मराठवाड्यात लॉकडाऊननंतर ५४ हजार नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या

अनिक जमधडे
Monday, 12 October 2020

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर महावितरणकडून एप्रिल महिन्यापासून प्रादेशिक विभागात नवीन वीज जोडण्या देण्यासाठी गती देण्यात आली आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर महावितरणकडून एप्रिल महिन्यापासून प्रादेशिक विभागात नवीन वीज जोडण्या देण्यासाठी गती देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडलात सर्व वर्गवारीतील ५४,२१४ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या मार्च पासून लॉकडाउन सुरू आहे. एप्रिल, मे महिन्यात कडकडीत टाळेबंदी असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा सुरळित ठेवण्याचे काम वगळता इतर कामकाज ठप्प झाले होते. मात्र जून पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली व सर्व प्रशासकीय कामांना वेग देण्यात आला आहे. यामध्ये नवीन वीज जोडण्या देण्याच्या कामास प्राधान्य देत आवश्यक प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी दिले होते.

नागपूर-पुणे मार्गावर तब्बल नऊ शिवशाही सुरु, कोरोनानंतर एसटी महामंडळाने कसली कंबर

तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी औरंगाबाद प्रादेशिक विभागाची व्हीडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आढावा बैठक घेवून नवीन वीज जोडण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. ज्या ठिकाणी पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही.

त्याठिकाणी तात्काळ नवीन वीज जोडणी कार्यान्वित करण्यात यावी तसेच प्राप्त झालेल्या वीज जोडणीच्या अर्जावर पुढील कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये औरंगाबाद परिमंडलात १८,३३३ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. लातूर परिमंडलात १८,४६३ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर नांदेड परिमंडलात १७,४१८ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद प्रादेशिक विभागात एप्रिल २०२० ते आँक्टोंबर २०२० पर्यंत ५४,२१४ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

येथे साधा संपर्क
महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपद्वारे नवीन वीज जोडणीसाठी आँनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच नवीन वीज जोडणीबाबत तक्रार किंवा काही अडचण असल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Lockdown 54 Thousand New Electricity Connection In Marathwada