पाचोड - पैठण रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरु; शेतकरी - ठेकेदार वाद पेटला

हबीबखान पठाण
Saturday, 23 January 2021

आता शेतकरी न्यायालयात गेल्याने शेतकरी विरुद्ध कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कपंनी असा वाद पेटला आहे

पाचोड (औरंगाबाद): मागील तीन वर्षांपासून सुरु असलेल्या एकशे तीस कोटी रुपये खर्चाच्या पाचोड - पैठण राज्य महामार्गाच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी न्यायलयात धाव घेतल्याने पाचोडजवळ तीन किलोमीटर अपूर्ण अवस्थेत असून शुक्रवारी (ता.२२) पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकरी विरुद्ध कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कपंनी असा वाद पेटला आहे.

एकशे तीस कोटी रुपये खर्चून पाचोड - पैठण या राज्यमहामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर टोल कपंनीद्वारे करण्यात येत आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा अपुरी पडत असल्याने कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन रस्ता तयार करण्यात येत असल्याने लिंबगाव व पाचोड (ता.पैठण) येथील शेतकऱ्यानी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली आहे.

संदीप क्षीरसागरांची आघाडी बीड नगरपालिकेत घायाळ झाली का? काकांच्या गटाकडे सर्व समित्या |

पाचोडपासून शिवछत्रपती जिनिंग प्रेसिंगपर्यंतचे तीन किलोमीटर काम बंद पाडले होते. उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२० रोजी १२ मीटरपेक्षा अधिक रूंदीचा रस्ता बनवायचा असल्यास सदरील जमीन योग्य मावेजा देऊन संपादित करण्यासंबंधीचे आदेश दिले होते. त्यानंतरही प्रशासन व संबंधित ठेकेदार कंपनीने गांभीर्याने न घेता जमिनीची संपादन प्रक्रिया न करता तीस मीटर क्षेत्रात काम सुरू ठेवत दुतर्फा रस्त्याचे खोदकाम करून आपले काम सुरु चालू ठेवले.

याबद्दल आता शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अवमान याचिका दाखल केली. त्या प्रकरणी उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर यांना नोटीसा बजावून अंतिम सुनावणी नऊ फेब्रूवारी रोजी ठेवली. पाचोडजवळ तीन किलोमीटर काम वगळता पाचोड-पैठण या पस्तीस किलोमिटर काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे ठेकेदार कंपनीने न्यायालयाचे आदेश बाजूला ठेवत शुक्रवारी (ता.२२) सकाळी पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले.

शेतात पाच मोरांचा मृत्यू, बीडमधील लोणी शिवारात खळबळ

तेंव्हा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विरोध केला. मात्र त्यांना काम थांबविल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात आल्याने सदरील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील न्यायालयाचा निर्णय दाखवला. तेंव्हा पोलिस व ठेकेदार कपनीचे कर्मचारी यांनी तीस मिटर ऐवजी बारा मिटरपर्यंतच रुंदीकरण करण्याचे सांगुन पोलीस बंदोबस्तात तुर्तास बारा मिटर रुंदीपर्यंत काम सुरू केले आहे.

"न्यायालयाने कल्याणी टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बारा मीटरच्या आत मध्ये काम करण्याचे आदेश दिले,परंतु त्यांनी आमच्या नऊ मीटर जमिनीचा तीन वर्षापासून जो वापर केला व या जमीनीतील सुपीक माती उपसून खोदलेल्या ठिकाणी दगड, मुरुम व खडीकरण करून आमची जमीन नापीक केली. त्यामुळे आमची मोठी नुकसान झाली. झालेल्या नुकसानीचा मोबदला देऊनच पुढचे काम करावे."

-भागवत साहेबराव भुमरे (शेतकरी)

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad latest news Pachod Paithan road widening work started under police protection