
Women's Day 2023: महिला दिनी हेमांगीनं केला पुरुषांना सलाम..दोन महापुरुषांचे स्मरण करत म्हणाली,'यांच्यामुळेच..'
Women's Day 2023 Hemangi Kavi Post: हेमांगी कवीच्या पोस्ट तिच्या अभिनयापेक्षा अधिक गाजताना दिसतात. आता जेवढ्या तिच्या पोस्ट तिखट असतात तेवढाच तिचा अभिनय टोकदार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाटक,मालिका,सिनेमा अशा सगळ्याच माध्यमातून हेमांगीनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे ही फक्त बोलते..अभिनयाच्या नावानं ठणठण गोपाळा असं तिच्या बाबतीत मुळीच नाही.
त्यामुळे तिच्या पोस्टची बहुतेकदा दखल ही घेतलीच जाते. आता महिला दिनाच्या निमित्तानं तिनं आपल्यावर टीका करणाऱ्यांविरोधात लिहिलेल्या पोस्टमधील ओळीन ओळ तुमच्या डोक्यात त्या कुत्सित विचारसरणी विरोधात तिडीक आणेल एवढं मात्र नक्की.
हो पण तिच्या पोस्टचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिनं आज महिला दिनी चक्क पुरुषांचे आभार मानले आहेत.
चला हेमांगीच्या या इंट्रेस्टिंग पोस्टविषयी जाणून घेऊया.(Women's Day 2023 Hemangi Kavi Post)
हेमांगी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. तिची प्रत्येक पोस्ट गाजते म्हणण्यापेक्षा वाजते म्हणणं अधिक योग्य ठरेल. तिनं महिला दिनानिमित्तानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात बिनधास्त,स्वच्छंदी हेमांगी पहायला मिळतेय सोबत बॅकग्राउंडला मराठीतलं एक सुमधूर अर्थपूर्ण भावगीत ऐकायला मिळत आहे..
'एकाच या जन्मी जणू.. फिरुनी नवी जन्मेन मी..' याच गाण्याला धरुन हेमांगीची पोस्ट आहे. आणि याच गाण्यातून स्त्रीचं अस्तित्व खुप सुंदर पद्धतीनं ज्यांनी समोर आणलं असे गाण्याचे गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार-गायक सुधीर फडके यांना 'महापुरुष' संबोधत अशा विचारसरणीच्या अनेक पुरुषांचे तिनं महिला दिनानिमित्तानं आभार मानले आहेत.

हेमांगी कवी म्हणाली आहे,''पुढचा जन्म वगैरे असतो नसतो… मला माहीत नाही! पण या गाण्याप्रमाणे याच जन्मातंच फिरून फिरून प्रत्येक क्षणाला नवा जन्म घेत राहीन! किती ही संकटं आली, माझा आवाज दाबण्याचा, माझी मतं धुडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी बोलत राहीन, लिहीत राहीन.
जी एका नविन जीवाला जन्म देऊ शकते ती स्वतःला ही पुन्हा पुन्हा जन्म देऊच शकते की. स्वतःला जपू, वाढवू शकते. न घाबरता, न लाजता. तिला संपवण्याचं सामर्थ्य कुणामध्येच नाही हे पदोपदी लक्षात ठेवायला हवं!
या गाण्याची गंमत अशी की हे गाणं एका पुरुषाने कवी सुधीर मोघे यांनी लिहीलंय आणि तितक्याच सुंदर पद्धतीने स्वरबद्ध केलंय आणखी एका पुरुषाने संगीतकार सुधीर फडकेंनी.
बाईचं अंर्तमन, तिचं जगणं अशाच काही महापुरूषांना कळलं असावं म्हणूनच आज मी हे लिहू, वाचू, व्यक्त करू शकतेय.
अशाच पुरूषांच्या विचारसरणीमुळे आणि साथीने जर हा दिवस येऊ शकतो तर तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी सर्व स्तरातील सर्व बाबतीत समानता येऊन स्त्रीयांसाठीचा असा एक खास दिवस साजरा करणं थांबेल आणि खऱ्या अर्थानं स्त्रीजन्म साजरा होईल तो पर्यंत
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा''.