औरंगाबाद जिल्ह्यात १३८ सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची गरज, १५.८२ कोटींची मागणी

शेखलाल शेख
Monday, 12 October 2020

औरंगाबाद  जिल्हा परिषद सिंचन विभागाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत जलसंधारण कामाचा दुरुस्ती आराखडा तयार केला.

औरंगाबाद : जिल्हा परिषद सिंचन विभागाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत जलसंधारण कामाचा दुरुस्ती आराखडा तयार केला. यात १३८ प्रकल्‍पांच्या दुरुस्तीचा समावेश आहे. त्यासाठी १५ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ७७ प्रकल्पांची दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ४३ सिंचन तलाव, ६१२ पाझर तलाव, ४२ गाव तलाव, ५८५ उपबंधारे (कोल्हापुरी), ६०७ सिमेंट बंधारे बांधण्यात आले.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

या सर्व प्रकल्पांची १३६.५७ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असून, त्यातून ४४ हजार ९६६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. हे बंधारे सध्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. मात्र, पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी त्यांची दुरुस्ती आवश्यक असल्याने १३८ बंधाऱ्यांच्या दुरुस्ती गरजेची आहे. दुरुस्ती करावयाच्या १३८ पैकी प्राधान्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात ४० सिंचन, पाझर व गाव तलावांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ६७ लाख ५ हजार तर ३७ उपबंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ९३ लाख ४७ हजार असे एकूण ७७ कामांसाठी १० कोटी ६० लाख ५० हजार रुपयांची मागणी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून होणार सुरु

असे आहेत प्रकल्प
सिंचन प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील ७७ प्रकल्पांच्या दुरुस्तीत औरंगाबाद तालुक्यातील ४, पैठण ३, फुलंब्री १०, गंगापूर ५, वैजापूर १०, कन्नड ११, खुलताबाद २, सिल्लोड १४, सोयगाव १८ प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या या ७७ प्रकल्पांची साठवण क्षमता ६९७८ दशलक्ष घनमीटर आहे. २५४४ हेक्टरवर सिंचन क्षमता आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर साठवण क्षमता ४६१० दशलक्ष घनमीटर वाढणार असून, १,१७७ हेक्टरने सिंचन क्षमता वाढणार आहे. सध्या दुरुस्त्यांअभावी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे, पिकाचेही नुकसान होत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aurangabad District 138 Irrigation Projects Need Repairing