गौरी-गणपतीसाठी औरंगाबाद विभागातून शंभरावर बस कोकणात 

अनिल जमधडे
Monday, 2 September 2019

मराठवाड्यातील अनेक फेऱ्या रद्द, बससेवेवर विपरीत परिणाम 

औरंगाबाद - गौरी-गणपतीसाठी कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून तब्बल 105 बस पाठविण्यात आल्या आहेत. या पाठविलेल्या बसमुळे शंभरपेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र गैरसोय सहन करावी लागणार आहे. 

मुंबई आणि कोकणामध्ये गौरी-गणपतीला अधिक महत्त्व आहे. मोठ्या भक्तिभावाने दोन्ही सण-उत्सव साजरे केले जातात. कोकणातील मुंबईत असलेले नागरिक गणेश चतुर्थीला कुठल्याही परिस्थितीत गावी गेल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या मुंबई विभागाला नियोजन करावे लागते. प्रत्येक वर्षी हजारो भाविक कोकणात जाण्यासाठी एसटी डेपोंमध्ये रीघ लावतात. त्यामुळे एसटीच्या संपूर्ण राज्यातून अवश्‍यकतेनुसार गाड्या मुंबई विभागात पाठविल्या जातात. यंदा औरंगाबाद विभागातील सर्व आगारांच्या एकूण 105 बस मुंबई, ठाणे, पनवेल अशा विविध आगारांना पाठविण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद विभागातील विविध गावी जाणाऱ्या शंभरपेक्षा अधिक फेऱ्या रद्द करून बस कोकणात पाठविण्यात आल्या आहेत. मुंबई-कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी मात्र येथील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. गणेशोत्सवात प्रत्येक वर्षी कोकणात गरजेनुसार बसगाड्या पाठविण्यात येतात. यंदाही 105 बस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार असली, तरीही एसटीतर्फे नियोजन करून प्रवाशांना बससेवा पुरविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about st bus