esakal | आता ठरलं! औरंगाबाद शहर बस पाच नोव्हेंबरपासून रस्त्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

city bus.jpg

पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा : महापालिकेच्या कामांचा घेतला आढावा 

आता ठरलं! औरंगाबाद शहर बस पाच नोव्हेंबरपासून रस्त्यावर 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : लॉकडाउनमधून हळूहळू सूट दिली जात आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असून, औरंगाबाद स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने देखील शहर बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. ३०) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहर बससेवा पाच नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल, असे घोषित केले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्मार्ट सिटीसह महापालिकेच्या विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, शहर स्मार्ट बनवण्यासाठी नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहरातील कोरोना रुग्णाची संख्या कमी होत आहे. त्यामुळे पाच नोव्हेंबरपासून शहर बस सुरू होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे कोरोना काळात सुरू केलेल्या उपचार व सुविधा सुरूच ठेवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटल महापालिकेकडेच राहील. तेथे आणखी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर करा. मुख्य रस्त्यासह इतर सर्व रस्ते दुरुस्ती, जालना रस्त्याला समांतर रस्ता करणे अशी कामे कालमर्यादेत पूर्ण करा, अशी सूचना त्यांनी महापालिकेला केली. गुंठेवारी वसाहतीतील नागरिकांना मालकी हक्क देणे व सिडकोच्या मालमत्ता फ्री होल्ड करणे, पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्यांना घरे मिळणे, नवीन पाणीपुरवठा योजना, सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात कामे करणे याबाबतचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. सफारी पार्क जागतिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तयार झाले पाहिजे, अशी सूचना श्री. देसाई यांनी केली. सिडको उद्यानातील बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणी व रस्त्यांच्या कामांची नोव्हेंबरमध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचे पांडेय यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रशासक आयुक्त आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, बी. बी. नेमाने, उपायुक्त सुमंत मोरे, अपर्णा थेटे, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांची उपस्थिती होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळीपर्यंत स्वच्छता मोहीम 
एक नोव्हेंबर ते दिवाळीपर्यंत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहाचे काम येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. यंदा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या १० शहरात स्थान मिळवून देण्याचा मानस आहे. संत तुकाराम नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असल्याचे श्री. पांडेय यांनी बैठकीत सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)