आतापर्यंत औरंगाबादेत चार लाख कोरोना चाचण्या! संसर्ग कमी झाल्याने दिलासा

माधव इतबारे
Tuesday, 9 February 2021

शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर संसर्गाचा आलेख झपाट्याने वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

औरंगाबाद : कोरोना संसर्गाला दहा महिने उलटले असून, आता लसही उपलब्ध झाली आहे. असे असले तरी शहरात कोरोना संसर्गाचे २९५ रुग्ण सध्या ॲक्टिव्ह आहेत. महापालिकेने आतापर्यंत तीन लाख ९७ हजार ६२२ चाचण्या करण्यात आल्या असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ हजार २४८ एवढी झाली आहे. शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर संसर्गाचा आलेख झपाट्याने वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान दिवाळीपूर्वी म्हणजेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यापासून हळूहळू कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला. शासनाने मिशन बिगेन अगेनअंतर्गत बाजारपेठांसह व्यवहार सुरळीत करण्यास मुभा दिली.

बाजारपेठेत मोठी गर्दी उसळल्यानंतरही रुग्णसंख्या १५० ते २०० च्या आतच राहिली. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांचे प्रमाण आणखी कमी झाले. जानेवारीत तर २० ते २५ रूग्ण दररोज आढळून येत होते. सध्या रोज ३० ते ४० रूग्ण आढळून येत आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत शहरात कोरोनाच्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टीजेन पद्धतीच्या तीन लाख ९७ हजार ६२२ चाचण्या केल्या आहेत. त्यातून ३१ हजार २४८ नागरिक पॉझिटिव्ह निघाले. अ‍ॅन्टिजेन चाचण्यांतून शहराबाहेरील २२७० आणि आरटीपीसीआर चाचण्यांतून १५२ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. सध्या कोरोनाचे २९५ रूग्ण ऑक्टिव्ह असून, त्यात शहरातील १४२, ग्रामीण भागातील १४९ व जिल्ह्याबाहेरील चार जणांचा समावेश असल्याचे महापालिकेच्या अहवाल नमूद आहे.

थंडी वाढताच रुग्णसंख्येत वाढ
थंडीचा जोर कमी असताना शहरातील रुग्णसंख्या ३०च्या आत होती. पण गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. चार दिवसांपासून ३० ते ४० या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर हे खबरदारीचे नियम पाळावेत असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Four Lakhs Corona Test Conducted