'झिंग प्रेमाची' सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

ज्योतीचा भाऊ विशाल समंजस असतो. ज्योती आणि दिपकचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. अशी ही कथा पुढे सरकत जाते.

प्रेम एक अशी भावना आहे की वर्षानुवर्षे त्यावर जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवीत आलेत आणि पुढेही बनवतील. प्रेमाच्या गोष्टीवर आधारित आणखी एक चित्रपट लवकरच येत आहे तो म्हणजे 'झिंग प्रेमाची'.

विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन शाहिद खान यांनी व्ह्यूफाईंडर प्रॉडक्शनच्या अंतर्गत केलं आहे. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. चित्रपटात संगीताचे बरेच महत्व असून महेश-राकेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे व गीतं विजय गमरे आणि शाहिद खान यांच्या लेखणीतून उतरली आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून त्यातील एक सुफ़ी गाणं येणाऱ्या रमजान ईद मुळे अजूनच खास झालं आहे.

zing premachi

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाणी ताज महाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आली आहे. एका गावात राहणारे दीपक आणि ज्योती यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असतं. परंतु गाव, समाज आणि त्यांच्या घरच्यांचा प्रखर विरोध असतो. रविकांत हा गावगुंड त्यांच्याबाबतीत अनेक अफवा उडवतो. त्यामुळे दोघांच्या घरातल्यांचा रोष अजूनच वाढतो. ज्योतीचा भाऊ विशाल समंजस असतो. ज्योती आणि दिपकचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. अशी ही कथा पुढे सरकत जाते.

या चित्रपटातून संदेश गौर आणि शीतल तिवारी हे नवीन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहेत. त्यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीत बरंच नाव कमावलेलं असून त्यांना मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवायचंय. त्यांच्यासोबत अमोल चौधरी, रतन सोमवरे व अनिल मोरे हेदेखील मराठीत पदार्पण करीत असून त्यांना रंजीत जोग, स्मिता पवार, मोहक कंसारा, मृणालिनी जांभळे, जयराम शाहू, विपुल देशपांडे, पोपटराव चव्हाण, दिपज्योती नाईक, स्मृती पाटकर आणि गणेश यादव यांची मोलाची साथ लाभलीय.

zing premachi

'झिंग प्रेमाची' चे डीओपी जय नंदन कुमार हे आहेत. राजेश राणे व प्रितपाल गिल (माँटी) यांनी कोरिओग्राफी तर शैलेश सपकाळ साऊंड डिझाइनिंग केली आहे. संकलनाची जबाबदारी उमाशंकर मिश्रा (विकी) यांनी सांभाळली आहे आणि रियाझ बलूच हे एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर आहेत.

zing premachi

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zing premachi new marathi movie