
महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः webeditor@esakal.com
Call Center : 9225800800
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. आपणही सहभागी व्हा #SakalForMaharashtra चळवळीत...
जगभरात, भारतही उद्योगांच्या आणि नोकऱ्यांच्या संधी खूप आहेत. पण त्या कुणाला, तर गुणवत्ता असलेल्यांसाठी आहे. आज परिस्थिती अशी आहे, की चांगला प्लंबर, चांगले सुतारकाम करणारा, गवंडी मिळत नाही. यात दोष हा फक्त शिक्षण व्यवस्थेला द्यावा लागेल. त्यात तातडीने बदलाची गरज आहे. परंतु महाराष्ट्रात जन्म घेऊन जगभर उद्योग आणि व्यवसाय करणारे किमान दहा लाख लोक आहेत. माझा त्या समाज बांधवांना "सकाळ'च्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची आणि कष्टाची गाथा राज्यातील तरुणांपर्यंत पोचवावी. त्यातून तरुणांना नोकरी मागण्याची नाही, तर स्वरोजगार निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. अमेरिका, इंग्लंड अशा परदेशातही अनेकांचे व्यवसाय आहेत. त्यांनी आपण कसे मोठे झालो, परदेशात व्यवसाय कसा सुरू केला, त्यासाठी काय केले, याचे मार्गदर्शन तरुणांना उपलब्ध करून द्यावे. या कल्पनेला चळवळीचे रुप देता येईल. यातून खेड्यात जन्माला येऊनही परदेशी व्यवसाय करता येऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल. परदेशी काम करणाऱ्यांनी एका जरी तरुणाला बाहेर जाऊन मोठे होण्याची प्रेरणा दिली, तरी दहा लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असाच सुटू शकतो.
तरुणांमधील अस्वस्थताही कमी होईल. एक दोन जणांनी या प्रश्नी काम करून उपयोग नाही. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. भारत तरुण देश आहे; पण त्याची ओळख कौशल्य नसलेला बेरोजगार तरुणांचा देश, अशी होऊ नये. मराठा समाज शेतीवर आधारित आहे. पण शेतीत काम नाही म्हणून तरुण बाहेर पडतो. म्हणूनच शेतीची चळवळ उभी करावी लागेल. त्यातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवावे लागेल. महाराष्ट्रात चार कोटी एकर जमीन आहे, त्यातील एक लाख एकर ओलिता खाली आहे. त्यावर काम करून कमी खर्चाची आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या शेतीचे मार्गदर्शन करू शकलो, तर खूप मोठे काम होईल. माझे म्हणणे आहे की तरुण त्यांच्या गावातून बाहेर पडूच नये. त्यासाठी विषमुक्त शेतीची चळवळ उभी करीत आहोत. काही शेतकरी दत्तक घेऊन आम्ही प्रयोग केला आहे. यातून तरुण स्थलांरित होणार नाही. त्याचे उत्पन्न वाढल्याने त्याला गावातच चांगले जगता येईल. या चळवळीसाठी माझी योगदान देण्याची तयारी आहे.
- हनुमंत गायकवाड (अध्यक्ष, बीव्हीजी)
आपणही सेवा देऊ शकता...
महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः webeditor@esakal.com
Call Center : 9225800800