औरंगाबाद महापालिकेच्या या अॅपचे आदित्य ठाकरेंकडून कौतुक 

माधव इतबारे
Friday, 10 July 2020

एमएचएमएच’ (माझी हेल्थ माझ्या हाती) अ‍ॅप कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांबरोबरच राज्यातील अन्य शहरांमध्ये कार्यान्वित कण्याबाबत विचार करू असे, आदित्य ठाकरे याांनी सांगितले.

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची शहरात झपाट्याने वाढ होत असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना सूचना केल्या. महापालिकेने तयार केलेले ‘एमएचएमएच’ (माझी हेल्थ माझ्या हाती) अ‍ॅप कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांबरोबरच राज्यातील अन्य शहरांमध्ये कार्यान्वित कण्याबाबत विचार करू असे त्यांनी सांगितले. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध शहरांमधील कोरोना स्थिती, उपाययोजना, अंमलबजावणीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ‘एमएचएमएच’ (माझे आरोग्य माझ्या हाती) अ‍ॅपबद्दल माहिती दिली. कोरोनाची बाधा पन्नास किंवा त्यावरील वयाच्या व्यक्तींना लवकर होते. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेने अ‍ॅपची निर्मिती केली. महापालिका क्षेत्रातील पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे आरोग्य सर्वेक्षण करून त्याबद्दलची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून कशी नोंदवली जाते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आजारी नागरिकांना महापालिकेच्या फिवर क्लिनिक सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले जाते. अ‍ॅपमध्ये माहिती अपलोड केल्यानंतर मिळणारी माहिती, कोविड केअर सेंटरमध्ये किती जागा शिल्लक आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याशिवाय मोबाईल स्वॅब कलेक्शन टिम, लॉकडाऊन दरम्यान करण्यात येणारी ‘एंटिजन टेस्ट’, लॉकडाऊनच्या काळात शहरात येणाऱ्यांची तपासणी याबद्दल माहिती दिली. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. ‘एमएचएमएच’अ‍ॅपचा प्रयोग राज्यभर करण्यासंदर्भात चर्चा केली. 

सीसीटिव्हीद्वारे सुविधांवर लक्ष ठेवा 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आॅक्सिजन सुविधा, कोविड केअर सेंटर आणि क्वारंन्टाईन सेंटरमध्ये विशेष लक्ष द्यावे. सुविधांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे. कोरोनामुक्त रुग्णांचा माहिती अद्ययावत करावी, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावे, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याकडे विशेष लक्ष द्या 
रुग्णांची संख्या वाढत असतानाच गंभीर रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. यासाठी महापालिकेने सीसीसी बेड, आयक्यू बेड, आॅक्सीजन कॉन्सटेटर्सची संख्या वाढवावी. रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवावी. अॅटीजन टेस्ट आणि अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट वापर करावा. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचा शोध घ्यावा. जे नागरिक स्वतःहून कोरोना टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये येतील त्यांनाही प्राधान्य देऊन टेस्ट करावी. पीपीई किटचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी यासंदर्भात डॉक्टर, नर्सेस यांना प्रशिक्षण द्यावे. अनेकदा रुग्णांपर्यंत पोचणे तज्ज्ञ डॉक्टरांना शक्य होत नाही, अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीटिव्हीद्वारे नियंत्रण ठेवून टेली मेडिसीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray appreciates Aurangabad Municipal Corporation app