यशवंत नावाचा स्नेहगंध विरला...

सुधाकर काशीद
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कोल्हापूर - जयप्रभा स्टुडिओत जायचं, तेथील मळलेल्या इस्त्री गेलेल्या कापड्याचं गाठोडं घ्यायचं, घराकडे आणायचं, धुवायचं, इस्त्री करायचं आणि पुन्हा गाठोडं सायकलवरून घेऊन जयप्रभा स्टुडिओत जायचं. हे काम यशवंत करायचे. 

हे करताना स्टुडिओत मारुतीच्या देवळाजवळ आले, की त्यांचा थांबून मारुतीला नमस्कार असायचा. हा नमस्कार कधी चुकला नाही आणि यशवंत यांच्या कामातही कधी खंड पडला नाही; पण या कामातून यशवंत घडत गेले. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांच्या निर्मळतेनेच सर्वत्र वावरत राहिले आणि कोल्हापूरच्या चित्रपट, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात २५ वर्षे यशवंत भालकर या नावाचा एक स्नेहगंध भरून राहिला. 

कोल्हापूर - जयप्रभा स्टुडिओत जायचं, तेथील मळलेल्या इस्त्री गेलेल्या कापड्याचं गाठोडं घ्यायचं, घराकडे आणायचं, धुवायचं, इस्त्री करायचं आणि पुन्हा गाठोडं सायकलवरून घेऊन जयप्रभा स्टुडिओत जायचं. हे काम यशवंत करायचे. 

हे करताना स्टुडिओत मारुतीच्या देवळाजवळ आले, की त्यांचा थांबून मारुतीला नमस्कार असायचा. हा नमस्कार कधी चुकला नाही आणि यशवंत यांच्या कामातही कधी खंड पडला नाही; पण या कामातून यशवंत घडत गेले. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांच्या निर्मळतेनेच सर्वत्र वावरत राहिले आणि कोल्हापूरच्या चित्रपट, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात २५ वर्षे यशवंत भालकर या नावाचा एक स्नेहगंध भरून राहिला. 

यशवंत भालकर यांचा आज मृत्यू झाला आणि कोल्हापूरकरांना सकाळी सकाळी धक्काच बसला. यशवंत हे चित्रपटसृष्टीतले त्यामुळे स्पॉटबॉयपासून मोठ्या कलावंतांपर्यंत सारे जण हळहळले. ते गड व किल्लेप्रेमी, त्यामुळे त्यांच्या सहवासात असलेल्या साहसी तरुणांना हुंदका दाटून आला. ते सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळे ‘अवनी’पासून ते रोटरी क्‍लबपर्यंतच्या सर्व घटकांत त्यांच्या मृत्यूचा मेसेज क्षणाक्षणाला फिरत राहिला. पर्यावरणप्रेमीही, त्यामुळे त्यांचा रोज सकाळी अधिकाधिक वावर असलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर फिरायला येणाऱ्यांची पावलेच थबकली आणि ते राहात असलेल्या मंगळवार पेठेत तर त्यांच्या अंत्यदर्शनाला जे आले, ते डबडबलेल्या डोळ्यांनीच माघारी गेले. आज सकाळी यशवंत यांच्या मृत्यूच्या वार्तेनेच कोल्हापूरकरांचे मेसेज बॉक्‍स भरून गेले. 

यशवंत भालकर जरूर अलीकडे सर्वांना माहितीचे, पण ते होते तरी कोण? उमेदीच्या काळात ते एक कष्टकरी तरुण होते. जयप्रभा स्टुडिओतील कपडे धूत होते. त्यांना इस्त्री करत. इतर वेळेत इतरांच्या कपड्याला इस्त्री करून देण्याचे काम करत होते. कोळशाच्या तावाने तापलेली इस्त्री कपड्यावर फिरवता फिरवता घामाने डबडबत होते; पण त्याच्यांत एक वेगळा माणूस वावरत होता आणि ते संधी मिळाली की आपल्यातले वेगळेपण दाखवत होते. 

एकदा सकाळी दहा वाजताच ते ‘सकाळ’च्या ऑिफसमध्ये आले. मला म्हणाले, ‘‘दाद्या जरा पाच मिनिटे भवानी मंडपात चलं. मी आणि ते लुनावरून भवानी मंडपात आलो. मंडपाच्या भिंतीवर, नगारखान्याच्या भिंतीवर चिटकवलेल्या ओंगळ जाहिराती त्यांनी दाखवल्या आणि म्हणाले, ‘आपण हे स्वच्छ करायचं.’ मी छायाचित्र घेऊन भवानी मंडपाच्या दुरवस्थेची बातमी दिली. लगेच यशवंत यांनी पन्नास-शंभर तरुण एकत्र केले आणि एका रविवारी भवानी मंडपाचा सारा परिसर श्रमदानाने साफ केला. आपणच आपल्या कोल्हापूरसाठी थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे, असं म्हणत त्यांनी हा उपक्रम राबवला आणि एक वेगळा संदेश जनमाणसांत पोचवला. 

यशवंत यांचा वावर कपडेपटाच्या निमित्ताने जयप्रभा स्टुडिओत, त्यामुळे साहजिकच चित्रपटसृष्टीत त्यांना गोडवा लागला आणि स्टुडिओत जे काम वाट्याला येईल, ते मनापासून करू लागले. निर्माते व दिग्दर्शकांचा तर ते मोठा आधार ठरले आणि तब्बल १४ वर्षे त्यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून सिनेक्षेत्रात वावर राहिला. १९९७ ला त्यांनी ‘घे भरारी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १४ राज्य पुरस्कार मिळवून विक्रम करणारा ठरला. 

चित्रपट क्षेत्रात एवढा मोठा सर्वोच्च सन्मान मिळवूनही यशवंत भालकर हे लखलखाटापासून लांबच राहिले; पण पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती, पंचगंगा नदी स्वच्छता, रंकाळा संवर्धन, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, कोल्हापूर आणि १८५७ च्या बंडाची स्मृती, चित्रपट महामंडळ यांच्या कामात सक्रिय राहिले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्ष झाले आणि पडद्यामागच्या कलाकारापासून ते चंदेरी कलाकारांच्या हितासाठी ते झटू लागले. शांताकिरण स्टुडिओ पाडला जाऊ नये, म्हणून खूप झटले, पण एक दिवशी हा स्टुडिओ पाडला. तेव्हा ढसढसून रडले. 

भालकर यांनी खूप दिवसाने घर बांधले. नव्या घरात आपण सजावटीसाठी आकर्षक फोटो फ्रेम करून लावतो, पण त्यांनी नव्या घरात जुन्या घराच्या चौकटीचे छायाचित्र आवर्जून लावले आणि जुन्या घराबद्दल असलेल्या कृतज्ञतेलाच आवर्जून ठळक स्थान दिले. या ना त्या निमित्ताने ते दिवसभर दुसऱ्याच्या कामात मदत करण्यासाठीच फिरत असत. घरी आल्यावर मात्र आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे यांच्यात रमत. काल दुपारीच आईला थंडी वाजते म्हणून नवे सॉक्‍स घेऊन आले. 

आईला म्हणाले, ‘हे पायात घाल.’ ८५ वर्षांची त्यांची आई त्यांच्याकडे बघतच राहिली. दोन दिवस मात्र ते थोडे बेचैन होते. एखाद्या डॉक्‍टरला तब्येत दाखवू म्हणत होते; पण तसे घडले नाही. आज पहाटे खूप अस्वस्थ झाले. तातडीने दवाखान्यात नेले; पण तोवर ते आपल्याला सोडून गेले होते. अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली. सारी गर्दी सुन्न होती. तिरडीवरही फुलांच्या गराड्यात यशवंत यांचा चेहरा दुरूनही लख्ख दिसत होता. ओठ अर्धवट उघडे होते. नेहमी काही तरी नवे आणि वेगळे सांगणाऱ्या यशवंत यांना जणू जातानाही काही सांगायचे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashawant Bhalkar No more