esakal | कोरोनामुळे शाळेच्या बोलक्या भिंती झाल्या अबोल!
sakal

बोलून बातमी शोधा

Pachod Shaala

विविध विषयांच्या माहितीने सजविलेल्या शाळेच्या भिंती आकडेमोड करताना बोलक्या वाटत होत्या.

कोरोनामुळे शाळेच्या बोलक्या भिंती झाल्या अबोल!

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : विविध विषयांच्या माहितीने सजविलेल्या शाळेच्या भिंती आकडेमोड करताना बोलक्या वाटत होत्या. मात्र कोरोना विषाणूच्या प्रार्दूभावामुळे 'त्या' शाळा, अंगणवाड्या बंद असल्याने त्यांच्या भिंतीच अबोल बनल्याचे चित्र पाचोडसह (ता. पैठण) परिसरात पाहावयास मिळत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील एखाद्या इतिहासाचे वर्णन करणारे चित्र, नकाशाच्या माध्यमातून होणारी जगाची ओळख, आकड्यांच्या मदतीने गणिताची उजळणी घेणारे फलक, यामुळे शाळेच्या भिंती जणू विद्यार्थ्यांशी संवाद साधायच्या. मात्र कोरोनामुळे विद्यार्थी घरात असल्याने शाळेचा परिसरात शुकशुकाट दिसत असून चार महिन्यांपासून शाळा व अंगणवाडीच्या बोलक्या भिंती अबोल झाल्या आहेत.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली


कोरोनामुळे २२ मार्चपासून टाळेबंदीमुळे सर्वत्र शाळा बंद असल्याने विद्यार्थ्याची किलबिल बंद झाली. मुलांच्या एक सुरातील आवाजामुळे दुमदुमून जाणारा शाळेचा परिसर शांत झाला आहे. दरवर्षी जून महिना सुरू होताच मुलांना शाळेची चाहूल लागायची. मुले, शिक्षक अन् शाळांचे नाते अधिक घट्ट होत असत. शाळा व शिक्षकांच्या संस्कारातून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडत. यामध्ये विविध विषयांच्या माहितीने शाळेच्या सजविलेल्या भिंतीचे योगदानही तितकेच महत्त्वाचे ठरत असत.

शाळेच्या भिंतीवर इतिहासातील घडामोडींचे चित्ररूपी वर्णन, नकाशातून सूचित केलेले राज्य, देश, लोकजीवन व इतर माहिती, गणिताची आकडेमोड करताना उपयोगी पडणारे पाढे, इतर गणितीय माहिती सोबतच बऱ्या-वाईट गोष्टी न करण्याचा सल्ला देणाऱ्या बाबी विद्यार्थ्याना आयुष्यभरासाठी ज्ञानाची शिदोरी ठरत. एवढेच नव्हे तर स्वच्छतेच्या संदेशासोबतच इंग्रजी-मराठी बाराखडी, व्यंजने, अंक ओळखीमुळे शाळेच्या भिंती प्रत्येक विद्यार्थ्याला बोलक्या वाटायच्या.

शिक्षक वर्गावर नाही तोपर्यंत विद्यार्थी रेखाटलेल्या चित्र व अक्षरांची ओळख करून घेण्यात बुद्धीला चालना देत. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद झाल्या. अन् शाळेत असताना भितीशी विद्यार्थ्यांची असलेली घट्ट मैत्री अबोल झाली. शाळेचा परिसर, शाळेतले वातावरण, अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी रेखाटलेली चित्रे व अन्य साधने विद्यार्थ्याच्या नजरेआड होऊन भिंती व मैत्री अबोलच ठरले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून होणार सुरु


भिंतीवर सचित्र रेखाटलेली अक्षर, अंक व अधिक तपशील दीर्घकाळ मुलांच्या लक्षात राहतो , अद्यापनात चित्रांचा व फलकांचा वापर केल्यास विषयाचा बोध होतो, त्यामुळे शाळेच्या भिंतीवर चित्र व अक्षरं अधिक बोलके वाटतात, प्रत्येक शाळेच्या भिंतीवर चित्रे रंगवून त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जात होते, मात्र आता ह्या भिंती कोरोनाच्या संकटात अडकल्याने अबोल झाल्या आहेत.
विलास गोलांडे, मुख्याधापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थेरगाव

कोरोनाच्या परिस्थितीमुळे बहुतांश शाळांनी घरबसल्या ऑनलाईन वर्ग सुरू केले आहे. परंतु शाळेत देण्यात येणारे ज्ञानार्जन व आता मोबाईलच्या माध्यमातून देण्यात येणारे ऑनलाइन वर्गातील शिक्षण, त्यांच्या तुलनात्मक आकलनातून शाळा परिसरात शिक्षणासाठी निर्माण होणारे वातावरण, तेथील परिसर व इतर घटक विद्यार्थ्यांसाठी अधिक पूरक ठरतात. परंतु आता शाळा सर्वांना नकोशा होऊन ऑनलाइनचा पगडा त्यांच्या माथी पडला आहे. लवकर कोरोनाचे संकट दुर होऊन शाळेतील पूर्वीची किलबिल सुरु व्हावी.
- सुनिता साखरे , अंगणवाडी सेविका


संपादन - गणेश पिटेकर