कुणी जेवण देईल का या आशेने कामगार रस्त्यावर

प्रकाश बनकर
Sunday, 26 April 2020

या कामगारांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. दोन वेळचे कोणीतरी जेवण आणून देईल या आशेने हे कामगार आता रांजणगाव रोडवर येऊन अन्नदात्यांची वाट पाहत आहेत. 

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे वाळूज परिसरातील सर्व कंपन्या महिनाभरापासून बंद होत्या. त्यातील काही कंपन्या सुरू झाल्या. या टाळेबंदीमुळे कामगारांचे मोठे हाल होत आहेत. कुणी तरी आपल्याला खिचडी, जेवण आणून देईल, या आशेने अनेक कामगार मुख्य रस्त्यावर येऊन बसत आहेत. काम नाही किमान जेवणाची तरी सोय करावी, अशी अपेक्षा त्यांना आहे. 

वाळूज परिसरातील काही कंपन्या सुरू झाल्या. मात्र, अद्यापही छोटे उद्योग ठप्प आहेत. यात काम करणारे परजिल्ह्यातील अनेक कामगार आपापल्या गावी परतले. लॉकडाउनमुळे काही कामगार अडकून पडले आहेत. या कामगारांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. दोन वेळचे कोणीतरी जेवण आणून देईल या आशेने हे कामगार आता रांजणगाव रोडवर येऊन अन्नदात्यांची वाट पाहत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हिंगोली येथील मूळ रहिवासी व एंड्युरन्स कंपनीत काम करणारे गजानन नरोटे म्हणाले, ‘‘महिनाभरापासून काम नाही. अन्न आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपन्या सुरू झाल्या तरी त्यांच्यावर बंधने असल्याने आम्हाला तत्काळ काम मिळेल असे नाही. यामुळे या ठिकाणी आल्यावर जे काही अन्न मिळेल त्यावर एक-एक दिवस काढत आहे. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते.’’ 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सुरेश दाढे म्हणाले, ‘‘घरी जायचे होते; मात्र वाहन नाही. जिल्हाबंदी असल्यामुळे जाता आले नाही. थोडेफार पैसे होते. त्यातून आतापर्यंत घर चालवले. आता मात्र पैसे संपले, कामही नाही. यामुळे दिवसभर येथे थांबून मिळेल त्यावरच घर चालवत आहे.’’ 
बुलडाणा जिल्ह्यातील माया घाडगे यांचे पती सीमेन्स कंपनी कार्यरत आहेत. घरी असलेले अन्नधान्य संपल्यामुळे त्या कुठे रेशन मिळेल का? याचा शोध घेत होत्या. परिसरात रेशन वाटप करण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या रेशन घेण्यासाठी या भागात आल्या. मात्र, त्यांना कुठेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे त्याही या रस्त्यावर येऊन अन्नदात्याकडून मिळणाऱ्या खिचडीवर दिवस काढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

"सकाळ'ची भुमिका : अन्नदात्यांनी पुढे यावे 
दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार रस्त्यावर येत आहेत. सामाजिक संस्था, राजकीय पक्षांतर्फे होणाऱ्या खिचडी वाटपामुळे त्यांना काही प्रमाणात आधार मिळत आहे. ही मदत अत्यल्प असल्याने अनेकजण अजूनही उपाशी राहत आहेत. या कामगारांच्या दोन वेळेचे अन्न मिळेल यासाठी सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी पुढे येण्याची गरज आहे; तसेच जिल्हा प्रशासन, विविध कंपन्यांनी पुढाकार घेत कामगारांना अन्नदान करीत त्यांची भूक भागवावी अशी मागणी या कामगारांतर्फे करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to lockdown Hungry Workers on road Aurangabad News