
लग्नानंतर मितालीने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
अभिनेत्री मिताली मयेकरने २४ जानेवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरशी लग्नगाठ बांधली. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लग्नानंतर मितालीने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं तिने मोकळेपणाने दिली. यावेळी 'लग्नानंतर कसं वाटतंय', हा आपुलकीचा प्रश्न एकाने विचारला असता मितालीने स्वयंपाकघरातला तिचा फोटो पोस्ट करत भन्नाट उत्तर दिलं.
स्वयंपाकघरातील सेल्फी मितालीने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आणि त्यावर 'संसारी' असं लिहिलं. यावेळी लग्नात मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट कोणती असाही सवाल एकाने केला. त्यावर मितालीने विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचा फोटो पोस्ट केला. सासरी सर्वांत जास्त लाड कोण करतं, असं विचारले असता तिने तिच्या भावोजींसोबतचा फोटो पोस्ट केला. एका चाहत्यांच्या आग्रहास्तव मितालीने तिच्या लग्नाची पत्रिकासुद्धा पोस्ट केली.
हेही वाचा : जाणून घ्या, मितालीने लग्नातल्या साड्यांची शॉपिंग कुठून केली?
प्रश्नोत्तरांच्या या सेशनमध्ये सिद्धार्थने प्रपोज कसं केलं, याचंही उत्तर मितालीने दिलं. 'माझ्या वाढदिवसानिमित्त त्याने एका सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं आणि त्या पार्टीत माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींसमोर त्याने प्रपोज केलं', असं सांगत मितालीने प्रपोज रिंगचा फोटो पोस्ट केला. लग्नातील तुझा सर्वांत आवडता फोटो कोणता असं विचारल्यावर मितालीने तिचा, सिद्धार्थचा आणि तिच्या पाळीव श्वानासोबतचा फोटो पोस्ट केला.
हेही वाचा : सिद्धार्थ-मितालीने लग्नानंतर निवडलं महाराष्ट्रातील 'हे' सुंदर ठिकाण; जाणून घ्या किंमत
सिद्धार्थ-मिताली जून २०२० मध्ये लग्न करणार होते. पण करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. २४ जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील ढेपे वाडा याठिकाणी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.