
महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः webeditor@esakal.com
Call Center : 9225800800
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
मातीमध्ये काम करणारा विविध जातसमूहातील शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनेच काम करीत आहे. पूर्वी शेती चांगली पिकत असल्याने शेतकरी शिक्षण, उद्योगापासून लांब राहिला. काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गुजराण अवघड बनली आहे. त्यामुळे शेतीवर अवंलबून असलेला वर्ग विविध प्रश्नांचा सामना करीत आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी "सकाळ'ने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. या मोहीमेत काम करण्यास आम्ही सदैव तयार आहोत.
- प्रा. चंद्रकांत भराट, औरंगाबाद
उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारी वाढलेली आहे. शिक्षण घेतल्यानंतर रोजगारासाठी काय करावे, हेच कित्येक युवकांना माहित नसते. युवकांना, महिलांना प्रशिक्षण मिळाल्यास निश्चितच फायदा होईल. "सकाळ'ने याबाबत पुढाकार घेतला, तो खरंच कौतुकास्पद आहे. सकाळ रिलीफ फंड, तनिष्का व्यासपीठ, अॅग्रोवन, साम टीव्ही, सकाळ सोशल फाऊंडेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना आमचा पाठिंबा असेल.
- इंद्रजित सरकार निंबाळकर, ठाणे
राज्यातील अनेक भागात व्यवसायपूरक साधनसामग्री उपलब्ध नाही. आमच्या कोकणात शेतीच मुळात कमी. सध्या मिळत असलेल्या शिक्षणाद्वारे चांगली नोकरी मिळेना झाली आहे. या परिस्थितीमुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. "सकाळ'ने याबाबत पुढाकार घेतला असेल, तर योग्य मार्ग काढून उपाययोजना कराव्यात. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण युवावर्गाला द्यावे.
- कुणाल शिंदे, चिपळूण
समाजाला उभारी देण्यासाठी कोणीतरी सुरवात करणे गरजेचे होते. ती सुरवात केल्याबद्दल "सकाळ'चे अभिनंदन. आपल्या प्रश्नांवर भांडत, रडत बसण्यापेक्षा युवकांचे प्रबोधन करुन स्वयंरोजगार, चांगली नोकरी, छोटेमोठे व्यापार करण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या यशस्वी उद्योजकांनी पुढाकार घेऊन तरुणांना सामील करुन घ्यायला हवे. जिल्हानिहाय उद्योजकांची यादी तयार करुन दोन चार गावे वाटून द्यावी. आर्थिक मागासलेल्या व्यक्तीला मदत मिळेल अशी व्यवस्था, सरकारी योजनांची माहिती, बॅंकांच्या वित्त सहाय्यविषयी माहिती मिळण्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी तालूकानिहाय केंद्रे सुरु करावीत. मी स्वतः तालुका, जिल्हापातळीवर काम करण्यास तयार आहे. इचलकरंजी तालुक्यात एक कार्यालय सुरु करण्याचीही माझी तयारी आहे.
- सुरेश पाटील, इचलकरंजी, कोल्हापूर