औरंगाबाद : देशांतर्गत विद्यापीठांमधील सर्वात मोठे हार्बेरियम.
औरंगाबाद : देशांतर्गत विद्यापीठांमधील सर्वात मोठे हार्बेरियम.

video : काय असते हार्बेरियम 

औरंगाबाद - देशांतर्गत जेवढी अकृषी विद्यापीठे आहेत त्या सर्व विद्यापीठांमध्ये सर्वांत मोठे हार्बेरियम ज्याला मराठीत पादपालय म्हणतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे. या ठिकाणी तब्बल 1 लाख 4 हजार वनस्पतींचे नमुने संवर्धन करून त्यांचे जतन करून ठेवण्यात आले आहे.

सुरवातीला केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील सपुष्प वनस्पतींचा समावेश असलेल्या या हार्बेरियममध्ये आता मराठवाड्यासह देशातील अन्य राज्यांचा व परदेशातील वनस्पतींचाही समावेश आहे. या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या नमुन्यांच्यानुसार आता मराठवाडयातील जवळपास तब्बल 35 वनस्पती दुर्मिळ होत जात असून, याला बदलते पर्यावरणीय बदल कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. 

काय आहे हे हार्बेरियम 

जसे पुस्तकांचे ग्रंथालय असते तसे वनस्पतींच्या अभ्यासासाठी विविध वनस्पतींचा, त्यांच्या पाना फुलांचा, फळांचे संग्रहालय करून ठेवलेले असते. पुस्तकांचे ग्रंथालय तसे पाने, फुले, फळांचे पादपालय किंवा हार्बेरियम असते. हार्ब म्हणजे रोप यापासून तयार झालेला हर्बेरियम शब्द आहे.

वनस्पतींचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधकांसाठी व अभ्यासकांसाठी वनस्पतींचा सुकलेली पाने, फळे, फुलांचे नमुने वाळवून कागदावर चिकटवून ठेवले जातात. इथे ठेवलेल्या नमुन्यांचा यापूर्वीच तज्ञांनी अभ्यास करून त्यासोबत सर्व माहिती लिहिलेली असते. कोणत्या कुटुंबातील आहे, त्याचे प्रचलित नाव, बॉटनीकल नाव, कुठे मिळते, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांची उपलब्धता किती आहे ही सर्व माहिती मिळते. तसेच फोटोमध्ये अभ्यास करण्यासाठी अनेक मर्यादा येतात मात्र हार्बेरियममधील नमुन्यांच्या अभ्यासासाठी मर्यादा येत नाहीत. 

साठ वर्षांपूर्वी सुरवात 

वनस्पतीशास्त्राचे संशोधक डॉ. वा. ना. नाईक यांनी 1962 ते 68 अशी सहा वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यातील सपुष्प वनस्पतींचा सुरवातीला अभ्यास केला. त्याचे नमुने गोळा केले.

1969 मध्ये विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात हार्बेरियम सुरू केले. त्यावेळी 3 ते 4 हजार नमुने इथे होते. ते 1993 मध्ये निवृत्त झाले तोपर्यंत त्यांनी आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. एम. ए. वदुदखान, डॉ. दिलीप पोकळे, डॉ. व्ही. एन. परदेशी, डॉ. अनील वैद्य, डॉ. एस. पी. रोठे, डॉ. प्रभा भोगावकर, डॉ. मिलिंद सरदेसाई या सर्वांनी मिळून संपूर्ण मराठवाड्यातील वनस्पतींचे नुमने गोळा केले. तब्बल 80 हजार नमुने जमा झाले होते.

त्यानंतर 1996 मध्ये डॉ. अरविंद धाबे विभागप्रमुख झाल्यानंतर त्यात 24 हजार नमुण्यांची भर टाकली असून, आतापर्यंत या हार्बेरियममध्ये 1 लाख 4 हजार वनस्पतींचे नमुने जमा झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय मानांकन 

विभागप्रमुख डॉ. धाबे म्हणाले, देशांतर्गत विद्यापीठांमध्ये सर्वांत मोठे हार्बेरियम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहे. एखाद्या वनस्पतीला अनेक नावाने ओळखले जाते त्या वनस्पतीला जगभरात एकाच नावाने ओळखले जावे यासाठी एकमताने नाव निवडण्यासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय नामकरण समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा आणि या हार्बेरियमला दोन मते देण्याचा तर मला एक अशी तीन मतांचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आहे.

या शिवाय आंतरराष्ट्रीय तीन विषय समित्यांवर सदस्यत्वाचा मान या हार्बेरियममुळे मिळाला. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळून आतापर्यंत 57 नवीन वनस्पती शोधून काढल्या आहेत.

मराठवाड्यातील 35 वनस्पती होत आहेत दुर्मिळ 

हार्बेरिममध्ये ठेवण्यात आलेल्या नमुन्यांच्या आधारे 1962 मध्ये डॉ. नाईक यांनी जमा केलेल्या त्या वनस्पतीपैकी सद्यःस्थितीत मराठवाड्यातील सुमारे 35 वनस्पती आता दुर्मिळ होत आहेत. याला पर्यावरणीय बदल कारणीभूत असल्याचे सांगून डॉ. धाबे म्हणाले, अमरकंद, धमासा, मोठा गोखरू यासारख्या आयुर्वेदातील महत्वपुर्ण औषधी वनस्पती मराठवाड्यातून संपत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com