उपचाराच्या नावाखाली मायलेकीचा विनयभंग, पोलिसांनी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या

aurangabad crime news
aurangabad crime news

औरंगाबाद : उपचार करण्याच्या बहाण्याने आईसह मुलीचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाच्या रविवारी (ता.सात) रात्री हर्सूल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. साईनाथ कारभारी गुंजाळ (५५, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) असे भोंदू बाबाचे नाव असून त्याला मंगळवारपर्यंत (ता.नऊ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी (ता.आठ) दिले. प्रकरणात ३० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानूसार, डिसेंबर २०२० मध्ये फिर्यादीच्या सासऱ्‍याच्या ह्रदयाचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे फिर्यादीची १७ वर्षीय मुलगी फिर्यादीच्या सासऱ्याकडे गेली होती. सात दिवसांनी परतल्यावर फिर्यादीच्या मुलीला उलट्या व पोटाचा त्रास सुरु झाला होता.

त्यांनी अनेक दवाखाने करुनही त्रास थांबत नव्हता. तेंव्हा अनेकांनी त्यांना घृष्णेश्वर कॉलनीतील साईनाथ महाराजांकडे जाण्याचा सल्‍ला दिला. त्यानूसार फेब्रुवारी २०२१ रोजी फिर्यादीही कुटूंबासह साईनाथ महाराजाकडे गेली. त्यानंतर मुलीच्या उलट्या थांबल्या. त्यामुळे फिर्यादीच्या कुटूंबाचा त्याच्यावरील विश्वास वाढला व ते सकाळ संध्याकाळ महाराजाकडे जावू लागले. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादी मुलीला घेवून महाराजाकडे गेली. तेंव्हा त्या भोंदू महाराजाने दोघींना वेगवेगळे बसवून डोळे बंद करण्यास सांगितले.

आरोपीने मुलीवर इलाज केल्यानंतर फिर्यादीला पायाचा इलाज करण्याच्या नावाखाली अश्‍लील चाळे करुन विनयभंग केला. मात्र मुलीला महाराजाचा गुण पडल्याने फिर्यादीने दुर्लक्ष केले. रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपीने त्यांना पुन्हा आपल्या घरी बोलावले व फिर्यादीच्या पतीला बायको सांभाळायला माझ्याकडे पाठव मी सुधरवेन असे म्हणाला. १४ मार्च रोजी सकाळी फिर्यादीही मुलीसह भोंदूबाबाकडे जाण्यासाठी निघाली असता, मुलीने नकार दिला व भोंदू बाबाने आपल्यासोबत अश्‍लील चाळे करुन विनयभंग केल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने भोंदू बाबाकडे जाण्यास टाळले. ७ मार्च रोजी भोंदू बाबाने फिर्यादीच्या पतीला दक्षिणा देण्यासाठी बोलावले. त्यानूसार फिर्यादी पतीसह आरोपीच्या घरी गेले असता, त्याने पैशाच्या कारणावरुन फिर्यादीच्या कुटूंबाला धमकावण्यास सुरवात केल्याने ते घाबरले. प्रकरणात मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्‍ता राजू पहाडिया यांनी सरकारपक्षातर्फे काम पाहिले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com