सर्पदंश झालेल्या तब्बल 7 हजार रुग्णांचे वाचवले यांनी जीव : वाचा सविस्तर 

मधुकर कांबळे 
गुरुवार, 9 जानेवारी 2020

डॉ. पुंडे हे राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय विष परिषदेचे अध्यक्ष डॉ. गोपाल कृष्णकोन व ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे डॉ. डेव्हीड वॉरेल यांनी डॉ. पुंडे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली आहे.

औरंगाबाद- वैद्यकिय शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या शहरात दवाखाना थाटून प्रॅक्‍टिस करुन आपला लौकिक वाढवण्याऐवजी मातीशी जोडलेली गेलेली नाती जपत छोट्याशा तालूक्‍याच्या ठिकाणी त्यांनी दवाखाना उभारला.

त्या तालूक्‍यात सर्पदंशाने मरणाऱ्यांचे पुर्वी असलेले 20 टक्‍क्‍यावरुन केवळ 1.8 टक्‍क्‍यांवर आणले. ते डॉक्‍टर आहेत नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे दिलीप पुंडे. त्यांनी आतापर्यंत सर्पदंश झालेल्या तब्बल 7 हजार रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्यांचे जीव वाचवले. याबद्दल त्यांची डॉ. रखमाबाई राउत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

गेल्या 29 वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा सेवापथ उपक्रम म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे हा पुरस्कार दिला जातो. बुधवारी (ता.आठ) हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

क्‍लिक करा : बाळघुटी : प्रामाणिक प्रयत्न 

मुखेडचे डॉ. दिलीप पुंडे यांच्याशिवाय सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये 5 हजाराहून अधिक भगिनींच्या जीवनात संपन्नात आणणाऱ्या दुर्गा गावीत यांना "डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार' जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. रोख 21 हजार रुपये आणि मानपत्र असे स्वरुप आहे. मंगळवारी (ता.14) तापडिया नाट्यमंदीरात सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. 

सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी केले 

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील डॉ. दिलीप पांडुरंग पुंडे यांनी मुखेड या छोट्या तालुक्‍याच्या ठिकाणी वैद्यकिय सेवेला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी 7 हजार सर्पदंश झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. तेथील सर्पदंशाने होणारा मृत्यूदर 20 टक्‍क्‍यावरुन 1.8 टक्‍के वर आणला. डॉ. पुंडे हे राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय विष परिषदेचे अध्यक्ष डॉ. गोपाल कृष्णकोन व ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे डॉ. डेव्हीड वॉरेल यांनी डॉ. पुंडे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली आहे.

हेही वाचा : संपाला पाठींबा मात्र प्रत्यक्षात सहभाग नाही : वाचा कुठे 

इंग्लंडमधील ऑफ्सफर्ड विद्यापीठात जागतिक विषय परिषदेत त्यांनी सर्पदंश विषयावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी आजपर्यंत मुखेड येथे 1997 पासून 7 हजार बॅग्स रक्‍त संकलन करुन गरजूंची रक्‍ताची गरज भागवली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेउन त्यांची डॉ. रखमाबाई राउत सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

दुर्गा गावितांनी उभारले महिलांचे संघटन 

दुर्गा राजेंद्र गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या नवापुर तालूक्‍यातील शंभराहून अधिक गावातील 5 हजाराहून अधिक भगिनींच्या आयुष्यात संपन्नता यावी यासाठी यशस्वी संगठन उभारले. वनवासी समाजापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविणे, पारंपारीक बी- बियाणे, जैवविविधतेचे जतन करणे, सेंद्रीय शेतीचा प्रचार प्रसार करणे, किशोरी विकास कार्यक्रम, बचतगट, स्वावलंबन ह्या विषयात पुढाकार घेत त्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत.

11 गावांतून 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प त्यांनी पूर्ण केला आहे. तालूकापातळीवर 165 पाड्यांचा प्रवास करुन महिला संघटन, किशोर विकास, 12 पेक्षा जास्त गावात जाउन 500 हून अधिक महिलांना शिवणकामाचे, नैसर्गिक रंग तयार निर्मितीचे प्रशिक्षण देउन स्वावलंबनाच्या उपक्रमात सहभाग वाढवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना "डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार' जाहीर झाला आहे. 

वाचून तर बघा : शेकोटीत जळाले पैशाचे गाठोडे, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad dr. dilip punde he save life of snakebitten petient