#MarathaKrantiMorcha बागडेंच्या घरापुढे आंदोलकांचा थाळीनाद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 August 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (ता. 5) थाळीनाद आंदोलन झाले. तीन तासांनंतर बागडे आंदोलकांना सामोरे गेले; मात्र आंदोलकांच्या प्रतिप्रश्‍नांना उत्तरे न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजता उस्मानपुरा येथील विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे घर गाठत थाळीनाद आंदोलन सुरू केले. थोड्याच वेळात बागडे घरातून निघून गेले. आंदोलन, घोषणाबाजी सुरूच होती. यात महिलांसह तरुणांची संख्या मोठी होती.

तीन तासांनंतर बागडे हे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह घरात आले. मराठा आरक्षणासंबंधी कागदपत्रांची फाइल घेऊन आंदोलकांना सामोरे गेले. या वेळी मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगांसह केलेल्या कार्यवाहीचा तारखेनिहाय माहिती दिली; तसेच आरक्षण हे भाजप सरकारच देणार, अशी ग्वाही देताना त्यावर माझीच सही असेल, असेही सांगितले. मात्र आंदोलकांचे समाधान झाले नाही. साऱ्यांनीच प्रतिप्रश्‍न करायला सुरवात केली. कालबद्ध कार्यक्रमाची विचारणा केली. या वेळी कुणालाही उत्तरे न देता बागडे वाहनातून पुन्हा बाहेर निघून गेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation haribhau bagade thalinad