आंबेडकरी चळवळीतील ‘विजय’ भुकेल्यासाठी धावला!

राजेभाऊ मोगल
सोमवार, 1 जून 2020

कामगारांची झालेली भयावह परिस्थिती पाहुहून ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपल्या मनाची झालेली घालमेल घरात कथन केली. बहिणीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा आपण खर्च करुयात का? असे मत त्यांनी आई-वडिलांसमोर व्यक्त केले. त्यावर घरच्यांनीही हा पैसा तुमचाच आहे, गरिबांवर खर्च करायचा म्हणतोयस ही आमच्यासाठी अभिमानाचीच बाब आहे, असं बळ दिलं

औरंगाबाद : बहिणीच्या लग्नासाठी जमा करून ठेवलेली पुंजी लॉकडाउनमध्ये उपाशीपोटी राहणाऱ्या झोपडपट्टीसह अन्य वस्त्यांमधील गरिबांसाठी किराणा साहित्याच्या माध्यमातून खर्च करण्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता विजय वाहूळ यांनी केले आहे. बहुतांश राजकीय नेते, लोकप्रतीनिधी जीवाच्या भीतीने घरात आहेत. श्री वाहूळ यांच्या घरातही लहान मुल असतानाही ते मात्र, जीवघेण्या महामारीत भुकेल्यांना अन्न उपलब्ध करून देण्याची चळवळ राबवत आहेत.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. यामुळे हातावर पोट असणारी कामगार मंडळी उघड्यावर आली. गरीबांवर उपाशी राहण्याची वेळ आलेली असताना दारोदारी मते मागणारे, निवडून दिलेले कुठे गेली,? असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे. नेत्याना जिवाची भीती तर आहेच. पण, या काळात त्यांच्याकडे गरिबांना जगवायची दानतही दिसून येत नाही. असे असताना आंबेडकरी चळवळीतील विजय वाहूळ हा कार्यकर्ता केवळ शहरातच नव्हे तर शहराच्या आजूबाजूला हातावर पोट असणाऱ्या गरिबांना घरपोच किराणा साहित्य पोचवत आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

विशेष म्हणजे हे करत असताना त्यावर ना स्टिकर, ना मोबाईल नंबर टाकला. ना त्या लोकांचे मोबाईल नंबर लिहून घेतले. आपण ज्यांना मदत करतोय ते भिकारी नक्कीच नाहीत, तर ते मजबूर आहेत. असे ते सांगतात. कामगारांची झालेली भयावह परिस्थिती पाहुहून ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपल्या मनाची झालेली घालमेल घरात कथन केली. बहिणीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा आपण खर्च करुयात का? असे मत त्यांनी आई-वडिलांसमोर व्यक्त केले. त्यावर घरच्यांनीही हा पैसा तुमचाच आहे, गरिबांवर खर्च करायचा म्हणतोयस ही आमच्यासाठी अभिमानाचीच बाब आहे, असं बळ दिलं आणि गरिबांपर्यंत किराणा साहित्य पोहोचण्याची ही चळवळ सुरू झाली.

 


विजय वाहूळ यांचे बापुनगर येथील हे घर. पत्राच्या घरावरुनच त्यांची स्थिती बिकट असल्याचे स्पष्ट दिसते.

हेही वाचा : बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग  

आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता कसा असावा याच जिवंत उदाहरण विजय होय. स्वतःची आर्थिक बाजू अतिशय कमकूवत असतानादेखील स्वतःच्या बहिणीच्या लग्नाकरिता जमा केलेली रक्कम खर्च करून सामाजिक संवेदनेची जाणीव असल्याने मागील ६५ दिवसांपासून शहरातील अनेक झोपडपट्टयांमध्ये तीन टप्यात गरजूंना जवळपास १ हजार अन्नधान्य वितरित करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. यासाठी त्यांना काही मित्रांनीदेखील मदत केली आहे. एक शेवटचा चौथा टप्पा करणार आहे. एका किटमध्ये पाच किलो गहू, अथवा पीठ, २ किलो तांदूळ, एक किलो साखर, अर्धा अर्धा किलो दोन प्रकारच्या डाळी, अर्धा लीटर तेल पॉकेट आदी सामान आहे. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

शहरातील अनेक भाग जेव्हा हॉटस्पॉट म्हणून घोषित झाले. तेव्हा तेथे कुणी जायला धजत नव्हते. मात्र, विजय हा मागेपुढे न बघता तेथील गरजू नागरिकांना मदत पोहचविण्याकरिता त्याठिकाणी आवर्जून जात होता. २५ मार्चपासून सुरू झालेले हे काम लॉकडाऊन संपेपर्यंत चालु ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याकरिता काही सामाजिक आत्मभान जागृत असलेल्या मित्र आणि सहकाऱ्यांचा देखील हातभार त्यांना लागला आहे.

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक

निसर्गाने सर्वाना या कठीण काळात भुकेने तडफडणाऱ्या मजबूर लोकांकरिता काही चांगल करण्याची संधी दिली होती. परंतु, बहुतांश लोकांनी ती गमावली आहे. मात्र, बापूनगर सारख्या स्लमभागात पत्राच्या घरात राहणारा एक कार्यकर्ता घरची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही भुकेल्यांसाठी स्वतला झोकुन देऊन काम करीत आहे. विजय हा आंबेडकरी चळवळीला अभिप्रेत असलेला चेहरा म्हणुन पुढे येतोय, असे म्हणायला हरकत नाही. 

हेही वाचा : असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

बहिणीच्या लग्नाकरिता राखून ठेवलेला पैसा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत हवालदिल झालेल्या सामान्य लोकांकरीता खर्च केला गेला. याचे खुप समाधान आहे. लग्न ठरल्यावर माझे हक्काचे हितचिंतक अनेक आहेत. त्यामुळे चिंता नाही. फक्त देश या महाभयंकर स्थितीतुन बाहेर पडावा ऐवढीच कामना. 
- विजय वाहूळ. आंबेडकरी कार्यकर्ता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambedkarite Vijay Wahul Come Forward For Hungry Peoples