहासिनी मुळ्ये यांच्या म्हणण्यानुसार हे गीत आबालवृद्धांना ताल धरायला लावणारं आहे.
 
या गाण्याद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चाळ संस्कृतीमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचा आनंद अनुभवता येईल असं देव देव्हाऱ्यात नाही  चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांचं म्हणणं आहे. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी नावीन्यपूर्ण कोरिओग्राफीचा साज चढवत हे गाणं नेत्रसुखद बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.  चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आशिष देव यांचे आहेत.

Web Title: vikram gokhale suhasini mulye togather esakal news