जालन्याच्या तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मूळ जालना जिल्ह्यातील एकोणावीसवर्षीय तरुणीवर मुंबईतील चेंबूर भागात सामूहिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला. यातील पीडित तरुणी 25 जुलैपासून घाटी रुग्णालयात उपचार घेत असून वडिलांच्या मदतीने तिने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद - मूळ जालना जिल्ह्यातील एकोणावीसवर्षीय तरुणीवर मुंबईतील चेंबूर भागात सामूहिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला. यातील पीडित तरुणी 25 जुलैपासून घाटी रुग्णालयात उपचार घेत असून वडिलांच्या मदतीने तिने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

पीडित तरुणीचे कुटुंबीय जालना जिल्ह्यातील असून वडील शेती करतात. तिचे भाऊ व इतर नातेवाईक मुंबईतील चेंबूर परिसरात कामानिमित्त राहतात. भावाकडे मुलगी काही दिवसांपूर्वी राहण्यासाठी गेली होती. त्यावेळी चेंबूरमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. अत्याचारानंतर तिची प्रकृती खालावली. ती मुंबईहून गावी परतली, त्यावेळी तिच्या प्रकृतीबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली. तिला अधिक विश्‍वासात घेतल्यानंतर तिने आपली आपबिती पालकांना कथन केली. तरुणीवरील प्रसंगाने पालक हादरून गेले.

मुलीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 जुलैपासून ती उपचार घेत होती. अत्याचाराच्या प्रसंगानंतर ती प्रचंड भेदरलेली असून, पाच दिवसांच्या उपचारानंतर ती वडिलांसोबत बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोचली. त्यावेळी तिने अत्याचाराची बाब सांगितली; परंतु घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सांगण्याचीही तिची मानसिकताही नव्हती. अखेर तिच्या वडिलांनी घटनेबाबत माहिती दिल्यानंतर या प्रकरणात संशयितांविरुद्ध सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
भावाचा घेणार सविस्तर जबाब 
बेगमपुरा ठाण्याचे पोलिस सचिन सानप यांनी सांगितले, की तरुणीच्या भावाला बोलाविल्यानंतर तो उशिरा पोचणार असल्याने आम्ही क्षणाचाही विलंब न करता गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. तिचा भाऊ ठाण्यात आल्यानंतर सविस्तर जबाब घेण्यात येणार आहे. 
  
वाईट प्रसंगामुळे तरुणी भेदरली 
पोलिसांनी सांगितले, की तरुणीची विचारपूस केली त्यावेळी तिने आपल्यासोबत अत्याचार झाल्याची बाब सांगितली; परंतु या परिस्थितीत घटनेचा दिवस व वेळ पूर्णपणे ती सांगू शकली नाही. एवढी ती भेदरलेली असून पोलिसांनी या प्रकरणात काळजीने तत्काळ तक्रार नोंदवून घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang rape in Mumbai Crime