महिनाभरानंतर धडधडू लागली औद्योगिक वसाहतीत यंत्रे

bajaj Aurangabad
bajaj Aurangabad

औरंगाबाद : सरकारने काही अटी शिथिल केल्यानंतर उद्योजकांनी स्वतःच्या जबाबदारीवर उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. महिनाभरापासून बंद असलेल्या वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या यंत्रांची धडधड शुक्रवारपासून (ता. २४) अखेर सुरू झाली. ‘बजाज’, एंड्युरन्स, ‘व्हेरॉक’, ‘बडवे इंजिनिअरिंग’ या मोठ्या कंपन्यांसह त्यांच्‍यावर अवलंबून असलेल्या पन्नासहून अधिक छोट्या-मोठ्या उद्योजकांनीही परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे कामगारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. 


या कंपन्यांनी सर्व नियम पाळत उत्पादनांची निर्मिती सुरू केली असून, ‘बजाज’ दोन शिफ्टमध्ये, तर ‘व्हेरॉक’सह इतर कंपन्यांचे काम एका शिफ्टमध्ये सुरू झाले आहे. 
केंद्र सरकारतर्फे २० एप्रिलपासून ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, तेथे उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार वाळूज, शेंद्रा येथील कंपन्यांनाही परवानगी मिळत आहेत. शुक्रवारपासून ‘बजाज’सह अन्य काही कंपन्यांना परवानगी देण्यात आली. त्यानुसार ‘बजाज’ची लाईन सुरू झाली. यामुळे महिनाभरापासून ऑर्डरच्या शोधात असलेल्या व्हेंडरलाही काम मिळणार आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, औरंगाबाद शहर ‘रेड झोन’मध्ये असल्याने महापालिकेची हद्द वगळता वाळूज-बजाजनगर, पंढरपूर व परिसरात राहणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. 

‘बजाज’चे ८०० कामगार हजर 
पहिल्याच दिवशी बजाज ऑटो कंपनीमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालले. पहिल्या शिफ्टमध्ये ४०० आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये ४०० कर्मचारी कामावर हजर झाले होते. या दोन्ही शिफ्ट सुरू होण्याअगोदर सर्व कंपनी सॅनिटराईज्ड करण्यात आली. यासह या कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या ३८ वाहनांना सॅनिटायझर करण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती व वाहनाची माहिती एमआयडीसी; तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क दिले आहेत. त्यांना सोशल डिस्टन्स कसे ठेवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कंपनीच्या कँटीनमध्ये सोशल डिस्टन्ससाठी मार्किंग करण्यात आले आहे. दोन्ही शिफ्टमध्ये एक तासाचा गॅप ठेवण्यात आला. बसशिवाय इतर वाहनांना प्रवेश देण्यात येत नाही. दुसरीकडे बजाज कंपनीवर अवलंबून असलेल्या १२० उद्योजकांनीही (व्हेंडर) त्यांच्या पातळीवर परवानगी काढली आहे. दुसऱ्‍या किंवा तिसऱ्या शिफ्टपासून कंपनीची लाईन सुरू होईल. एमआयडीसी, जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य केले असल्याचे बजाज कंपनीच्या प्रशासनातर्फे ‘सकाळ’ला सांगण्यात आले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

‘व्हेरॉक’चे चारही प्लँट सुरू 
व्हेरॉक कंपनीचे वाळूज एमआयडीसीमधील चारही प्लँट सुरू झाले आहेत. चारही प्लँटमध्ये एका शिफ्टमध्ये ही कंपनी सुरू झाली आहे. चारही प्लँटमध्ये १७८ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्‍यांसाठी दहा बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाळूज, रांजणगाव, पंढरपूर, बजाजनगर व परिसरातील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी सर्व परिसर सॅनिटराईज्ड केला. याच प्रकारे ‘एंड्युरन्स’, ‘बडवे इंजिनिअरिंग’ आणि १५० हून अधिक व्हेंडरची कामेही सुरू झाल्याचे त्या-त्या कंपन्यांच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com