कर्णपुऱ्याची करणीमाता 

कर्णपुऱ्याची करणीमाता 

औरंगाबाद - शहरातील सर्वात जुने देवीचे स्थान म्हणून ओळखले जाणारे कर्णपुरा सध्या प्रचंड गजबजले आहे. नवरात्र काळात येथील करणीदेवीचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून दरवर्षी सुमारे 10 लाखांवर भाविक गर्दी करतात. 

सतराव्या शतकात मोगलांच्या सैन्यासह आलेले बिकानेर महाराजा कर्णसिंह यांनी शहराबाहेर खामनदीला लागून छावणी टाकली. हा भाग पुढे त्यांच्याच नावे "कर्णपुरा' म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी या ठिकाणी कुलदेवता भवानीदेवीची स्थापना करून मंदिर उभारले. देवीची पूजाअर्चा करणारी दानवे कुटुंबाची सध्याची सातवी पिढी आहे, अशी माहिती विश्‍वस्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांनी दिली. या ठिकाणचे बालाजी मंदिरही तितकेच पुरातन आहे. कर्णसिंहांची मुले पद्मसिंग आणि केसरसिंग यांच्या नावानेही जवळच पुरे वसले आहेत. यातील केसरसिंहांनी स्थापन केलेले रेणुकामाता मंदिरही शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणीही भक्त नवरात्रात मोठी गर्दी करतात. 

शहरातील पहिली यात्रा 
कर्णपुरा यात्रा ही शहरातील पहिली, एकमेव आणि सर्वात मोठी यात्रा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही यात्रा भरते. पूर्वी तुरळक गर्दी असे. आता मात्र नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. आबालवृद्धांची करमणूक करण्यासाठी राज्यासह परराज्यांतूनही अनेक व्यापारी, कारागीर आणि व्यावसायिक विविध खेळांचे, खाद्यपदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉल लावण्यासाठी दरवर्षी येतात. पावसामुळे यंदा या व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उंचच उंच पाच आकाशपाळण्यांनी लहानग्यांचे लक्ष वेधून न घेतले तरच नवल! याशिवाय ड्रॅगनबोट, टोरा-टोरा गेम, ब्रेकडान्स, आईना हाऊस, झुकझुक गाडी अशा खेळण्यांनी कर्णपुरा यात्रा सजली आहे. "पन्नालाल' गाढवाचा खेळ आणि चित्तथरारक मौत का कुँआ पाहिल्याशिवाय कुणी सहसा यात्रेतून बाहेर पडत नाही. याशिवाय जीवनावश्‍यक वस्तू, ज्वेलरी, क्रॉकरी, शोभेच्या वस्तूंचीही दुकाने, हॉटेल्स येथे लागली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com