esakal | औरंगाबाद-अजिंठा रस्ता सहा महिन्यांत पूर्ण होईल, नितीन गडकरींनी दिला औरंगाबादकरांना शद्ब
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या ठेकेदाराबाबत भानगडी झाल्या. जमिन अधिग्रहण वेळेवर नाही झाले.

औरंगाबाद-अजिंठा रस्ता सहा महिन्यांत पूर्ण होईल, नितीन गडकरींनी दिला औरंगाबादकरांना शद्ब

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या ठेकेदाराबाबत भानगडी झाल्या. जमिन अधिग्रहण वेळेवर नाही झाले. हरीभाऊ बागडे यांच्या मागणीनुसार दोन लेनच्या चार लेन केल्या, वाढीव किंमतीला मान्यता मिळाली नाही. तो ठेकेदार पळाला. दुसरे ठेकेदार आले आणि आता तो रस्ता व्यवस्थित सुरू आहे. येत्या सहा महिन्यात त्याचे काम पुर्ण होईल, असा शद्ब औरंगाबादकरांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. एमजीएम विद्यापीठात तंत्रज्ञान उत्तमता केंद्राचे व्हर्च्युअली उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता. २०) झाले. येथील महात्मा गांधी मिशनचा ३८व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, श्रीधर धर्मराजन यांची उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी या कार्यक्रमात परिचय करुन देतानाच श्री गडकरींना रस्त्याच्या घोषणेची आठवण दिली होती.


श्री.गडकरी म्हणाले, स्वातंत्र्याचे रुपांतर सुराज्यात करायचे असल्याने महात्मा गांधी यांनी दिलेले स्वदेशी आणि स्वावलंबनाचे मंत्र अंगिकारले जावेत. स्वातंत्र्यानंतर ३० टक्के लोकांचे शहराकडे झालेले स्थलांतर हे रोजगाराने झाले आहे, ते परत वळवायचे असून तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय साधून कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.  गरिबाचे कल्याण हे प्रत्येकाच्या मनातील मिशन आहे. नवोन्मेष, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य या ज्ञानाचे रुपांतर हेच देशाचे भविष्य आहे. दुसरे म्हणजे पैसा आणि संसाधने हे वाया घालवायचे नाही. हे फार महत्वाचे आहे. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात आर्थिक संपत्ती निर्माण करुन गरिबी, भुकमारी आणि बेरोजगारीचा प्रश्‍न संपवू शकतो. तसेच आयात कमी करुन निर्यात वाढवणे हीच खरी देशभक्ती आहे. विदेशात काम करुन देशात डॉलर पाठवणारेही देशभक्तच आहेत, असे श्री.गडकरी यांनी सांगितले.


श्री.गडकरी म्हणाले, देशाला येत्या पाच वर्षात मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचे आहे. त्यासोबतच देशाला इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी बनवायचे आहे. साखर, तांदुळ, मका याच्या होणाऱ्या अतिरिक्त उत्पादनातून हे शक्य आहे. त्यासाठी देशातील सर्वच साखर कारखानदारांनाही याबाबत सांगणार आहे.’’ यावेळी एमजीएमला एमएसएमई कडून तंत्रज्ञान केंद्र देण्याचे कबुल केले. यावेळी मराठवाड्याच्या अमोल बिराजदार आणि कुणाल जोशी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.कमलकिशोर कदम म्हणाले, निःस्वार्थपणे काम करणारी माणसे एमजीएम संस्थेला मिळाल्यानेच उत्कर्ष झाला. वर्षभरापासून सगळ्याच संस्था अडचणीत आहेत. त्याच्याशी मुकाबला करुन त्याचे संधीत रुपांतर करायला हवे. त्याद्वारेच पुढे गेले पाहिजे. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्योजक उमेश दाशरथी, राजेंद्र अभंगे, भाऊसाहेब राजळे, डॉ. गीता लाटकर आदींची उपस्थिती होती. डॉ. विजया मुसांडे यांनी आभार मानले.

संपादन - गणेश पिटेकर