
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 31) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे पत्रकार विनोद पाटील यांनी सांगितले. यावेळी शहरातील समन्वयक उपस्थित होते.
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी डेडलाईन देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 31) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे पत्रकार विनोद पाटील यांनी सांगितले. यावेळी शहरातील समन्वयक उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चातर्फे सात प्रकारच्या मागण्यांचा फॉर्म्युला दिला आहे. यात मागावर्गीय आयोग राज्य सरकारला अहवाल कधी देणार, याची तारीख जाहीर करावी. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यादेश, कायद्यात रुपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन, अंमलबजावणी कधीपासून करणार याबाबत माहिती द्यावी. मेगाभरतीमधील मराठा समाजासाठीच्या 11 हजार 250 जागा त्वरीत भरणार काय किंवा स्थगिती देणार काय? आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये भरीव तरतूद, बॅंकानिहाय कर्ज प्रकरणाबाबत सक्ती करणार काय? आंदोलकांवरील गुन्हे कधी रद्द करणार याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना कधी आदेश देणार आहात. विद्यार्थ्यांची 50 टक्के शुल्क माफी ही कायमस्वरुपी लागु राहणार का? तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांना हुतात्मा जाहीर करणार का? या सर्वच प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करावीत. सचिव आणि राज्यपालांना मागण्यांचे पत्र देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत औरंगाबादेतील समन्वयकांची हजेरी होती.
आता चर्चा नाही कृती अपेक्षित
चार जीव गेले तरी, राज्य सरकारला गांभिर्य येत नाही. हिंसा नको म्हणूनच आम्ही फॉर्म्युला दिला आहे. एकेक मिनिट महत्वाचा आहे. त्यामुळे चर्चा नाहीतर मुख्यमंत्र्यांकडून कृती अपेक्षित आहे. आमची थांबण्याची तयारी आहे मात्र, हिंसा शमवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यावरच आहे. राज्यभर सुरु असलेले ठिय्या आंदोलन सुरुच राहणार आहे. दरम्यान कुणीही स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न करु नये. अशी विनंती समन्वयकांनी केली.