डॉ. कराडांना भरवला पेढा, अंबादास दानवेंनी चोळले का चंद्रकांत खैरेंच्या जखमेवर मीठ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 March 2020

पक्षीय मतभेद असले तरी ते बाजूला सारत दानवे यांनी दिलदारपणे कराड यांचे अभिनंदन केले, असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत. पण आपला नेता दुखावला गेला असताना, दानवेंदी प्रतिस्पर्ध्याचे अभिनंदन करत पेढे भरवल्यामुळे, खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच त्यांनी ही खेळी केली की काय, असेही बोलले जात आहे.

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पत्ता कट करत शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेचं तिकीट दिलं. त्याचवेळी भारतीय जनता पक्षानं मात्र औरंगाबादेतले निष्ठावान पदाधिकारी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेले चंद्रकांत खैरे आदित्य ठाकरे यांच्या राजकारणावर टीका करत नॉट रीचेबल झाले. 

त्यातच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी लगोलग डॉ. भागवत कराड यांच्याकडे जाऊन त्यांचे अभिनंदन केले. एवढेच नव्हे, तर त्यांना पेढा भरवत त्याचे छायाचित्रही आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवर अपलोड केले. यामुळे आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या जखमेवर दानवे यांनी मीठ तर चोळले नाही ना, याची एकच चर्चा शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये सुरू असल्याचे दिवसभर पाहायला मिळाले.  

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

डॉ. भागवत कराड यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड जवळपास निश्चित समजली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कराडांचे पेढा भरवून अभिनंदन केले. आधीचे मित्रपक्ष असले, तरी आता परस्परांचे कट्टर स्पर्धक झालेल्या शिवसेना आणि भाजपच्या या दोन नेत्यांची ही जवळीक काय सांगते, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

दानवे आणि कराड हे खरेतर एकमेकांचे शेजारीही आहेत. त्यामुळे पक्षीय मतभेद असले तरी ते बाजूला सारत दानवे यांनी दिलदारपणे कराड यांचे अभिनंदन केले, असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत. पण आपला नेता दुखावला गेला असताना, दानवेंदी प्रतिस्पर्ध्याचे अभिनंदन करत पेढे भरवल्यामुळे, खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच त्यांनी ही खेळी केली की काय, असेही बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambadas Danve Congratulated Dr Bhagwat Karad Chandrakant Khaire Aurangabad News